अहवालाकडे जिल्हावासियांचे लक्ष
बीड । वार्ताहर
बीड जिल्ह्यातून शनिवारी (दि.4) तब्बल 251 व्यक्तींचे थ्रोट स्वॅब तपासणीसाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे. कोरोनाच्या निश्चित निदानासाठी एकाचवेळी, एकाचदिवशी इतके स्वॅब पाठवण्याची बीड जिल्ह्यातील ही पहिलीच वेळ आहे. दरम्यान या अहवालांकडे जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे.
शनिवारी तपासणीला पाठवलेलेल्या स्वॅबमध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय बीड-97, कोव्हीड केअर सेंटर बीड -41, स्वाराती ग्रा वै महाविद्यालय अंबाजोगाई-3, कोव्हीड केअर सेंटर अंबाजोगाई -53 उपजिल्हा रुग्णालय परळी-14, उपजिल्हा रुग्णालय केज-15, ग्रामीण रुग्णालय माजलगाव-5,उपजिल्हा रुग्णालय गेवराई -17 आणि ग्रामीण रुग्णालय आष्टी येथून 6 व्यक्तींच्या स्वॅबचा समावेश आहे अशी माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली.
बीड जिल्ह्यात सद्यस्थितीत 15 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. जिल्ह्यात आजपर्यंत बाधीत निष्पन्न झालेल्या रुग्णांची संख्या 133 झाली असून पैकी 107 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत तर 6 जणांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी पाठवलेल्या 188 पैकी 2 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत तर 13 अहवाल अनिर्णयीत राहिले आहेत.शिवाय 173 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. असे असले तरी आज शनिवारी तब्बल 251 व्यक्तींचे थ्रोट स्वॅब तपासणीला गेल्यामुळे बीड जिल्ह्याची चिंता कायम आहे. रात्री उशिरापर्यंत हे अहवाल जिल्हा आरोग्य विभागाला प्राप्त होणार आहेत.
आनंदनगरमध्ये पूर्णवेळ संचारबंदी
अंबाजोगाई ग्रामीण हद्दीतील जोगाईवाडी परिसरातील आनंदनगरमध्ये शुक्रवारी एक कोरोना बाधित रुग्ण निष्पन्न झाला.जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या आदेशावरुन शुक्रवारी (दि.3) रात्री उशिरा आनंदनगर भागातील विलास देशपांडे यांचे घर ते बालासाहेब कोकाटे यांच्या घरापर्यंतचा परिसर कंटेटमेंट झोन घोषित करुन पुढील अनिश्चित कालावधीसाठी बंद करत या ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
Leave a comment