बीडची जनता हुशार, कल पाहुन मतदान होणार

बीड । वार्ताहर

बीड जिल्ह्यात सहा विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वात जास्त उमेदवारांची भाऊगर्दी बीड विधानसभा मतदार संघात झाली असुन लोकसभेला जरांगे फॅक्टरचा परिणाम झाल्याने मराठा उमेदवारांचीही संख्या वाढली आहे. बीड विधानसभा मतदार संघामध्ये जवळपास 12 उमेदवार भावी आमदार म्हणून फिरत आहेत.काही महिन्यांपुर्वी झालेल्या कार्यक्रमात प्रत्येकानेच मग तो भाजपाचा असेल शिंदे सेनेचा असेल ठाकरे सेनेंचा असेल, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा असेल सर्वच पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी कुठल्याही कार्यक्रमाच्या डिजीटलवर भावी आमदार म्हणुनच इच्छूकांचा उल्लेख केलेला आहे.

बीड विधानसभा मतदार संघामध्ये विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, माजी मंत्री सुरेश नवले, शिवसंग्रामच्या ज्योतीताई मेटे,भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे डॉ.योगेश क्षीरसागर, दिलीप गोरे, बाजीराव चव्हाण, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक बी.बी जाधव, अशोक लोढा, भागवत तावरे, यांच्यासह संपादक शेख तय्यब, फारूक पटेल, शेख निजाम, शेख शफिक, केजीएनचे प्रदेशाध्यक्ष जहीर कादरी, वंचितचे अशोक हिंगे हे विधानसभेसाठी इच्छूक उमेदवार आहेत. यामध्ये माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, आ.संदिप क्षीरसागर, अनिल जगताप आणि ज्योती मेटे हे चार उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात परस्परांच्या विरोधात टिकू शकतात. ही वस्तूस्थिती असली तरी सर्वच जण भावी आमदार म्हणून मिरवत आहेत. या गर्दीमध्ये कोणाचे नशीब उजाडेल हे सांगता येत नाही. सर्वच जण भावी आमदार म्हणुन फिरत असले तरी बीडची जनता ही तेवढीच हुशार आहे. कल पाहुन आणि उमेदवार पाहुन मतदान करण्याची मानसिकता जनतेची आहे.
विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूकीचे वारे वाहु लागले असुन कालच मनोज जरांगे यांनी उमेदवार उभे करण्याची घोषणा केली. लोकसभा निवडणुकीमध्ये जरी मुस्लिम आणि मराठा मतदार मोदी विरोध म्हणुन शरद पवारांच्या तुतारी मागे गेली आणि त्यात बजरंगे सोनवणे निवडून आले. विधानसभा निवडणुकीमध्ये प्रत्येक मतदार संघात वेगवेगळी परिस्थिती आहे. एवढे मात्र खरे आहे की प्रत्येक मतदारसंघामध्ये जरांगेंच्या मराठा फॅक्टर काहींना काही परिणाम होणारच आहे. त्यामुळे ही निवडणुक ओबीसी विरूध्द मराठा अशीच रंगणार आहे. यामध्ये दोन क्षीरसागर सोडले तर बाकी इतर उमेदवार मराठा आणि मुस्लिम समाजाचे आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून ते छाननी होईपर्यत यातील किती उमेदवार रिंगणात राहतात आणि कोणात फाइट होते हे उमेदवार अंतिम झाल्यावरच चित्र स्पष्ट होणार आहे.

आता नाही तर कधीच नाही कोणाचीही लॉटरी लागू शकते
 

विधानसभेच्या रिंगणामध्ये उमेदवारांची जी गर्दी झाली आहे. ती केवळ जणू ही निवडणूक शेवटची आहे. प्रत्येकजण आपले वय आणि राजकारण सांगत आहे. आता नाही तर कधीच नाही असे शब्द वापरूनआपण विधानसभा लढवणारच अशी गर्जना करत अनेकांनी मतदार संघात संपर्क दौरे सुरू केले आहे. काहींनी वेगवेगळ्या कार्यक्रमातून शक्ती प्रदर्शन केले तर काहीजण पक्षाच्या उमेदवारीच्या प्रतिक्षेत आहेत.  शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे तिकिट संदिप क्षीरसागरांना पक्के असुन इतर कोणत्याही पक्षाचे तिकिट अजुन अंतिम झालेले नाही. उमेदवारांच्या गर्दीमध्ये कोणाचीही लॉटरी लागू शकते असेही बोलले जात आहे.

तिघेही उभा राहिले तर क्षीरसागर संपणार

अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून डॉ.योगेश किंवा डॉ.सारिका क्षीरसागर इच्छूक आहेत. संदिप क्षीरसागर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून मैदानात उतरणार आहेत. माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते जयदत्त क्षीरसागर हे अपक्ष लढण्याच्या तयारीत आहेत. त्यांनाही शरद पवारांच्या राष्ट्रवादीची उमेदवारी भेटू शकते किंवा शिंदे सेनेची उमेदवारी भेटू शकते अशी चर्चा आहे. गेवराईत जशी पंडित मुक्त मोहिम राबवली गेली. तशीच बीडमध्ये देखिल क्षीरसागर मुक्त बीड अशी मोहिम दुसर्‍या फळीतील मराठा कार्यकर्ते राबवत आहेत. त्यांना किती यश येईल हे सांगता येत नाही. मात्र तिघेही क्षीरसागर रिंगणात आले तर तिघेही पराभूत होतील असेही लोक बोलत आहेत. यामुळे क्षीरसागरांनी आता भविष्याचा वेध घेत आपल्या राजकारणाची दिशा ठरवावीअसा मतप्रवाह ओबीसी मतदारांमध्ये आहे.

‘माजी’ चे अस्तित्वहिन राजकारण

बीड मतदारसंघामध्ये पाच ते सहा माजी आमदार आहेत. मध्यंतरी एका कार्यक्रमात प्रा.सुरेश नवले यांनी माजी आमदारांची संघटना स्थापन केली होती. मात्र विद्यमान राजकीय परिस्थितीमध्ये माजी आमदारांचे राजकीय अस्तित्व धोक्यात आले आहे. माजी आमदार असले तरी त्यांनी राजकारणात सक्रीय राहण्यासाठी जनतेच्या कुठल्या प्रश्नावर आंदोलन केले, निवेदन दिले किंवा बीड शहरासाठी विकासात्मक भुमिका घेतली असे मतदार बोलत असून माजी आमदारांचे अस्तित्वहिन राजकारण झाल्याचे बोलले जात आहे.

पाच मुस्लिम उमेदवार इच्छूक

मुस्लिमांच्या मतांची गोळाबेरीज करूनही मते एकाच्याच पारड्यात पडली तर मुस्लिम समाजाचाही आमदार होवू शकतो आणि समाज आपल्याच पाठीशी आहे असे गृहीत धरून निवडणूक रिंगणात पाच मुस्लिम उमेदवार गुडघ्याला बाशींग बांधून आहेत. त्यापैकी संपादक शेख तय्यब आणि फारूक पटेल हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून इच्छूक असून एमआयएमकडून शेख शफिक तर बंडखोर शिवसैनिक म्हणुन शेख निजाम निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे. या इच्छूकांच्या उमेदवारीचा फटका कोणाला बसणार याचीही जोरदार चर्चा सुरू आहे.

अशोक हिंगे पुन्हा लढणार

लोकसभा निवडणूकीत 50 हजार मते घेणार्‍या अशोक हिंगे यांनी देखिल विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. वंचितकडून बबन वडमारे यांचेही नाव चर्चेत आहे. आंबेडकर आता कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ घालतात हे आठवडा भरात दिसून येईल.

ज्योती मेटे तिसर्‍या आघाडीबरोबर

संभाजीराजे, बच्चू कडू आणि राजु शेट्टी यांनी स्थापन केलेली परिवर्तन आघाडी समवेत जाण्याचा निर्णय डॉ.ज्योतीताई मेटे यांनी घेतला असून बीडमध्ये त्या या आघाडीच्या उमेदवार म्हणुन उभा राहणार असल्याचेही बोलले जात आहे. मात्र त्यांच्याकडून अद्यापही काही स्पष्टीकरण दिले गेले नाही. या आघाडीमध्ये शिवसंग्राम सहभागी होवून राज्यात पाच जागा लढणार असल्याचे बोलले जात आहे.दरम्यान त्यांनी कालच मनोज जरांगे यांची त्यांच्या कार्यालयात जावून भेट घेतली आहे.

जरांगेंच्या आशेवर पाच मराठा उमेदवार

माजी मंत्री प्रा.सुरेश नवले, बी.बी.जाधव, जिल्हाप्रमुख अनिल जगताप, दिलीप गोरे, गंगाधर काळकुटे हे पाच मराठा उमेदवार मनोज जरांगेंच्या आशेवर भावी आमदार म्हणुन निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचीही चर्चा आहे. अनिल जगताप यांना शिंदे सेनेची उमेदवारी मिळाली तरी त्यांना जरांगेंचा आशिर्वाद आवश्यक आहे. बी.बी जाधव हे तुतारी वाजविण्यास इच्छूक असून त्यांनाही जरांगेंच्या आशिर्वादाची गरज आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे गेल्या काही दिवसापासून जरांगेंचे उघडपणे समर्थन करून प्रत्येक कार्यक्रमामध्ये महत्वाची भुमिका बजावणारे सुरेश नवले हे देखिल अपक्ष म्हणुन रिंगणात उतरणार असून मनोज जरांगे हे आपल्यालाच मदत करतील या आशेवरती आहेत. जरांगे नेमके काय करणार? बीड विधानसभा मतदारसंघात कोण उमेदवार देणार? यावरही बरेच काही अवलंबून असणार आहे.

धनंजय मुंडे-पंकजा मुंडेंची भुमिकाही महत्वाची

परळी विधानसभा मतदार संघात धनंजय मुंडे हे उमेदवार म्हणुन रिंगणात असले तरी बीड विधानसभा मतदार संघासह सर्वच विधानसभा मतदार संघात त्यांची भुमिका ही महत्वाची राहणार आहे. एकीकडे खा.बजरंग सोनवणे यांनी काही दिवसापुर्वीच बीड जिल्ह्यात सहाची सहा आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे निवडून येणार अशी घोषणा केलेली आहे. त्यामुळे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांची भुमिका देखिल महत्वाची ठरणार आहे. 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.