अयोध्या:
देशातील अनेक वर्ष वादग्रस्त असणाऱ्या राम मंदिर निर्मितीची प्रत्यक्ष अंमलबजावणी आता होणार असल्याचे दिसत आहे. कारण उत्तरप्रदेशातील अयोध्येमध्ये राममंदिराचे काम ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सुरु होणार आहे. राममंदिराच्या भूमिपूजनाची तारीख देखील निश्चित झाली आहे. येत्या 5 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी मंदिरांचे भूमिपूजन करणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर या भूमिपूजन सोहळ्याला ठराविक लोकच उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
अयोध्येत राम मंदिराच्या कामासाठी शुभारंभाचा मुहूर्त अखेर ठरला आहे. काल मंदिर ट्रस्टच्या बैठकीत 3 आणि 5 ऑगस्ट या दोन तारखांचा प्रस्ताव देण्यात आला होता. त्यापैकी 5 ऑगस्टची तारीख आता निश्चित करण्यात आलीय. विशेष म्हणजे पंतप्रधान झाल्यानंतर मोदींची ही पहिलीच अयोध्या भेट आहे. वाराणसी, केदारनाथसारख्या इतर मंदिरांना त्यांंनी अनेकदा भेट दिली. पण अयोध्येचा विषय न्यायप्रविष्ट होता. आता थेट संकल्पपूर्तीवेळीच मोदी अयोध्येत दिसणार आहेत.
कोरोनाच्या काळात फार गर्दी होऊ नये यासाठीही खबरदारी घेण्यात येत आहे. अगदी 100 ते 150 लोकांच्याच उपस्थितीत हा सोहळा पार पाडण्याचे नियोजन आहे. त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी किती प्रभावीपणे होते हे देखील पाहणे महत्वाचे असेल. हे मंदिर कशा पद्धतीने बांधले जाणार याचीही उत्सुकता आहे. कालच्या ट्रस्टच्या बैठकीत त्यावरही चर्चा करण्यात आली.
या भव्य मंदिरासाठी संत समाज आणि रामभक्तांच्या मागणीवरून बदल करण्यात आले
शनिवारी महंत नृत्यगोपाल दास यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ट्रस्टच्या बैठकीत मंदिराच्या नकाशातील बदलांना मंजुरी देण्यात आली. आता मंदिरात 3 ऐवजी 5 घुमट असतील. उंची 128 फुटांऐवजी 161 फूट असेल. या भव्य मंदिरासाठी संत समाज आणि रामभक्तांच्या मागणीवरून बदल करण्यात आले. बैठकीला मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्र यांच्यासह 12 सदस्य उपस्थित होते.
नव्या मॉडेलमध्ये हे बदल
> मंदिर 128 ऐवजी आता 161 फूट.
> जुन्या मॉडेलमध्ये तीनच घुमट होते. नव्या मॉडेलमध्ये 5 घुमट.
> परिक्रमा मार्गावर श्री गणेश, महामाया, सीता, हनुमानांसह 5 देवतांची मंदिरे असतील.
> जुने मॉडेल 60 टक्के बदलेल. उंचीसह मंदिराची लांबी व रुंदीही वाढेल. खर्चातही प्रारंभीच्या 80 कोटींच्या अंदाजापेक्षा वाढ होईल.
पायाभरणी : पंचरत्न, चांदीचे नाग-नागीण आणि गंगाजल भरलेला तांब्याचा कलश
पायाभरणीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिराच्या पायात तांब्याचा कलश स्थापित केला जाईल. या कलशात हिरे, मोती, माणिक, सोने आणि पितळ हे पंचरत्न असतील. सोबत चांदीचे नाग-नागीण, हरळी आणि गंगाजल असेल. कलश स्थापनेनंतर नंदा, भद्रा, जया, रिक्ता आणि पूर्णा नामक पाच विटांची पूजा होईल. पंतप्रधानांच्या हस्ते विधिवत पूजा झाल्यावर या भव्य अशा राममंदिराची पायाभरणी केली जाईल आणि बांधकाम सुरू होईल.
बांधकाम पूर्ण होण्यास तीन वर्षे लागतील
टस्टचे महासचिव चंपत राय यांच्यानुसार, बांधकाम सुरू झाल्यानंतर 3 वर्षांत मंदिर पूर्ण होईल. कोरोना संकट सरल्यावर 10 कोटी कुटुंबांकडून दान स्वरूपात रक्कम घेतली जाईल. लार्सन अँड टुब्रो मंदिर उभारेल. सध्या मातीच्या नमुन्यांची तपासणी सुरू आहे.
Leave a comment