ऑनलाईन बैठका, संवाद साधण्यावर भर 

बीड । वार्ताहर

कोरोनामुळे राजकारणी मंडळींचा कार्यकते, समर्थक अन् पदाधिकार्‍यांची संवाद साधण्याची माध्यमेही पार बदलून गेली आहेत. कोरोनामुळे सोशल डिस्टन्सींग गरजेची होवून बसली आहे. त्यामुळे राजकीय नेते, पदाधिकारीही शक्यतो दूरवरुनच संवाद साधताना दिसत आहेत. शिवाय तोंडाला मास्क असल्याशिवाय अनेकांना जवळही येवू दिले जात नाही.. 

गेल्या तीन महिन्यात राजकीय पक्षांनी संघटन पातळीवर व पक्षीय राजकारण कमी केलेले नाही उलट ते आहे त्यापेक्षाही वेगाने सुरू होते फक्त त्याचे माध्यम बदलेले दिसले.भाजपने व्हर्चुअल सभा अन् रॅलीचे नियोजन केले, इतर पक्षांनीही ऑनलाईन पध्दतीने संपर्क ठेवण्यावर भर दिल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यातील शहरात, खेड्यात काहीही समस्या असल्यास त्या समस्या सोडविण्यासाठी वेगवेगळी माध्यमे निवडली जात आहेत. प्रत्यक्ष भेट घेता येत नसली तरी या ऑनलाईन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून राजकीय पक्षांनी आपले उपक्रम जनमाणसापर्यंत नेण्यावर भर दिला आहे. 

कोरोनामुळे सध्या सर्वत्र राजकीय पक्षांच्या अजेंड्यांवरील विषयही बदलून गेले आहेत. फळ वाटप, जंगी सत्कार अशांना पुरता फाटा देऊन त्याची जागा रक्तदान, निर्जंतुकीकरणाचे साहित्य वाटप, रोगप्रतिकार क्षमता वाढविणाजया औषधांचे वितरण यांनी घेतले; मात्र हे सर्व करताना संपर्काची माध्यमे बदलली तरी राजकारणाचा स्वर व सूर तोच होता. आता अनलॉकची प्रक्रिया सुरू होऊन दोन आठवडे लोटले आहेत. रस्त्यावरची गर्दीही वाढू लागली. या गर्दीसोबतच राजकीय नेत्यांच्या भोवतीचा गराडाही वाढणारच आहे. पाच पंचविस कार्यकर्त्यांना घेऊन नेत्यांची उठबस वाढेल, पुन्हा लहान-मोठे कार्यक्रम सुरू होतील अन् राजकारण पुन्हा आपल्याच वळणावर जाईल, कारण आपल्याकडच्या राजकारणात गर्दी महत्त्वाची आहे.माध्यमांवर किती लाईक्स मिळाले, किती व्हीज होते, यापेक्षा किती डोकी भाषणाला हजर होती, याचा प्रभाव जास्त असतो. त्यामुळेच कोरोनावर मात केल्यानंतर आपल्या भोवती राहणारे गर्दीचे वैभव भविष्यातही राहिले पाहिजे, म्हणून कार्यकर्त्यांना बांधून ठेवण्यासाठी, जपण्यासाठी प्रत्येक पक्षाची सारी ऑनलाइन धडपड सुरू आहे.

बदल हा राजकारणाचा स्थायीभाव आहे. त्यामुळेच राजकारण हे सतत प्रवाही असते. अलीकडच्या काळात ते एवढे प्रवाही झाले आहे की, आयुष्यभर जे तत्व, मूल्य व निष्ठा जोपासण्याची शपथ घेत कार्यकर्त्यांची मोठी फळी उभारणारेही रातोरात आपल्या तत्वांना तिलांजली देत सत्तेसोबत सारीपाट लावून विचारसरणीतही चटकन बदल घडतो, हे दाखवून देतात. अशा नेत्यांच्या कार्यकर्त्यांना मात्र कोणता झेंडा घेऊ हाती, असे म्हणण्याची वेळ येते. कोरोनाने मात्र राजकारणाचे स्वरूपच बदलून टाकले. संवाद अन् संपर्काची माध्यमे बदलली, त्यामधून राजकारणाची प्रक्रियाही व्हर्च्युअल होईलही; पण गर्दी हाच राजकारणाचा श्वास आहे, म्हणूनच हा बदलही क्षणिकच असेल.कोरोनाचे संकट दिवसेंदिवस भीषण होत आहे. दररोज रुग्ण वाढत आहेत, मृत्यू तर सरासरी दररोजचा एक असे काहीसे चित्र आहे; मात्र उपाययोजनांबाबत फक्त चर्चांचा काथ्याकुट अन् सूचनांचा पाऊस यापलिकडे काही बदल नाही. व्हेंटिलेटर कमी, अपुर्‍या खाटा, सुविधांची वाणवा या समस्या दूर करण्यासाठी राजकारण्यांनी आपली पक्षीय भूमिका बाजूला ठेवून दबाव गट केला तर नवा राजकीय ट्रेण्ड सर्व राज्यासाठी दिशादर्शक ठरेल; पण त्यासाठी इच्छाशक्ती हवी आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.