चीनच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांचा मोदींना पाठिंबा
मुंबई : -
लडाख सीमेवर चीनसोबतच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहभागी झाले होते. 'भारताला शांतता हवी आहे, पण याचा अर्थ आम्ही कमजोर आहोत, असा नाही. चीनचं वागण विश्वासघाताचं आहे. भारत मजबूत आहे, मजबूर नाही,' असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
'आम्ही सगळे एक आहोत, हीच भावना आहे. आम्ही पंतप्रधान मोदींसोबत, आमच्या सैन्यासोबत आणि त्यांच्या कुटुंबासोबत आहोत. आपल्या सरकारमध्ये डोळे काढून हातात द्यायची ताकद आहे,' असं वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी या बैठकीत केलं.
पंतप्रधानांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला राज्यातून मुख्यमंत्र्यांसह शरद पवारही उपस्थित होते. पंतप्रधानांच्या या बैठकीला काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंग, गृहमंत्री अमित शाह, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली.
निशस्त्र सैनिकांविषयी राहुल गांधींच्या मुद्दयाशी शरद पवारांची अप्रत्यक्ष असहमती
भारत-चीन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भूमिकेशी अप्रत्यक्षपणे फारकत घेतल्याचे दिसून आले. राहुल गांधी यांनी शुक्रवारी एक व्हीडिओ ट्विट केला होता. यामध्ये राहुल यांनी म्हटले होते की, चीनने भारताच्या निशस्त्र सैनिकांची हत्या केली. मात्र, आपल्या सैनिकांना निशस्त्रपणे कोणी पाठवले, यासाठी जबाबदार कोण, असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला होता.
या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी आजच्या बैठकीत केलेल्या वक्तव्याने राजकीय वर्तुळाचे कान टवकारले गेले आहेत. पवार यांनी म्हटले की, आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार भारतीय सैनिकांनी शस्त्र बाळगावीत किंवा बाळगू नयेत, याचे काही नियम ठरले आहेत. त्यामुळे आपण अशा संवेदनशील मुद्द्यांचा आदर केला पाहिजे, असे शरद पवार यांनी म्हटले. त्यामुळे शरद पवार यांनी एकप्रकारे राहुल यांच्या भूमिकेशी अप्रत्यक्षपणे असहमती दर्शविल्याचे मानले जात आहे.
तत्पूर्वी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनीही शुक्रवारी राहुल गांधी यांना याच मुद्द्यावरुन प्रत्युत्तर दिले होते. आपण पहिले आपल्याला तथ्य समजून घेणं गरजेचं आहे. सीमेवर असलेल्या सैनिकांकडे नेहमीच हत्यारं असतात, खासकरून जेव्हा ते आपली जागा सोडतात. १५ जूनच्या रात्री गलवानमध्ये असलेल्या जवानांनी पण असंच केलं. पण १९९६ आणि २००५ सालच्या करारानुसार एलएसीवर (प्रत्यक्ष नियंत्रणरेषा) झटापटीच्या दरम्यान हत्यारांचा वापर केला जात नाही, याकडे एस. जयशंकर यांनी राहुल गांधींचे लक्ष वेधले होते.
मोदींना पवार, सोनियांनी दिल्या ‘या’ सूचना
सर्वपक्षीय बैठकीत २० पक्षांचा सहभाग
गलवान खोऱ्यात सोमवारी रात्री चीनने धोका देऊन केलेल्या हल्ल्यात भारताचे २० जवान शहीद झाले. या घटनेचा तीव्र निषेध देशभरात केला जातो आहे. चीनच्या या कृतीचा निषेध म्हणून चायनीज उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचीही मागणी होते आहे. दरम्यान या विषयाच्या अनुषंगाने आजच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत २० पक्ष सहभागी झाले आहेत. ज्यामध्ये प्रामुख्याने काँग्रेस, राष्ट्रवादी, तृणमूल काँग्रेस अशा २० पक्षांचा समावेश आहे. गलवानमध्ये शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर सर्वपक्षीय बैठकीला सुरुवात झाली. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक सुरु आहे.
सोनिया गांधी काय म्हणाल्या?
गलवानमध्ये जे काही घडलं ते गुप्तचर यंत्रणांचं अपयश होतं का?
सर्वपक्षीय बैठक बोलवण्यासाठी तुम्ही काहीसा उशीरच केलात. ही बैठक आणखी लवकर बोलवायला हवी होती असंही सोनिया गांधी म्हणाल्या आहेत.
गलवानमध्ये जे काही घडलं ते क्लेशदायक आहे. या संवेदनशील प्रकरणांकडे तशाच पद्धतीने पाहिलं पाहिजे असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे.
ममता बॅनर्जी काय म्हणाल्या?
चीनने हल्ला केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वपक्षीय बैठक बोलावली. या निर्णयातून देशात एक चांगला संदेश गेला आहे असं तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी म्हटलं आहे.
आम आदमी पार्टी, राष्ट्रीय जनता दल, एआयएमआयएम या पक्षांनी सर्वपक्षीय बैठकीत न बोलवण्यात आल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आपचे नेते संजय सिंह यांनी केंद्रात अहंकार असलेलं सरकार असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तर असदुद्दीन ओवेसी यांनी आमच्या पक्षाला सर्वपक्षीय बैठकीत न बोलवणं हे निराशाजनक असल्याचं म्हणत तीव्र शब्दांमध्ये प्रतिक्रिया दिली आहे.
Leave a comment