शेतकर्यांनी तालुका कृषि अधिकार्यांकडे तक्रारी करण्याचे आवाहन
जिल्ह्यात तक्रार निवारण समित्या गठीत
बीड । वार्ताहर
जिल्ह्यात या वर्षी वेळेवर पाऊस झाल्याने शेतकर्यांची मागील 8 ते 10 दिवसापासून खरिपाच्या पेरणीची लगबग सुरु झाली असून जवळपास 50 ते 60 टक्के पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत. सोयाबीन पिकाची पेरणीही या वर्षी मोठ्या प्रमाणात सुरु असून बियाणे उगवत नसल्याच्या अनेक तक्रारी कृषी विभागाकडे प्राप्त झाल्या असून यामुळे शेतकर्यांत चिंतेचे वातावरण आहे. दरम्यान शेतकर्यांनी आपल्या तक्रारी तालुका कृषी अधिकार्यांकडे नोंदवाव्यात असे आवाहन करण्यात आले आहे. कृषी विभागाने यासाठी तक्रार निवारण समित्याही गठीत केल्या आहेत. बाबतच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात प्राप्त होत आहेत.
बीड जिल्ह्यात दरवर्षी खरिपात कपाशीपाठोपाठ सोयाबीनचे विक्रमी उत्पादन घेतले जाते. यंदा मात्र नवीन समस्या निर्माण झाली आहे. कोरोना महामारीचा फायदा घेत काही बोगस बियाणे कंपणीने आपले बियाणे बाजारात उतरविले आहे. परंतु या बोगस बियाण्यांमुळे शेतकरी मात्र पुरता अडचणीत आला आहे. मृग नक्षत्रात शेतात सोयाबीन पेरणी केल्यानंतर यंदा पावसानेही शेतकर्याला चांगली साथ दिली. पेरणीयोग्य पाऊस झाला. असे असले तरी पेरणी करुन दहा ते बारा दिवस झाल्यानंतरही बियाणे उगवले नसल्याने शेतकरी नव्या संकटात सापडला आहे. दरम्यान
मागील वर्षी सोयाबीन काढणीच्या कालावधीत अवकाळी पाऊस झाल्याने बियाणे मोठ्या प्रमाणात भिजलेले होते, अशा परिस्थितीत बर्याच शेतकर्यांनी बाजारात उपलब्ध असलेल्या विविध कंपन्यांचे बियाणे खरेदी करून पेरणी केलेली आहे. अशा बियाण्यांच्या देखील उगवण कमी झाल्याच्या तक्रारी बर्याच गावातून मागील 2 दिवसापासून कृषी विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत. या स्थितीला तोंड देण्यासाठी कृषी विभागाने आता शेतकर्यांना आवाहन केले आहे की,आपले बियाणे न उगवल्याबाबत अथवा कमी प्रमाणात उगवलेबाबत आपणास तक्रार करायची असल्यास आपला आपला तक्रार अर्ज आपल्या तालुक्याच्या तालुका कृषि अधिकारी किंवा पंचायत समितीचे कृषि अधिकारी यांचेकडे बियाणे खरेदीच्या पक्क्या पावतीसह सादर करावा. तालुका स्तरावर उपविभागीय कृषि अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली तक्रार निवारण समिती गठीत करण्यात आलेली असून या समितीमार्फत प्राप्त तक्रारींची रितसर चौकशी करण्यात येईल,तक्रारीचे अनुषंगाने कार्यवाही करण्यात येईल असे आवाहन राजेंद्र निकम,जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, बीड यांचेमार्फत करण्यात आले आहे.
Leave a comment