जागा नसल्याचे कारण देत आयटीआयमध्ये आणून सोडले
बीड । वार्ताहर
बीड जिल्ह्यात शुक्रवारी तपासणीसाठी पाठवण्यात आलेल्या स्वॅबपैकी 20 जणांचे स्वॅब रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. आता आरोग्य यंत्रणेकडून या रुग्णांच्या सहवासितांचे स्वॅब घेण्यासाठी त्यांना बीड जिल्हा रुग्णालयासह बीडच्या शासकीय आयटीआयमध्ये आणण्यात आले, मात्र दोन्ही ठिकाणी त्यांना जागा नसल्याने कारण पुढे करत स्वॅब घेण्यासाठी थांबवून ठेवण्यात आले. दरम्यान जागेअभावी या सहवासित असलेल्या बाधितांच्या कुटूंबातील व्यक्तींची हेळंसाड झाल्याचे चित्र बीडमध्ये यानिमित्ताने समोर आले आहे. एका रुग्णानेच याबाबत माहिती दिल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. आरोग्य यंत्रणेतील वरिष्ठांनी रुग्णांच्या सहवासितांची हेळंसाड होणार नाही याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
बीड जिल्ह्यात मागील चार दिवसात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. असे असतानाच बाधित रुग्णांच्या सहवासितांचेही स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले जात आहेत. बीडमध्ये शुक्रवारी 292 व्यक्तींचे स्वॅब तपासणीला पाठवण्यात आले होते. त्याचे रिपोर्ट आज शनिवारी पहाटे जिल्हा आरोग्य यंत्रणेला प्राप्त झाले. त्यातील 20 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून व इतरांना धोका होवू नये म्हणून आरोग्य विभागाने आज सकाळी या बाधितांच्या कुटूंबातील व्यक्तींचे स्वॅब घेण्यासाठी त्यांना सुुरुवातीला बीड जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले. मात्र तिथे थांबण्यास त्या व्यक्तींना जागा नसल्याचे कारण पुढे करत शहरातील नगर रोडवरील आयटीआयमध्ये पाठवण्यात आले. मात्र तिथेही त्यांना थांबण्यासाठी जागा उपलब्ध नव्हती, त्यामुळे या व्यक्तींना आयटीआयच्या बाहेरच थांबण्याची वेळ आली. आता या व्यक्तींचे स्वॅब कधी घेणार अन् तोपर्यंत ते कुठे थांबणार? असा प्रश्न या व्यक्तींपुढे निर्माण झाला आहे. अगोदरच कोरोनाची भीती त्यात पुन्हा बाहेर ताटकळत थांबावे लागत असल्याने अनेकांना रडु कोसळले आहे. आरोग्य विभागाने या व्यक्तींना थांबण्यासाठी जागा उपलब्ध करुन देणे गरजेचे बनले आहे.
Leave a comment