मुंबई । वार्ताहर
राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत गेल्या काही दिवसांपासून पहिल्यांदाच घटली आहे. राज्यात आज 8706 जणांना डिस्चार्ज देण्यात आला तर 7924 नव्या रुग्णांची भर पडली. गेल्या 24 तासांमध्ये राज्यात 7924 नवे रुग्ण आढळून आलेत. तर 227 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातल्या कोरोना बाधितांची एकूण संख्या 383723 एवढी झाली आहे. तर आत्तापर्यंत 13883 जणांचा मृत्यू झाला. आज 8706 जणांना सुटी देण्यात आली आहे. मुंबईत आज 1021 नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे मुंबईतल्या एकूण रुग्णांची संख्या 110182 वर गेली आहे.
20 ऑगष्टपर्यंत पुण्यातील कोरोना बाधितांची संख्या 1 लाखांवर जाऊ शकते, त्यापैकी 48 हजार पेशंट्स अँक्टिव्ह असू शकतात असा अंदाज पुणे मनपाचे अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलतांना व्यक्त केला. 31 जुलैपर्यंत पुण्यातील कोरोना बाधितांचा आकडा 60 हजारांवर जाण्याचा अंदाज आहे. त्यापैकी 27 हजार पेशंट्स अँक्टिव्ह असू शकतात. सध्याच्या रूग्णवाढीनुसार पुणे मनपाने हा अंदाज व्यक्त केला.
बाहेरून येणाऱ्या रूग्णांची संख्या 10 टक्क्यांपेक्षा अधिक असल्याने 20 ऑगष्टपर्यंत पुण्यातील कोरोना बाधितांचा आकडा 1 लाखांचा टप्पा करू शकते पार करू शकतो असंही त्यांनी सांगितलं.
पुण्यात आत्तापर्यंत 40931 रॅपिड अँन्टीजेन टेस्ट, त्यापैकी 8363 पेशंट्स पॉझिटिव्ह निघाले. पुणे मनपा 1 लाख रॅपिड अँटीजेन टेस्ट करणार आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार गेल्या 24 तासांत पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. एका दिवसात जवळपास 49 हजार 931 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली असून कोरोनाग्रस्तांचा देशातील आकडा 14 लाखावर पोहोचला आहे. कोरोनामुळे 24 तासांत 708 जणांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत देशातील मृतांचा आकडा 32,771वर पोहोचला आहे.
कोरोना विरुद्धची लढाई यशस्वीपणे पार करून आतापर्यंत 9 लाख 17 हजार 568 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. 4 लाख 85 हजार 114 जणांवर सध्या उपचार सुरू आहेत. भारतात कोरोनाचा रिकव्हरि रेट 63.92 आहे. गेल्या 24 तासांत सर्वात जास्त 5 राज्यांमध्ये कोरोनाग्रस्तांची नोंद करण्यात आली आहे.
24 तासात आंध्र प्रदेशात 7627, तमिळनाडू 6986, कर्नाटक 5199 आणि उत्तर प्रदेशात 3246 नवीन कोरोनाच्या केसेस मिळाल्या आहेत.
महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत उपचार घेणाऱ्या रुग्णांचे
बिल 28 हजारापेक्षा जास्त आकारता येणार नाही : राजेश टोपे
राज्यात उद्भवलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे लाभार्थी नसलेल्यांनाही आता या योजनेअंतर्गत करोनावर उपचार घेता येणार आहेत. तसा शासन निर्णयच जारी केला. यावेळी आरोग्य विभागाने बिलाबाबत काही मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. त्यात महत्वाचे म्हणजे या पुढे खासगी रुग्णालयाने कोरोनावर उपचार घेत असलेल्या रुग्णाचे बिल आकारतांना बेडचे बिल हे चार हजार प्रति दिन प्रमाणे 7 दिवसांचे केवळ 28 हजार एवढेच बिल आकारावे असं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे. ते औरंगाबादेत पत्रकार परिषदेत बोलत होते.
या बरोबरच महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत कोरोनावर उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी लागणारे पीपीई किट आणि मास्क पुरवण्याची जबाबदारी त्या त्या रुग्णालयाची असेल हे ही टोपे यांनी स्पष्ट केले आहे. महात्मा फुले योजनेअंतर्गत उपचार घेणाऱ्या रुग्णांचे बिल हे त्यांना मिळणाऱ्या पॅकेज पेक्षा अधिक होत असे. त्यामध्ये बेडचे बिल हे अव्वाच्या सव्वा लावल्याचे देखील समोर आले होतं. त्यामुळे राज्य शासनाच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला आहे. या योजने अंतर्गत राज्यातील 85 टक्के नागरिकांचा या योजनेत समावेश होता. कोरोनाचा उद्रेक पाहता आता उर्वरित 15 टक्के नागरिकांनाही योजनेचा लाभ मिळणार असल्याने राज्यातील 100 टक्के जनतेचा समावेश या योजनेत करण्यात आल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. 31 जुलै 2020 पर्यंत ही योजना अंमलात राहील असं सांगण्यात आलं होतं मात्र त्यालाही आता मुदतवाढ दिल्याचं आरोग्य विभागाने जाहीर केलं आहे. आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांच्या स्वाक्षरीने शनिवारी हा शासन निर्णय जाहीर झाला.
कोरोनाच्या उद्रेकाच्या पार्श्वभुमीवर संभाव्य परिस्थितीचा विचार करून महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्याकरीता या दोन्ही योजनेचे लाभार्थी नसलेल्या इतर रुग्णांनादेखील महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत असलेल्या अंगीकृत खाजगी रुग्णालयांमध्ये कोरोनासाठी उपचार घेता येतील, असं या शासन निर्णयात नमूद करण्यात आलं आहे. राज्यातील कोरोनाची सद्यस्थिती पाहता महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत समाविष्ट नसलेल्या राज्यातील नागरिकांनासुद्धा महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत येणाऱ्या 996 उपचार पद्धतींचा लाभ मान्यता प्राप्त दराने सर्व अंगीकृत रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून देण्यात येईल. आरोग्य विभाग महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत बेडच्या बिलाबाबत बाबत दर निश्चित केले असले तरी कोरोनावर उपचारासाठी लागणारी महागडी औषधे खरेदी करावी लागत असल्याच्या अनेक तक्रारी आहेत.
Leave a comment