सात दिवसांची झुंज अपयशी
जळगाव -
महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. राजकीय नेते आणि मंत्र्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. जळगावमध्ये भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार आणि भारतीय जनता पार्टीचे ग्रामीण जळगाव जिल्हा अध्यक्ष हरिभाऊ जावळे यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे.
हरिभाऊ जावळे यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं. जळगावमध्ये त्यांची स्वॅबची चाचणी केली असता कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे जावळे यांना उपचारासाठी मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. गेल्या सात दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, आज दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
हरिभाऊ जावळे यांनी दोन वेळा जळगावमधून खासदार म्हणून निवडून आले होते. तसंच त्यांनी दोन वेळा त्यांनी विधानसभा निवडणूकही जिंकली होती. हरिभाऊ जावळे सध्या जळगाव जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहत होते.
हरिभाऊ जावळे यांच्या निधनामुळे संपूर्ण जळगाव जिल्ह्यासह राजकारण आणि समाजात मोठी हळहळ व्यक्त करण्यात आहे.
Leave a comment