योजनेच्या लाभासाठी संकेतस्थळ सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी
पुणे -
पावसाळा सुरू झालेला असताना शेतकऱ्यांचे डोळे मागेल त्याला शेततळे या योजनेसाठीच्या संकेतस्थळाकडे लागले आहेत. कारण, गेल्या काही दिवसांपासून ते बंद आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज करता येत नाही, त्याचा फटका जिल्ह्यासह दुष्काळग्रस्त पट्ट्यातील शेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुळे शेततळे नंतर द्या, अगोदर संकेतस्थळ तर सुरू करा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाऊ लागली आहे.
राज्यात 83 टक्के कोरडवाहू क्षेत्रातील कृषी उत्पादनांत शाश्वतता निर्माण करण्यासाठी संरक्षित सिंचनाची सुविधा निर्माण करणे अत्यंत आवश्यक बाब आहे. पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतीसाठी मागेल त्याला शेततळे योजनेकडे पाहिले जाते.
राज्यातील दुष्काळग्रस्त भागात पाण्याची कमतरता असल्याने शेतकऱ्यांनी मागेल त्याला शेततळे या योजनेचा लाभ घेत हजारो शेततळी उभारली आहेत. टंचाई काळात याच शेततळ्यातील पाण्याचा आधार पिकांना मिळतो. गेल्या वर्षी या योजनेची प्रभावी अंमलबजावणी केली गेली. त्यासाठी कृषी विभागाकडून अनुदान दिले जात होते. यंदा मात्र राज्यात करोनाचे संकट आले आणि त्याचा पहिला फटका कृषी विभागाच्या मागेल त्याला शेततळे योजनेला बसला आहे.
सरकारने या योजनेच्या तरतुदीमध्ये घट केल्याने या योजनेच्या कामाला ब्रेक लावला आहे. शेततळ्यांची मागणी ऑनलाइन नोंदवली जात होती. मात्र शासनाने योजनेशी संबंधित संकेतस्थळ बंद केले आहे. याशिवाय ठिबक सिंचनासाठीची नोंदणीदेखील बंद आहे. मागेल त्याला शेततळे योजनेच्या अनुदानातून शेततळे खोदाई पूर्ण होत नव्हती. या अनुदानात वाढ करावी अशी शेतकऱ्यांची मागणी असताना दुष्काळग्रस्त भागाला वरदान ठरलेली ही योजनाच सध्या बंद केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
Leave a comment