ज्वारी-सोयाबीनची सर्वाधिक आवक;
आडत व्यापार्यांकडून 40 हजार 271 क्विंटल धान्याची खरेदी
बीड । सुशील देशमुख
जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या बीड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आडत व्यापार्यांकडून 1 जानेवारी ते 31 मे 2024 या पाच महिन्याच्या कालावधीत तब्बल 17 कोटी 35 लाख 96 हजार रुपयांची धान्य खरेदी झाली आहे. बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील 7 हजार 976 शेतकर्यांचे 40 हजार 071 क्विंटल धान्य बाजार समितीतील सर्व आडत व्यापार्यांनी खरेदी केले आहे. यामध्ये ज्वारीची सर्वाधिक 16 हजार 711 क्विंटल तर त्या खालोखाल 11 हजार 366 क्विंटल सोयाबीनची खरेदी आडत व्यापार्यांनी केली आहे.
गतवर्षी बीड जिल्ह्यामध्ये पावसाअभावी दुष्काळी स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे खरीप हंगाम अक्षरशः कोरडा गेला. तसेच रब्बी हंगामातही पावसाने पाठ फिरवल्यामुळे फारसे उत्पादन झाले नव्हते. रब्बी हंगामात ज्वारीसह, गव्हू हरभर्याचे पीक घेतले जाते; मात्र पावसाने मोठी उघडीप दिल्याने त्याचा मोठा फटका शेतकर्यांना बसला होता. पर्यायाने गहू आणि ज्वारीचे उत्पादन घटले, म्हणूनच बाजारात विक्रीसाठी यंदा तुलनेने कमी धान्य आल्याचे आडत व्यापार्यांनी सांगितले. किमान ते कमाल भाव तसेच सरासरी मिळणारा भाव समाधानकारक राहिल्याने शेतकर्यांनी आपला शेतमाल विक्रीला प्राधान्य दिले. शेतकर्यांना वेळेत पैसेही मिळाले.
महत्वाचे म्हणजे पाच महिन्याच्या कालावधीत ज्वारीची विक्रमी 16 हजार 711 क्विंटल खरेदी झाली. ज्वारीला सरासरी 2604 रुपये क्विंटलचा भाव मिळाला. 3 हजार 714 शेतकर्यांकडून 4 कोटी 53 लाख 60 हजार रुपयांची ज्वारी खरेदी व्यापार्यांनी केली आहे. तसेच 741 शेतकर्यांकडून (11 हजार 366 क्विं.) 5 कोटी 18 लाख 16 हजार 745 रुपयांची सोयाबीनची खरेदी केली. तसेच 1913 शेतकर्यांकडून 6 हजार 67 क्विंटल तूर खरेदी करत 5 कोटी 64 लाख 99 हजार 630 रुपयांची ‘पट्टी’ शेतकर्यांना मिळाली आहे. व्यापार्यांकडून सरासरी 9 हजार 169 प्रति क्विंटल दराने तूर खरेदी करण्यात आली आहे.
या धान्यमालाची होतेय खरेदी
बीड येथील शिदोड रोडरवरील कृषी बाजार समितीत ज्वारी, बाजरी, गहू, मका, उडीद, मूग, तूर, सूर्यफूल हरभरा, तीळ, मोहरी, एरंडी, जवस, करडई, चिंच, धने, चिंचोका, कारळे, भुईमूग, शेंगा, सोयाबीन आणि राजमा या धान्याची खरेदी केली जाते. मात्र सर्वाधिक खरेदी ज्वारी, सोयाबीन, तूर, बाजरी, आणि गव्हाची झाल्याचे बीड बाजार समितीच्या कार्यालयात नोंद झालेल्या धान्य खरेदीच्या आकडेवारीवरून दिसून येते.
Leave a comment