विधान भवनाच्या आदेशावर कर्मचारी नाराज
मुंबई । वार्ताहर
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयाने 50 टक्के कर्मचार्यांना कार्यालयात उपस्थित राहणे बंधनकारक केले आहे. याबाबत 13 जुलै रोजी विधान भवनात 50 टक्के कर्मचारी उपस्थितीबाबत परिपत्रक काढण्यात आले आहे. आतापर्यंत विधिमंडळातील 17 कर्मचार्यांना कोरोनाची लागण झाली आहे यात 4 पोलीस कर्मचार्यांचाही समावेश आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचं पावसाळी अधिवेशन 2 दिवसांपुरतं ठेवणार असल्याची शक्यता आहे.
3 ऑगस्ट रोजी पावसाळी अधिवेशन सुरु होईल. त्यामुळे अधिवेशनाच्या कामकाजासाठी कर्मचार्यांचे मनुष्यबळ कमी पडत असल्याने 50 टक्के उपस्थित बंधनकारक करण्यात आली आहे.त्यामुळे कर्मचार्यांसह सर्व आमदारांच्या, मंत्र्यांच्या सुरक्षेचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे.याबाबत विधिमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत म्हणाले की, आम्ही कर्मचार्यांना एक दिवसाआड येण्यासाठी सांगितलं आहे. त्याचसोबत योग्य ती सुरक्षा बाळगण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. विधिमंडळ अधिवेशन असल्याने हा आदेश काढण्यात आला आहे. मात्र राज्य सरकारने 15 टक्क्यापेक्षा जास्त उपस्थिती असू नये असं असतानाही या निर्णयामुळे विधान भवनातील कर्मचार्यांमध्ये नाराजी आहे.जवळपास 750 कर्मचार्यांपैकी 17 कर्मचार्यांना कोरोनाची लागण झाली आहे, राज्य सरकारने जर 15 टक्के उपस्थिती लावण्यास सांगितले असेल तर विधिमंडळ सचिवालय 50 टक्के कर्मचार्यांना उपस्थित राहण्यास बंधनकारक का करत आहे? तसेच अनेक कर्मचार्यांना लोकल ट्रेन्सने प्रवास करतानाही अडचणी येत आहे, विधिमंडळाच्या कर्मचार्यांसाठी अनेकदा अत्यावश्यक कर्मचारी असतानाही रेल्वे प्रवासास अडवले जात आहे. अनेक कर्मचारी वर्क फ्रॉम होम करत आहेत. मग स्वत: धोका पत्करुन 50 टक्के उपस्थिती लावावी असं सांगण्यात येत असल्याचं विधिमंडळ कर्मचारी युनियने नाराजी व्यक्त केली आहे.
Leave a comment