नवीदिल्ली । वृत्तसेवा
सोमवारी सकाळपर्यंत भारतातील करोनाबाधितांचा आकडा 17,265 पर्यंत पोहचला तर 543 जणांना आपला जीव गमवावा लागलाय. मात्र, दिलासादायक म्हणजे सध्याच्या घडीला देशातील तब्बल 339 जिल्हे करोनामुक्त आहेत. त्यामुळे, या भागांना लॉकडाऊनमधून थोडी सूट (सशर्त) मिळण्याची चिन्हं आहेत. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशातील एकूण 747 जिल्ह्यांपैंकी तब्बल 408 जिल्ह्यांतून करोना संक्रमणाची प्रकरणं समोर आली आहेत. मात्र सध्या 339 जिल्ह्यांमध्ये एकही रुग्ण आढळलेला नाही. केंद्राच्या निर्देशानुसार, राज्यांनी आपल्या जिल्ह्यांना रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये विभागलं आहे. जवळपास 180 जिल्ह्यांना रेड झोनमध्ये ठेवण्यात आलंय. तर 228 जिल्ह्यांना ऑरेंज झोन घोषित करण्यात आलंय. 10 किंवा याहून अधिक करोनाबाधित रुग्ण असलेल्या जिल्ह्यांना रेड झोनमध्ये ठेवण्यात आलंय. या जिल्ह्यांना लॉकडाऊनमधून कोणतीही सूट मिळणार नाही.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात सर्वाधिक करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांपैंकी 31 जिल्हे संक्रमणानं ग्रासलंय. पाच जिल्हे अद्यापही करोनामुक्त आहेत. महाराष्ट्रात उद्धव सरकारनं ग्रीन झोन आणि काही ऑरेंज झोनमध्ये लॉकडाऊन सूट देण्याची घोषणा केलीय. आजपासून राज्याच्या काही भागांत निवडक उद्योगधंदे सुरू होत आहेत. दरम्यान, महाराष्ट्रात आतापर्यंत 507 रुग्ण करोनामुक्त झालेत राजधानी दिल्लीतील सर्व अर्थात 11 जिल्हे करोनाच्या विळख्यात अडकलेत. महाराष्ट्रानंतर सर्वाधित करोनाबाधित रुग्ण दिल्लीत आढळले आहेत. दिल्लीतील करोनाबाधितांची संख्या आता 2003 वर पोहचलीय. त्यामुळे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत कोणतीही सूट दिली जाणार नसल्याचं आधीच स्पष्ट केलंय. स्थिती बिघडली तर आपण कधीच स्वत:ला माफ करू शकणार नाही, असंही त्यांनी म्हटलंय. पुढच्या आठवड्यात सूट देण्याबद्दल विचार केला जाईल, असं सांगत त्यांनी नागरिकांना आश्वस्त केले आहे. करोनाबाधित राज्यांच्या यादीत महाराष्ट्र आणि दिल्लीनंतर तिसरा क्रमांक लागतोय तो गुजरातचा... गुजरातच्या 33 पैंकी 22 जिल्ह्यांत करोनाबाधित रुग्ण आढळलेत. गुजरातची राजधानी अहमदाबाद आता करोना व्हायरसचा हॉटस्पॉट बनताना दिसतेय. गुजरातमध्ये रविवारी एकाच दिवशी तब्बल 367 करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यातील 239 रुग्ण केवळ अहमदाबादमधील आहेत. राज्यात एव्हाना 63 जणांचा मृत्यू झालाय.
देशातील करोनामुक्त ठरलेलं पहिलं राज्य : गोवा
करोनामुक्त होणारं गोवा हे पहिलं राज्य ठरलंय. रविवारी, गोव्यातील सर्व रुग्णांवर उपचार यशस्वी ठरल्याचं आणि राज्यात एकही नवीन रुग्ण न सापडल्यानं गोवा ’करोनामुक्त’ झाल्याचं राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी जाहीर केलंय. रविवारी सर्व करोना चाचण्या निगेटिव्ह आल्यानंतर सर्व रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आलीय. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून याअगोदरच दक्षिण गोवा जिल्ह्याला ग्रीन झोन घोषित करण्यात आलंय. करोनामुक्त झाल्यानंतर आता संपूर्ण राज्यच ग्रीन झोन म्हणून घोषित करण्याचा मार्गही मोकळा झाला आहे.
Leave a comment