विविध ठिकाणच्या चोरीच्या 16 दुचाकी जप्त
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; नऊ गुन्हे उघडकीस
बीड । वार्ताहर
बीड जिल्ह्यासह पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालना व सातारा या जिल्ह्यात दुचाकी चोरी करणारी आंतरजिल्हा टोळी उघड करण्यात बीड स्थानिक गुन्हे शाखेला यश आले. या टोळीतील त्रिकुटाला गजाआड करण्यात आले. त्यांच्याकडून चोरीच्या 9 लाख 90 हजार रुपये किमतीच्या 16 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या चोरट्यांनी 9 गुन्ह्यांची कबुली दिली आहे.
अभिजीत सटवा वाघमारे (वय 21), आदित्य सटवा वाघमारे (वय 19) व शहादेव भिवाजी अवघडे (वय 23 सर्व रा.हिवरा, ता.माजलगाव) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहेत. त्यांना पुढील तपासकामी माजलगाव शहर पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. तसेच त्यांच्याकडील चोरीच्या एकूण 16 दुचाकीही माजलगाव पोलीसांच्या ताब्यात देण्यात आल्या असल्याचे पो.नि.संतोष साबळे यांनी ‘लोकप्रश्न’शी बोलताना सांगितले.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून माजलगाव व गेवराई उपविभागातील दुचाकी चोरीतील आरोपींचा शोध सुरु होता. वरील तिघांनी काही दिवसांपुर्वी दुचाकी चोरी केल्या असून ते हिवरा पाट्याजवळ उभे असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली. त्यानंतर छापा मारुन तिघांनाही पोलीसांनी ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी माजलगाव शहर येथील एक दुचाकी चोरी केल्याचे निष्पन्न झाले. तसेच त्या दुचाकीबाबत माजलगाव शहर ठाण्यात चोरीचा गुन्हा नोंद असल्याची माहिती मिळाली. संशय आल्याने तिघांकडे पोलीसांनी विचारपूस करताच त्यांनी दुचाकी चोरीचा आलेखच पोलीसांसमोर मांडला. या टोळीने तीन इसमांना अधिक विचारपुस केली असतां त्यांनी पुणे जिल्ह्यातून 2, जालना 5, छत्रपती संभाजीनगर 2, सातारा जिल्ह्यातून 5 व परभणी जिल्ह्यातून 2, अशा एकूण 16 दुचाकी चोरी केल्याची माहिती दिली. या सर्व दुचाकी त्यांच्याकडून पोलीसांनी ताब्यात घेत जप्त केल्या.
यांनी केली कामगिरी
ही कामगिरी पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा पो.नि.संतोष साबळे माजलगाव शहर ठाणे निरीक्षक केतन राठोड, उपनिरीक्षक संजय तुपे, सहायक फौजदार हनुमंत खेडकर, पोह.कैलास ठोंबरे, नसिर शेख, अशोक दुबाले, भागवत शेलार, देविदास जमदाडे, तुषार गायकवाड, निलेश ठाकुर, मच्छिंद्र बीडकर, पोशि/बप्पा घोडके, विकी सुरवसे, चालक गणेश मराडे यांनी केली.
Leave a comment