राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज एका दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न केला. पवारांनी आज विरोधी पक्षनेते आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि गोपीचंद पडळकर यांच्यावर टीका करत त्यांची खिल्ली उडवली.
भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस प्रसिद्धीत राहण्यासाठी बोलत असतात, तर भाजपचे दुसरे गोपीनाथ पडळकर हे डिपॉझिट झालेले नेते आहेत. त्यांची कशाला दखल घ्यायची, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या दोन्ही नेत्यांची खिल्ली उडवली.
सातारा -
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस काहीही बोलून प्रसिद्ध मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत.सध्या त्यांना भरपूर वेळ आहे असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज साताऱ्यात विरोधी पक्षनेते फडणवीस यांना लगावला आहे. भाजपसोबत सत्ता स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचीच ऑफर होती असे बोलून फडणवीस यांनी राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली होती. यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले होते फडणवीस?
तत्पूर्वी, दोन वर्षांपूर्वी एक स्थिती अशी आली होती की, राष्ट्रवादी आणि भाजप सोबत येणार होते, असा खळबळजनक दावा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीदरम्यान केला होता. दोन वर्षांपूर्वी राष्ट्रवादी आणि भाजप सोबत येणार होता, त्यावेळी राष्ट्रवादीला सोबत घ्यायचे असेल तर शिवसेना देखील सोबत पाहिजेच, असे पंतप्रधानांनी सांगितले होते. अमित शाह यांनी देखील अशाच स्पष्ट शब्दात शरद पवार यांना सांगितले होते. मात्र त्यावेळी राष्ट्रवादीला आम्ही सोबत घेतले नाही.
राष्ट्रवादी पूर्णपणे आमच्यासोबत यायला तयार होती. असे असतानाही शिवसेनेने असे वागणे चुकीचे आहे. बाळासाहेब आज हयात असते तर त्यांनी हे कदापीही मंजूर केले नसते, असे फडणवीस म्हणाले. एका युट्युब चॅनेलसाठीच्या या मुलाखतीदरम्यान फडणवीस यांनी अनेक बाबींवर आपली भूमिका स्पष्ट केली होती.
अजित पवारांना सरकार स्थापन करण्याच्या प्रयत्नाबाबत बोलताना फडणवीस यांनी आपण ज्यावेळी पुस्तक लिहू त्यावेळी मी त्यात या गोष्टीचा खुलासा करेन, असे सांगितले. भाजपला त्यावेळी थेट राष्ट्रवादीची ऑफर होती. मात्र नंतर राष्ट्रवादीनेच भूमिका बदलली. तीन पक्षांचे सरकार चालू शकणार नाही, असे सांगितल्याने सकाळी शपथविधी झाल्याचेही फडणवीसांनी सांगितले.
अजित पवारांना बरोबर घेऊन सरकार स्थापन करण्याचा निर्णय तेंव्हा योग्य वाटला होता. मात्र तो चुकीचा ठरला. त्या औटघटकेच्या सरकारचा निर्णय अमित शहा यांचा होता. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आमच्या विरोधात गेला नसता तर ते सरकार टिकले असते, असा दावा देखील देवेंद्र फडणवीस यांनी केला.
सरकार असताना पाच वर्ष ज्यांचा शब्द मी पडू दिला नाही. त्या उद्धव ठाकरे यांनी मला नंतर फोनवर बोलायला देखील नकार दिला. मला याचे दु:ख नक्की झाले, असेही फडणवीस म्हणाले.
राज्यातील पुरोगामी म्हणवणाऱ्यांकडून आपल्याला सातत्याने लक्ष्य केले गेले. प्रत्यक्ष शरद पवारांनीही अनेक वेळा भूमिका बदलल्या. जातीचा अभिमान बाळगण्याचे हे दिवस नाहीत. उलट कर्तृत्वाचा अभिमान बाळगला जावा, असेही फडणवीस यांनी सांगितले.
Leave a comment