मुंबई | वार्ताहर
राज्यातील ग्रामपंचायतींमधील सरपंचांसारखे आता उपसरपंचांनाही दरमहा मानधन देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी याबाबत घोषणा केली आहे. आतापर्यंत फक्त सरपंचांना मानधन देण्यात येत होतं. त्यात उपसरपंचांचा समावेश नव्हता. मात्र आता सरपंचांप्रमाणे उपसरपंचांनाही मानधन सुरु करण्यात आले असून पहिल्या टप्प्यात १५.७२ कोटी रुपयांची रक्कम उपसरपंचांच्या बँक खात्यांवर जमा करण्यात आली असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे.
कसं असेल मानधनाचं स्वरुप?
- २००० पर्यंत लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींच्या उपसरपंचांना दरमहा १००० रुपये
- २००१ ते ८००० पर्यंत लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींच्या उपसरपंचांना दरमहा १५०० रुपये
- ८००१ पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींच्या उपसरपंचांना दरमहा २००० रुपये इतके मानधन दिले जात आहे
राज्यात सुमारे २८ हजार ग्रामपंचायती असून त्यातील ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण केलेल्या २४ हजार ४८५ ग्रामपंचायतींच्या उपसरपंचांच्या खात्यावर सध्या मानधन जमा झाले आहे. उर्वरित उपसरपंचांच्या खात्यावर मानधन जमा करण्याची कार्यवाही सुरु असून ती लवकरच पूर्ण केली जाईल, अशी माहितीही मुश्रीफ यांनी दिली आहे.
राज्यातील गावांच्या विकासासाठी सरपंचांबरोबर उपसरपंचांचेही मोठं योगदान असतं. सध्या राज्यातील सरपंचांना दरमहा मानधन मिळतं. पण गावाच्या विकासासाठी उपसरपंचही योगदान देत असतो. ते लक्षात घेऊन त्यांनाही मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु काही तांत्रिक कारणास्तव आतापर्यंत त्यांना मानधन अदा करण्यात आलं नव्हतं. उपसरपंचांना मानधन ऑनलाईन अदा करण्याची कार्यप्रणाली तयार करण्याची सर्व प्रक्रिया पार पाडली असून एकूण ८ महिन्यांचे एकत्रित मानधन उपसरपंचांच्या खात्यावर जमा करण्यात आलं आहे. एकुण १५.७२ कोटी रुपये खात्यावर जमा करण्यात आले आहेत
सरपंचांनाही मिळाले प्रलंबित मानधन
दरम्यान, राज्यातील सरपंचांचे काही महिन्यांचे मानधन प्रलंबित राहीले होते. हे मानधन तातडीने अदा करण्यात यावे, अशा सूचना विभागास दिल्या होत्या. त्यानुसार कार्यवाही करुन विभागामार्फत प्रलंबित मानधनापोटी सरपंचांच्या खात्यावर नुकतेच २२ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत.
Leave a comment