मनोज जरांगे पाटलांचं सर्वपक्षीय मराठा नेत्यांना आवाहन
छत्रपती संभाजीनगर:
राज्यातील सर्वपक्षीय ओबीसी नेते हे त्यांच्या जातीचे आरक्षण वाचवण्यासाठी एकजुटीने उभे राहिले आहेत. त्यामुळे मी एकटा पडलो असून आरक्षणाअभावी मराठा जात संकटात सापडली आहे. आपल्या समाजाच्या लेकरांचं वाटोळं होऊ द्यायचं नसेल तर आपण सगळ्यांनी एकत्र राहिले पाहिजे. त्यासाठी 6 जुलैपासून सुरु होणाऱ्या मराठा समाजाच्या शांतता जनजागृती रॅलीला मोठ्या संख्येने उपस्थित राहा, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले. ते सोमवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी नेत्यांवर आगपाखड केली. आरक्षण मिळाल्यावर गोरगरीब मराठ्यांची लेकरं मोठी होतील, ते मोठे अधिकारी होतील, अशी भीती सगळ्यांना वाटते. त्यामुळे मी आरक्षणाच्या बाजूने उभं राहू नये म्हणून सगळ्यांनी मला घेरले आहे. मी एकटा पडलो आहे. सत्ताधारी पक्षातील मराठे नेते माझ्या बाजूने बोलत नाही, त्यांनी मला उघडं पाडलं आहे. विरोधी पक्षातील खासदारही माझ्या बाजूने बोलत नाहीत. पण मराठा समाजाने एकजूट राहावे, ही माझी विनंती आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, भाजपा, अजित पवार गटातील, शिवसेना शिंदे गट, शरद पवार गट, काँग्रेसचे या सर्व पक्षातील ओबीसीचे नेते एकत्रित आले. कुणाला पक्षाला मोजायलाच तयार नाही. मराठ्यांना आरक्षण मिळू द्यायचं नाही यासाठी हे सगळे एक झालेत. हे मराठा नेत्यांना दिसत नाही का? ते पदाला किंमत देत नाही. पण मराठा नेते पदाला आणि मताला इतकी किंमत का द्यायला लागलेत. मी एकटा पडलोय, मराठ्यांच्या आरक्षणाने बाजूने असल्याने मला सगळ्यांनी घेरलंय मी एकटा पडलोय. सत्ताधारी-विरोधी पक्षातील मराठा नेते बोलत नाही. त्यामुळे मराठा समाजाने एकजूट राहावे. जात संकटात सापडलीय, मराठ्यांची पोरं संकटात आहेत. ताकदीने एकत्र या असं आवाहन आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच ६ जुलैपर्यंत सगळी कामे उरकून घ्या, ६ जुलैला जिथं मराठा जनजागृती रॅलीचं नियोजन केलंय तिथे एकही मराठा घरी न राहता, त्यादिवशी लग्न कार्यालाही जायचे नाही. जिल्हा जिल्ह्यात ताकदीने उपस्थित राहा. आपल्याला घेरलंय, आपली जात संकटात सापडलीय. मी एकटा पडलोय. मी हटत नाही. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय मी मागे हटणार नाही असंही जरांगेंनी म्हटलं.
दरम्यान, शाहीरीच्या माध्यमातून आता तलवारी गंजल्या घासून ठेवा असा इशारा भुजबळांनी दिला तो धोकादायक आहे. त्यांना मराठ्यांसोबत दंगल घडवायची, जातीजातीत तेढ निर्माण करायचे आहे. मराठ्यांनी शांततेत राहावे, आपण आधी सुरुवात करायची नाही परंतु आपणही तयारीनं राहा. मराठा हा कडवट आहे. भीणारा नाही. जर यांनी तसा प्रयोग केला, हत्यारे वाटायचे काम केले, दंगली घडवायचा प्रयत्न केला तर आपण हात बांधून बसायचं नाही, कारण यांच्या हातून आपला एकही मराठा मरता कामा नये. हे राज्य शांत राहिलं पाहिजे. मराठ्यांच्या विरोधात बोलायला भुजबळांनी माणसं पेरली आहेत. भुजबळ चिथावणी द्यायला लागलेत. मराठ्यांनी सावध राहा. आपण एकटेच ५०-५५ टक्के आहोत. जर तसा प्रयोग झाला तर आमचा नाईलाज आहे. जशास तसं उत्तर देऊ. आम्ही कडवट क्षत्रीय मराठे उत्तराला उत्तर देणार असा गंभीर इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी केला.
Leave a comment