उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना इशारा

 

उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर फडणवीसांचे दोन शिलेदार उतरले मैदानात

 

मुंबई : मला आणि आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी अनेक डाव खेळले. माझ्या कुटुंबावर चालून आले. परंतु तरीही मी सगळे सहन करून हिमतीने उभा राहिलोय, असे सांगतानाच एक तर तू राहशील नाहीतर मी राहिन, असा उघड इशाराच मूळ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना दिला.

मुंबईतील रंगशारदा सभागृहात झालेल्या पक्षाच्या मेळाव्यात ते बोलत होते. उद्धव ठाकरेंच्या या इशाऱ्यानंतर भाजपनेही पलटवार केला आहे. फडणवीसांच्या दोन शिलेदारांनी ठाकरेंवर निशाणा साधला आहे. भाजप आरे ला कारे करेन, अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलंय. तर, सुधीर मुनगंटीवार यांनीही महाभारतातील कौरवाची उपमा दिलीय.   

उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध थेट 'आर या पारची' भूमिका घेतल्याने आगामी काळात ठाकरे गट आणि भाजपमधील संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत. उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर आता भाजपनेही पलटवार केला आहे. ''मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो, नाशिकच्या मिरवणुकीत पाकिस्तानचे झेंडे होते, मुंबईच्या मिरवणुकीत पाकिस्तानचे झेंडे होते. आता तर त्यांनी काय म्हटलं, मी मुस्लीम मतं, ख्रिश्चन मतांच्या जीवावर फडणवीसांना बघून घेईल, भाजपला बघून घेईन, त्यांच्या नेत्यांना बघून घेईल, त्यांच्या अंगावर जा. ही चिथावणी तुम्ही कोणाला देता, कोणाच्या भरोशावर देता, असा पलटवार भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. तसेच, राज्यात धारावीसारखे हत्याकांड होत आहेत. उद्धव ठाकरेंना ही चिथावणीची भाषा शोबत नाही, हे राज्य संस्कारमय राज्य आहे. या राज्यात जाती-पातीचं राजकारण करुन समाजात तेढ निर्माण करण्याचं काम आज तुम्ही केलंय. या राज्यात हिंदू-मुस्लीम समाज कधीही वेगळा राहत नाही, पण तुम्ही समाजाचं ध्रुवीकरण करत आहात, यावर आमचा आक्षेप आहे.'' 

भाजप आरेला कारे करेल

हरहर महादेव म्हणून अशी भाषा वापरायची, हे बाळासाहेबांचे संस्कार आहेत का, असा सवाल करत भाजप आरे ला कारे केल्याशिवाय राहणार नाही, असेही बावनकुळे यांनी म्हटले. 10 वर्षे उद्धव ठाकरेंनी मोदींच्या भरोशावर आपले खासदार निवडून आणले, आता ते सर्व उपकार विसरले आहेत, असेही बावनकुळे यांनी म्हटले. 

उद्धव ठाकरे लोकशाहीच्या लढाईत कौरवांच्या बाजूने - सुधीर मुनगंटीवार

महाभारतात कर्णाने अर्जुनाला असाच इशारा दिला होता, इथेही असंच काहीसं घडतंय, अशी प्रतिक्रिया भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. कर्ण हा पांडवांचा भाऊ होता. इतिहासाची पुनरावृत्ती होते. बाळासाहेब ठाकरे कधीच काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत जाऊ शकत नव्हते. काँग्रेससोबत ज्या दिवशी जावं लागेल, त्यादिवशी मी माझं दुकान बंद करेन, असे त्यांनी म्हटले होते. पण दुर्दैवाने जी कर्णाची भूमिका दुर्योधनाच्या आणि कौरवाच्या बाजूने जाण्याची होती, ती भूमिका उद्धवजींनी या लोकशाहीच्या युद्धात घेतली आहे. कर्ण ज्याप्रकारे अर्जुनाला उद्देशून बोलायचा, एकतर तू राहशील किंवा मी राहीन, तीच भाषा, तोच भाव, तीच कथा, तोच प्रसंग हे आपण आता लोकशाहीच्या युद्धात पाहतोय. कोणीही कोणाला धडा शिकवण्याची भाषा कधी करु नये. रावणाने भाषा केली, कंसाने भाषा केली, जेव्हा जेव्हा अशी भाषा केली जाते, आपण शकुनीसारख्या लोकांच्या नादी लागतो, तेव्हा आपण किती शक्तिशाली असलो तरी अपयशच आपल्या वाट्याला येते, असे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले.

मी जिद्दीने उभे राहिलो

सर्व सहन करुन मी जिद्दीने उभे राहिलो आहे. आता राजकारणात एकतर फडणवीस राहतील किंवा मी राहणार आहे. मुंबईत राहून तुम्ही मराठी माणसाला घर देणार नाही, नोकरी देणार नाही. चालले तरी काय? जिकडून तुम्ही आला आहात, तिकडे जा. आता या ठिकाणी प्रचाराला या. मग तुमची उरली सुरली गुरमी उतरवतो, असे उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता म्हटले. त्यांना शिवसेना संपवयाची आहे. त्यांच्याकडे एका बाजूला सत्ता, पैसा आणि शासकीय यंत्रणा आहेत. परंतु माझ्या बाजूला कार्यकर्ते आहेत.

बूटचाट्यांनी खुर्चीसाठी वार केले

मुंबईतील निवडणूक शेवटच्या टप्प्यापर्यंत व्हायला पाहिजे होती. त्यानंतर त्यांचे उरले सुरले कपडेही उतरवले असते. तुम्ही आमदार, खासदार खरेदी केले असतील पण जीवाला जीव देणारे कार्यकर्ते खरेदी करु शकत नाही. बूटचाट्यांनी खुर्चीसाठी आईच्या कुशीवर वार केले, असा हल्ला उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केला.

 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.