पुणे :
देशात नवीन ग्राहक संरक्षण कायदा सोमवारपासून (दि. 20) लागू होणार आहे. या कायद्यामुळे ग्राहकांचे बळ वाढणार आहे. आता 1 कोटी रुपयापर्यंत फसवणूक झालेल्या प्रकरणात जिल्हा ग्राहक मंचात दाद मागता येणार आहे. पूर्वी फसवणूक झालेल्या म्हणजे सेवा पुरवठादाराच्या ग्राहक मंचाच्या परिक्षेत्रातच दावा दाखल करता येत होता. मात्र, या कायद्यानुसार ग्राहकाला कोणत्याही जिल्ह्यात दावा दाखल करून दाद मागता येणार आहे.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे बिल्डर, विमा कंपनी, रेल्वे, टुर्स अँड ट्रॅव्हल्स कंपन्या, मोबाईल कंपन्या, बॅंका आणि विविध पुरवठादार संस्थानी दिलेल्या सदोष सेवेच्या विरोधात दाद मागता येते.
पूर्वी जिल्हा ग्राहक मंचात 20 लाख रुपयापर्यंत फसवणूक झाल्यास जिल्हा ग्राहक मंचात दाद मागता येत होते.
मात्र, सुधारणानुसार आता 1 कोटीपर्यंतच्या प्रकरणात दाद मागता येणार आहे. पूर्वी 20 लाखापेक्षा जास्त एक कोटी रुपयापर्यंतच्या किंमतीची वस्तुंची फसवणूक झाल्यास ग्राहकाला राज्य ग्राहक आयोगाकडे दाद मागावी लागत होते. मात्र, आता राज्य ग्राहक आयोगाकडे आता 10 कोटी रुपयापर्यंत फसवणूकीच्या प्रकरणात दाद मागता येणार आहे.
राज्य ग्राहक आयोगाचे सर्किट ब्रांच पुण्यात बसते. त्यामुळे येथील नागरिकांना पुण्यातच 10 कोटी रुपयापर्यंतच दाद मागणे शक्य झाले आहे. पूर्वी 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कमेची फसवणूक झाल्यास दिल्ली येथील राष्ट्रीय ग्राहक आयोग येथे मागावी लागत होते. मात्र, आता 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कमेच्या फसवणूकीच्या प्रकरणात दिल्ली येथे दाद मागावी लागणार आहे.
Leave a comment