वारकरी, भाविकांना घरातूनच घ्यावे लागणार पांडुरंगाचे दर्शन
कोरोना संकटामुळे वारी स्थगित ;मंदिरातही दर्शनासाठी प्रवेश नाही
बीड । वार्ताहर
‘अवघाचि संसार सुखाचा करीन,आनंदे भरीन तिन्ही लोक जाईन गे माय तया पंढरपूरा, भेटेन माहेर आपुलिया, सर्व सुकृताचे फळे मी लाहीन, क्षेम मी देईन पांडुरंगी, बाप रखुमादेविवरु विठ्ठलेचे भेटी, आपुले सवंसाटी करुनी राहे’ अशा ओवीतून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी पंढरीच्या वारीतून मिळणार्या पारमार्थिक सुखाचे महत्व प्रतिपादित केले आहे. मात्र यंदा कोरोनाच्या संकटामुळे पंढरीला जाणार्या लक्षावधी वारकर्यांच्या वारीची परपंरा इतिहासात प्रथमच स्थगित करण्याची वेळ शासन-प्रशासनावर आली आहे. मानाच्या पालखी सोहळ्यातील संतांच्या पादुका बसमधून पंढरीकडे मार्गस्थ झाल्या आहेत. तर या पालखी सोहळ्यासोबतही केवळ वीस वारकर्यांनाच सोबत जाण्याची परवानगी दिली गेली आहे. त्यामुळे यंदा इच्छा असूनही महाराष्ट्रातील लाखो भाविकांना घरातच राहून भगवंत विठ्ठल-रखुमाईची पुजा करुन दर्शन घ्यावे लागणार आहे.बीड जिल्ह्यातूनही दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक पंढरीत दाखल होत असतात. मात्र यंदा त्यांनाही घरातच रहावे लागणार आहे.
बीड जिल्हा ही संताची भूमी म्हणून ओळखला जातो. दरवर्षी गावागावात होणारे धामिर्क सोहळे,अखंड हरिनाम सप्ताह, पारायण, गाथा वाचन यातून धार्मिक समृध्दतेने बीड जिल्हा समृध्द आहे. पंढरपूरची आषाढी वारी हा तर बीड जिल्हा वासियांचा मनोमनी कोरलेला भगवंत विठ्ठलाच्या नामघोषाचा पर्वणीचा सोहळा असतो. महत्वाचे हे की, संत मुक्ताईंचा पालखी सोहळा पंढरीला मार्गस्थ होताना बीड जिल्ह्यातून जातो, या शिवाय पैठण येथून श्री एकनाथ महाराजांचा पालखी सोहळाही शिरुर आणि पाटोदा तालुक्यातून दरवर्षी जातो. शेगाव निवासी संत गजानन महाराज यांचा पालखी सोहळाही पंढरीला जाताना अन् येतानाही बीड जिल्ह्यातून जातो. याशिवाय अन्य दिंडी आणि पालखी सोहळ्यातून हजारो वारकरी टाळ मृदंगाचा गजर अन् मुखी विठूरायाचे नाम घेत पंढरीकडे मार्गस्थ होत असतात. साहजिकच शेकडो वर्षांची ही चालत आलेली परंपरा अन् आपल्या गावात येणार्या पंढरीच्या वारकर्यांची सेवा करण्याचे मिळणारे भाग्य यामुळे दरवर्षी जिल्ह्यातील भाविक भक्त वारकर्यांच्या सेवेसाठी तत्पर राहून अगोदरपासूनच नियोजनात असतात. यंदा मात्र कोरोनाच्या संकटामुळे पालखी अन् दिंडी सोहळ्यातून वारकर्यांना पंढरपूरला जाता येणार नसल्याने बीड जिल्ह्यातील सारेच भावनिक झालेले आहेत. ‘साधू संत येति घरा, तोचि दिवाळी-दसरा’ या वचनाप्रमाणे वारकर्यांच्या सेवेसाठी आतूर झालेल्या बीडकरांना यंदा मात्र कोरोनामुळे आपली सेवा करता येणार नसल्याचे शल्य मनात ठेवून आषाढीचा हा सोहळा घरात थांबूनच साजरा करावा लागत आहे. पंढरीनाथानेच आता हे संकट दूर करावे अशी प्रार्थनाही सारेच भाविक करत आहेत.
प्रत्येक आषाढी एकादशीला जिल्ह्यात गावोगावच्या विठ्ठल-रखुमाई मंदिरात मोठ्या उत्साहात भगवंतांची पुजा, अर्चना होते. यंदा मात्र भाविकांना दर्शनासाठीही एकत्र जाता येणार नाही, त्यामुळे सार्यानांच कोरोनामुळे कसे अडकवून टाकले आहे या अनुभवातून जावे लागत आहे. पंढरपूरला जाण्यासाठी दरवर्षी जिल्ह्यातील प्रत्येक आगारातून जादा बसेसची व्यवस्था आठवडाभर अगोदरच केली जाते. यंदा मात्र जिल्हातंर्गत प्रवासासाठीच आता कुठे बस सेवा सुरु झाली, त्यातही जेष्ठ नागरिक अन् लहान मुलांना प्रवास करता येणार नसल्याचा नियम आहे. एकंदरच पंढरीच्या आषाढी वारीची असलेली समृध्द परंपरा कोरोना संकटामुळे सार्यानाच बाजूला ठेवावी लागत आहे. वारीला एकत्र जाता येत नसले तरी घरी राहूनच सर्वांना हा उत्सवसोहळा साजरा करावा लागणार आहे.
बा विठ्ठला ! महाराष्ट्राला कोरोनामुक्त कर, मुख्यमंत्र्यांचे विठ्ठला चरणी साकडं
पंढरपूर : -
महाराष्ट्रासह अवघ्या देशाला कोरोनामुक्त कर आणि माझ्या बळीराजाला सुख, समाधान आणि भरभराट येऊ दे, असे साकडे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी श्री विठ्ठलाच्या चरणी आज घातले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सौ. रश्मी ठाकरे यांच्या हस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणीची बुधवारी पहाटे आषाढी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा करण्यात आली. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्यावतीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे कार्यकारी अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे उपस्थित होते.
श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा पहाटे दोन वाजता सुरू झाली. आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा मानाचे वारकरी अहमदनगर जिल्ह्यातील वीणेकरी विठ्ठल ज्ञानदेव बढे आणि सौ. अनुसया बढे (मु.चिंचपूर-पांगुळ, ता. पाथर्डी) या दाम्पत्यासोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी केली.
कोरोनामुळे जग, देश तसेच महाराष्ट्रावर मोठे संकट आले आहे. कोरोनाचे हे संकट लवकरात-लवकर दूर करून महाराष्ट्र आणि अवघा देश कोरोनामुक्त होऊ दे, असे मुख्यमंत्री म्हणाले. राज्यातील शेतकरी, वारकरी आणि अवघ्या विठ्ठल भक्तांचा प्रतिनिधी म्हणून मी आषाढी एकादशीला माऊलींच्या दर्शनाला आलो. बळीराजाला सुखी करण्याचे आणि राज्यातील सर्व नागरिकांच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आपणास बळ द्यावे, अशी मागणी श्री विठ्ठलाकडे केल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.
पंढरपूरच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत
पंढरपूरच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करणार आहे. त्यासाठी विकास प्रकल्पांना मंजुरी दिली जाईल. त्याबाबतचे प्रस्ताव सादर करावे, असे त्यांनी सांगितले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांनी आणि जनतेने आरोग्याच्या दृष्टीने पंढरपुरात येऊ नये. घरातूनच श्री विठ्ठलाचे नामस्मरण व पूजा करावी, असे आवाहन ठाकरे यांनी भाविकांना केले. वारकरी सांप्रदायाने शासनाच्यावतीने वेळोवळी करण्यात आलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन सहकार्य केल्याबद्दल त्यांनी आभार मानले. यावेळी पंढरपूर नगरपरिषदेस शासनाच्यावतीने पाच कोटी रुपयांचा अनुदानाचा धनादेश नगराध्यक्षा साधना भोसले यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
यावेळी नगराध्यक्ष साधना भोसले, समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, संभाजी शिंदे, शिवाजीराव मोरे, माधवी निगडे, अतुलशास्त्री भगरे, शकुंतला नडगिरे, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, अतिरिक्त आयुक्त राजेंद्र भोसले, पोलीस महानिरीक्षक सुहास वारके, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी आदी उपस्थित होते.
Leave a comment