मुंबई / वार्ताहर
संपूर्ण महाराष्ट्रासह देशाचं लक्ष लागून राहिलेल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. विधानसभा निवडणुकीतील निकालांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. अशातच एक धक्कादायक अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एक मोठा राजकीय भूकंप होऊ शकतो. अजित पवारांकडून शरद पवारांच्या आमदार फोन करण्यात आल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.त्यामुळे लोकप्रश्न ने बीडचे शरद पवार गटाचे विजयी उमेदवार संदिप क्षीरसागर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा फोन लागू शकला नाही.
विधानसभेच्या 288 जागांपैकी तब्बल 227 जागा महायुतीनं जिंकल्या आहेत. भाजपनं सर्वात जास्त 131 जागा जिंकल्या आहेत. शिवसेनेनं 55 जागांवर विजय मिळवला आहे. तर, अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं 41 जागा जिंकल्या आहेत. महाविकास आघाडीने एकूण 48 जागा जिंकल्या आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं 21 जागा जिंकल्या आहेत. तर, काँग्रेसने 17 जागांवर विजय मिळवला आहे. तर, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला फक्त 10 जागा जिंकल्या आहेत.
अजित पवारांकडून शरद पवारांचे आमदार आणि प्रतिनिधी गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. यासंदर्भात अजित पवारांकडून शरद पवारांच्या पराभूत उमेदवारांना आणि निवडून आलेल्या आमदारांना फोन गेल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
शरद पवारांनी 2 मे 2023 मध्ये राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली. त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरु केलं. पुढं शरद पवारांनी चारच दिवसांत राजकीय निवृत्तीचा निर्णय माघारी घेतला. पण यामुळं अजित पवार आणि शरद पवार यांच्यात दरी निर्माण झाली होती पुढं 2 जुलै 2023 रोजी राष्ट्रवादीत फूट पडली. अजित पवारांनी महायुती सरकारमध्ये सामील होत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
अजित पवारांचा खरे यांना फोन?
अजित पवारांचा उमेश पाटील आणि शरद पवार गटाचे विजयी उमेदवार राजू खरे यांना अभिनंदनाचा फोन आल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते उमेश पाटील यांनी ही माहिती दिली आहे. मोहोळ विधानसभेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार यशवंत माने यांचा दारुण पराभव झाला. अजित पवार गटाचे मातब्बर नेते राजन पाटील यांचे विरोधक असलेले उमेश पाटील हे राजू खरे यांच्या विजयाचे शिल्पकार मानले जातात. त्यांना अजित पवारांनी फोन केल्याची माहिती आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.
उमेश पाटील काय म्हणाले?
राजन पाटील यांची जुलमी, दडपशाही, हुकूमशाही वृत्तीला आमचा विरोध होता तो मतात रूपांतरीत केला. अजित पवारांनी मला फोन करून माझे आणि आमचे उमेदवार राजू खरे यांचे अभिनंदन केलं आहे, असं राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते उमेश पाटील यांनी म्हटलं आहे.
Leave a comment