मंत्री अमित देशमुख यांची अंबाजोगाईत घोषणा
बीड । वार्ताहर
राज्यात कोरोना संसर्गाच्या साथीमुळे बीड जिल्ह्यातील प्रशासन आणि जनतेने योग्य असे काम केले असल्यानेच जिल्ह्यात कोरोनाची साथ नियंत्रणात राहिली. हे स्पष्ट करतानाच आगामी काळात राज्यामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी व्हीआरडीएल प्रयोगशाळा अर्थात कोरोना रूगणांच्या तपासणीसाठी प्रयोगशाळा उभारण्यात येणार असून त्यातील एक शाळा बीड शहरात उभारण्यात येईल तसेच प्लाझमा बँकही बीडमध्ये कार्यान्वीत करण्यात येईल अशी घोषणा राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी काल अंबाजोगाईत केली. स्वामी रामानंद तिर्थ वैद्यकीय महाविद्यालयामध्ये त्यांनी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचा आणि कोरोना संसर्ग साथीचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, स्वारातीचे अधिष्ठाता डॉ.सुधीर देशमुख यांची उपस्थिती होती.
वैद्यकीय शिक्षण मंत्री देशमुख म्हणाले, कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने अनेक उपाययोजना लागू केल्या आहेत सुरुवातीला राज्यात फक्त दोनच व्हीआरडीएल प्रयोगशाळा होत्या तेथे फारच मर्यादित नमुने तपासणी करणे शक्य होते. परंतु या कालावधीत त्यांच्यात वाढ करून राज्यातील प्रयोगशाळांमध्ये आता 50 हजार नमुन्यांची तपासणी करण्याची क्षमता निर्माण करण्यात आली आहे. बीड या जिल्ह्याच्या ठिकाणी देखील व्हीआरडीएल प्रयोगशाळा उभारणीस तत्वतः मंजुरी, एमआरआय मशीनला मंजुरी देण्यात आली आहे. असे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले,वैद्यकीय सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. यामुळे महाराष्ट्रात जगातील सर्वात विस्तारित असे प्लाझमा थेरपी सेंटर उभारण्यात येत असून त्याचे लवकरच उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होईल त्या अनुषंगाने बीड जिल्ह्यातही प्लाझमा बँक सुरू करण्यात येईल.नागरिकांना तत्पर आणि अत्याधुनिक आरोग्य सेवा देतानाच आयुर्वेद युनानी आधी वैद्यकीय उपचारांना देखील चालना देण्यात येईल वैद्यकीय सेवा बळकट करण्यासाठी आरोग्य विभागात पंचवीस हजार पदे भरण्यात येणार आहे असे ते म्हणाले.
कोरोना कालावधीत वैद्यकीय सुविधा वाढवण्यासाठी पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे कठोर प्रयत्न महत्त्वाचे असून बीड जिल्ह्यातील कोरोना संसर्ग कालावधीत पालकमंत्री मुंडे यांच्या कठोर प्रयत्नांनी वैद्यकीय सुविधांमध्ये वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले. राज्य शासनाने दिलेल्या सूचनांची जिल्ह्यात उत्तमरित्या अंमलबजावणी झाली जिल्हा प्रशासनाचे चांगल्या कामामुळे कोरोना बाधित व्यक्तींची संख्या आटोक्यात राखतानाच मृत्यू दरही 2.6 राहिला जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व आरोग्य अधिकारी यांचे काम कौतुकास्पद असल्याचे ते म्हणाले. कोरोना विरुद्धचा लढा रुग्णालयात कमी व बाहेर जास्त आहे. या लढाईमध्ये जनतेबरोबर डॉक्टर्स नर्सिंग स्टाफ आरोग्यसेवक वैद्यकीय तंत्रज्ञ यांचे प्रामाणिक प्रयत्न महत्त्वाचे ठरले. अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयासाठी 750 नवीन बेड मंजूर करण्यात आले असून इतर मागण्यांना तत्वाचा मंजुरी देण्यात आल्याचेही याप्रसंगी सांगितले. याप्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय अधिकारी शोभा जाधव, माजी आमदार पृथ्वीराज साठे, राजकिशोर मोदी आदी उपस्थित होते.
Leave a comment