हा निर्णय राजकारणातील दोन आदर्श आणि उत्तम मैत्री यांचे मूर्तिमंत उदाहरण - पंकजा मुंडे
लातूर :
महाराष्ट्राच्या राजकारणातील 'दो हंसो का जोडा' अशी ओळख असलेले लोकनेते पुन्हा एकत्र येणार आहेत. लातूर जिल्हा परिषदेच्या प्रांगणात माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या पुतळ्याशेजारी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा पुतळा बसवण्यात येणार आहे. मराठवाड्यातील दोन दिग्गज नेत्यांचे स्मारक शेजारी-शेजारी बसवले जाणार असल्याने समर्थकही आनंदित आहेत.
लातूर जिल्हा परिषदेच्या प्रांगणात सध्या विलासराव देशमुखांचा पुतळा आहे.आता या पुतळ्याच्या बाजूलाच गोपीनाथराव मुंडे यांचा पुतळा बसवण्यात येणार आहे. त्यासंबंधी ठराव लातूर जिल्हा परिषदेने सर्वसाधारण सभेत घेतला आहे.
पुतळ्यासाठी साठ लाख रुपये खर्च येणार आहे. राजकारणातील नव्या पिढीला या दोन मित्रांच्या पुतळ्यातून प्रेरणा मिळेल, असा विश्वास जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी व्यक्त केला.
विलासराव देशमुख लातूरचे, तर गोपीनाथ मुंडे बीडचे. त्याकाळी विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांच्यात असलेली मैत्री सर्वश्रुत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांना 'दो हंसो का जोडा' असे संबोधले जात असे. मैत्रीला अनुसरुन या राजकीय मित्रांचे स्मारक शेजारी शेजारी उभारण्यात येणार आहेत.
वेगवेगळ्या पक्षात असूनही एकमेकांच्या मदतीला धावून जाणारे सख्खे मित्र म्हणून ते परिचित होते. ग्रामपंचायतीपासून या दोघांच्या राजकारणाला सुरुवात झाली तरी विद्यार्थीदशेपासून ते एकत्र होते. महाविद्यालयीन जीवनात देशमुख-मुंडे जोडीचे किस्से राजकारणात अजूनही ऐकवले जातात. दोघांचे अकाली निधन समर्थकांना चुटपूट लावणारे आहे.
हे दोघे एका व्यासपीठावर येणे म्हणजे त्यांच्या चाहत्यांना एक पर्वणीच
महाराष्ट्राच्या राजकारणात गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख यांच्या मैत्रीचे किस्से त्यांच्या पश्चात देखील चर्चिले जातात. हे दोघे एका व्यासपीठावर येणे म्हणजे त्यांच्या चाहत्यांना एक पर्वणीच असायची. अगदी ग्रामपंचायतीपासून या दोघांच्या राजकारणाला सुरूवात झाली असली तरी त्यांची मैत्री मात्र त्याही आधीची म्हणजे महाविद्यालयापासूनची होती. दोघे पुण्याला शिकायला असल्यामुळे त्या काळातील गंमतीजमती हे दोघे एकत्र आल्यानंतर आपल्या भाषणातून सांगायचे.
राजकारणात या दोघांनीही मोठी उंची गाठली होती. आमदार ते राज्याचे मुख्यमंत्री आणि दिल्लीत केंद्रीय मंत्री होत विलासराव देशमुख यांनी त्यांच्या भाषेत सांगायचे झाले तर दोन्ही कडची हवा अनुभवली. तर गोपीनाथ मुंडेचा प्रवासही असाच होता. युती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री राहिलेले गोपीनाथ मुंडे पुढे मोदी सरकारच्या मंत्रीमंडळात ग्रामविकास खात्याचे मंत्री झाले. दोघेही नेहमी विरोधी पक्षात राहीले, पण पक्ष त्यांच्या मैत्रीच्या आड कधी आलाच नाही. पण या दोघांची खऱ्याखुऱ्या आयुष्यातील एक्झीटसुध्दा मनाला चटका लावणारी ठरली होती.
आता दोघेही हयात नाहीत, पण त्यांच्या निधनानंतरही त्यांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न लातूर जिल्हा परिषदेने केला आहे. जिल्हा परिषदेतील विलासराव देशमुख यांच्या पुतळ्याशेजारी मुंडे यांचा पुतळा उभारून या दोघांच्या मैत्रीचा धागा अधिक घट्ट करण्याचा हा प्रयत्न म्हणावा लागेल.
विलासराव देशमुख यांचा प्रदीर्घ प्रवास
सरपंच, आमदार, मुख्यमंत्री ते केंद्रीय मंत्री असा प्रदीर्घ राजकीय प्रवास विलासराव देशमुख यांनी केला आहे. अमोघ वक्तृत्व, हजरजबाबीपणा, अजातशत्रू नेतृत्व, प्रशासन हाताळण्याचे कौशल्य, महाराष्ट्राच्या राजकारणाची-समाजकारणाची नाडी अचूक ओळखण्याची क्षमता अशा त्यांच्या गुणांचा गौरव आजही केला जातो. त्यांचा राजकीय वारसा पुत्र आणि मंत्री अमित देशमुख, आमदार धीरज देशमुख चालवतात. 14 ऑगस्ट 2012 रोजी त्यांचे निधन झाले.
युती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री राहिलेले गोपीनाथ मुंडे मोदी सरकारच्या मंत्रीमंडळात ग्रामविकास खात्याचे मंत्री झाले. मनमिळाऊ स्वभावाचे, सर्वसामान्यांच्या गरजांची जाण असलेले 'लोकनेते' अशी त्यांची कीर्ती होती. 3 जून 2014 रोजी दिल्लीत गोपीनाथ मुंडे यांचे अपघाती निधन झाले. त्यांचा राजकीय वारसा कन्या आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे, खासदार प्रीतम मुंडे चालवतात.
हा निर्णय राजकारणातील दोन आदर्श आणि उत्तम मैत्री यांचे मूर्तिमंत उदाहरण - पंकजा मुंडे
यावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांचे आभार मानले आहेत. 'आभार… राहुल हा निर्णय राजकारणातील दोन आदर्श आणि उत्तम मैत्री यांचे मूर्तिमंत उदाहरण'.. अस ट्विट करत पंकजा मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
Leave a comment