बीड । वार्ताहर
येथील माजी मंत्री सुरेश नवले यांचे स्वीय सहायक ललित अब्बड यांच्यावर दुचाकीवरून येत दोघांनी धारदार शस्त्राने वार केले. सुदैवाने हे वार चुकवल्याने त्यांच्या हाताच्या मनगटावर जखमा झाल्या. हल्ल्याची ही घटना बुधवारी (दि.17) रात्री 9 वाजेच्या सुमारास बीड शहरातील महावीर चौकात घडली. दरम्यान अब्बड यांच्यावर जिल्हा रूग्णालात उपचार सुरू असून त्यांना भेटण्यासाठी अनेकांनी रुग्णालयात धाव घेतली.
पेठबीड भागातील महावीर चौकात ललित अब्बड यांचे घर आहे. बुधवारी (दि.17) रात्री 9 वाजेच्या सुमारास ते घरासमोर उभा होते. यावेळी दुचाकीवरून दोघेजण आले.अब्बड यांना काही कळण्याच्या आतच त्यांनी धारदार शस्त्राने मानेवर वार करण्याचा प्रयत्न केला. परंतू अब्बड यांनी अचानक पाहिल्याने हा वार चुकवत हातावर घेतला. यात त्यांच्या उजव्या हाताच्या मनगटावर मोठी जखम झाली आहे. तसेच डाव्या हाताच्या मनगटावरही जखम झाली असून टाके घेण्यात आले आहेत. हल्ला केल्यानंतर हे दोघेही दुचाकीवरून पसार झाले. हल्ल्यानंतर अब्बड यांनी आरडाओरडा केल्याने परिसरातील लोक धावून आले. त्यांनी अब्बड यांना तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्लेखोर हे ओळखीचे असल्याची चर्चा रूग्णालय परिसरात होती. रात्री उशीरापर्यंत जवाब न झाल्याने या प्रकरणात पोलिस दप्तरी नोंद झालेली नव्हती.
Leave a comment