यांचा मुलगा फैसल आणि जावई ऍड. सिद्दीकी यांची देखील याप्रकरणी ईडीने चौकशी.....
नवी दिल्ली -
स्टरलिंग बायोटेक/ संदेसरा घोटाळ्याप्रकरणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांच्या दिल्लीतील घरावर ईडीची छापेमारी सुरु असून ईडी पटेल यांची चौकशी करत आहे. पटेल यांचा जबाब देखील नोंद केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच ईडीने अनेकदा पटेल यांना चौकशीसाठी बोलावले होते, मात्र कोरोनाचे कारण देऊन टाळाटाळ केली जात होती. यापूर्वी अहमद पटेल यांचा मुलगा फैसल आणि जावई ऍड. सिद्दीकी यांची देखील याप्रकरणी ईडीने चौकशी केली होती. आता पटेल यांच्या निवासस्थानी ईडीची छापेमारी सुरु असून तेथे पटेल यांचा जबाब देखील नोंदविणे सुरु आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दावा केला आहे की, संदेसरा बंधूंनी केलेला घोटाळा हा पीएनबी घोटाळ्यापेक्षा मोठा आहे. स्टरलिंग बायोटेक लिमिटेड/संदेसरा ग्रुप आणि संचालक नितीन संदेसरा, चेतन संदेसरा आणि दीप्ती संदेसरा यांनी भारतीय बँकांना 14 हजार 500 कोटी रुपयांहून जास्त रकमेला गंडवले आहे. स्टरलिंग बायोटेकचे मालक संदेसरा बंधू चेतन जयंतीलाल संदेसरा आणि नितीन जयंतीलाल संदेसरा यांच्यावर बनावट कंपन्या तयार करून बँकांकडून कर्ज घेतल्याचा आरोप आहे. संदेसरा बंधूंविरुद्ध सीबीआयने 5700 कोटी रुपयांच्या फसवणुकीचे प्रकरण नोंदवले होते.
याप्रकरणी स्टरलिंग बायोटेकसोबतच कंपनीचे संचालक चेतन जयंतीलाल संदेसरा, दीप्ती चेतन संदेसरा, राजभूषण ओमप्रकाश दीक्षित, नितीन जयंतीलाल संदेसरा आणि विलास जोशी, सीए हेमंत गर्ग यांना आरोपी करण्यात आले होते. आता याप्रकरणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांचे निकटवर्तीय असलेले अहमद पटेल यांच्याविरोधातील कारवाईचा फास ईडीने आवळला आहे.
Leave a comment