निवडणूक लढवण्यासंदर्भात जनतेत जावून घेणार निर्णय
बीड । वार्ताहर
लोकसभा निवडणूकीच्या रणांगणात डॉ.ज्योतीताई मेटे यांच्या हातात आलेला उमेदवारीचा घास अचानक हिरावून घेतला गेल्याची भावना बीड जिल्ह्यातील आणि राज्यातील शिवसंग्राम कार्यकर्त्यांची झाली आहे. बीड जिल्ह्यामध्ये स्व.विनायक मेटे यांचे राजकारण आणि समाजकारणात स्वतंत्र अस्तित्व होते. मराठा आरक्षणासाठी अभ्यासूपणे सातत्याने त्यांनी संघर्ष केला होता. सरकार कोणाचेही असो, प्रश्न मांडायचे आणि सोडवून घ्यायचे याची हातोटी त्यांच्यात होती. त्यांच्याच पाऊलावर पाऊल ठेवून मेटेंच्या पश्चात शासकीय सेवेत असूनही डॉ.ज्योती मेटे यांनी गेल्या दीड वर्षाच्या कालावधीत मराठा आणि इतर समाजातील कार्यकर्त्यांच्या अडी-अडचणी सोडवण्यासाठी सतत शासन दरबारी प्रयत्न केले आहे. भाजपाने उमेदवारी न दिल्याने आणि समर्थकांच्या आग्रहाखातर डॉ.ज्योती मेटे यांनी शरद पवारांची भेट घेवून उमेदवारीसाठी प्रयत्न केले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून त्यांना बीडची उमेदवारी मिळेलच असे चित्र जिल्हाभरात निर्माण झालेले असतानाच अचानक बजरंग सोनवणे यांची उमेदवारी जाहीर झाल्याने शिवसंग्रामसह जिल्ह्यातील मराठा समाजामध्ये नाराजीचा सूर ऐकण्यास मिळत आहे. याचा फटका निवडणूकीच्या राजकारणात बजरंग सोनवणेंना बसू शकतो अशीही चर्चा या निमित्ताने होवू लागली आहे.
डॉ.ज्योती मेटे यांनी लोकसभेच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतल्यानंतर शरद पवारांना त्या दोन ते तीन वेळेस मुंबईमध्ये भेटल्या. राष्ट्रवादी व शिवसंग्रामचे पदाधिकारी यांच्यात बैठकही झाली. जिल्ह्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी डॉ. ज्योती मेटे यांना जवळपास निश्चित झाल्याची भावना त्यांच्या समर्थकांमध्ये निर्माण झाली होती. मराठा समाजाबरोबरच मुस्लिम समाजाचे कार्यकर्तेही मेटे ताईंच्या प्रचारासाठी तयार झाले होते. एवढेच नव्हे तर डॉ.ज्योती मेटे आणि भाजपाच्या पंकजा मुंडे यांच्यात थेट लढत झाली तर पंकजा मुंडेंना अवघड जाईल अशीही चर्चा सुरु झाली होती. त्या दृष्टीने डॉ.ज्योती मेटे यांच्या किचन कॅबिनेटमधील कार्यकर्त्यांनी तयारीदेखील केली होती. डॉ.ज्योती मेटे यांना उमेदवारी भेटली तर दुसरा मराठा उमेदवार उभा राहणार नाही, असा निर्णयही समाजामध्ये झाला होता. एवढेच नव्हे तर मराठा आरक्षण आंदोलनाचे मनोज जरांगे यांच्या कानावर देखील क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी ही बाब घातली होती. त्यांनी देखील सकारात्मक निर्णय घेवू असे सांगितल्याचे त्यावेळी बोलले गेले होते. मात्र अचानक डॉ.मेटे यांच्या तोंडी आलेला उमेदवारीचा घास गळून पडला आणि अचानक पवारांनी बजरंग सोनवणे यांची उमेदवारी जाहीर केली. विशेष म्हणजे उमेदवारी जाहीर झाली त्याच्या एक दिवस अगोदर डॉ.ज्योती मेटे आणि पवारांमध्ये चर्चा झाली होती, मात्र तद् नंतर बजरंग सोनवणे यांची उमेदवारी जाहीर झाल्याने डॉ. ज्योती मेटे आणि त्यांच्या समर्थकांच्या राजकीय स्वप्नावर पाणी फेरले गेले.
या सर्व घटनाक्रमामुळे मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी आपल्या समाजामध्ये डॉ. ज्योती मेटे यांच्यावर कसा अन्याय झाला याची गेल्या दोन आठवड्यापासून चर्चा सुरु केली. त्यातूनच मराठा समाजाबरोबरच मुस्लिम समाजातही शरद पवार यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे. एक सुसंस्कृत आणि सुशिक्षित उमेदवाराला पवारांनी उमेदवारी का नाकारली असावी असा प्रश्न समाज बांधव विचारु लागला आहे. समाजाची नाराजी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे याचा फायदा वंचितचे अशोक हिंगे यांना होण्याची आहे. कारण हिंगे देखील मराठा आरक्षण आंदोलनात सुरुवातीपासूनच सक्रीय राहिलेले आहेत. समाजातही दोन मत प्रवाह असून डॉ.ज्योती मेटे यांनी शिवसंग्रामच्या बॅनरवर निवडणूक लढवावी असा एक मत प्रवाह असून अपक्ष लढून फायदा होईल का? हा विचारही दुसरा मतप्रवाह मांडत आहे, मात्र ज्योती मेटे यांनी लोकसभा निवडणूक लढवावी असा आग्रह धरणारे कार्यकर्ते मोठ्या संख्येने दिसू लागले आहेत. डॉ. ज्योती मेटे आता काय निर्णय घेतात हे आगामी काही दिवसात स्पष्ट होणार आहे.
कायम भाजपबरोबर राहणार्या मेटेंना उमेदवारी कशाला?
ज्यावेळी डॉ. ज्योती मेटे यांना शरद पवार गटाकडून लोकसभेची उमेदवारी मिळणार, अशी चर्चा सुरु झाली, त्याचवेळी शरद पवारांचे जिल्ह्यातील समर्थक कार्यकर्ते आ.संदीप क्षीरसागर व इतरांच्या माध्यमातून थेट पवारांना जावून भेटेले तर काहींनी जयंत पाटलांची भेट घेतली. गेल्या अनेक वर्षांपासून स्व.विनायक मेटे हे जिल्ह्याच्या व राज्याच्या राजकारणात स्व.गोपीनाथ मुंडे यांच्याबरोबर कायम राहिले. एवढेच नव्हे तर त्यांच्या पक्षात तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आमदार म्हणून स्व.विनायक मेटे यांनी आपली प्रतिमा निर्माण केली होती. त्यामुळेच त्यांना शिवस्मारक समितीचे अध्यक्ष करण्यात आले होते. कायम भाजपाला मदत केलेल्या आणि बीड विधानसभा मतदार संघातून भाजपाकडून निवडणूक लढवणार्या स्व.मेटेंच्या पत्नी डॉ.ज्योती मेटेंना उमेदवारी कशाला? असा थेट सवाल राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केल्याची माहिती आहे. अजित पवार फुटल्यामुळे जिल्ह्यातील दोन आमदार त्यांच्यासोबत गेले. त्याचा अर्थ मतदारही त्यांच्याबरोबर गेले असा होत नाही असा युक्तीवादही काही जबाबदार मंडळींनी पवारांसमोर मांडला.त्यामुळेच बजरंग सोनवणे यांना पवारांनी पुन्हा उमेदवारी दिल्याचे बोलले जात आहे.
बजरंग सोनवणेंनाही निष्ठावंतांकडून विरोध पण.....
लोकसभेची चर्चा सुरु झाल्यानंतर जिल्ह्यात डॉ. नरेंद्र काळे यांना पवारांनी तयारीला लागण्याचे निर्देश दिले. त्यानुसार डॉ. काळे यांनी जिल्ह्याभरात जनसंपर्क अभियान सुरु केले होते. त्यांनाही चांगला प्रतिसाद मिळाला होता, मात्र त्यांचे नाव अचानक मागे पडले.बजरंग सोनवणे यांनी गेल्यावेळी निवडणूक लढवली पण नंतरचे पाच वर्ष ते पक्षात होते की, नाही असे चित्र जिल्ह्यात होते. कारण कुठल्याही राष्ट्रवादीच्या कार्यकत्यार्र्च्या मदतीला धावून आल्याचे ते दिसले नाहीत. आपला कारखाना आणि जिल्हा परिषद या दोन गोष्टीशिवाय तिसर्या गोष्टीकडे त्यांनी लक्ष दिले नाही. यामुळेच मूळ राष्ट्रवादीचे आणि शरद पवारांना मानणारे निष्ठावंतही बजरंग सोनवणे यांच्या विरोधात होते, मात्र आता पवारांनी उमेदवारी दिली त्यामुळे त्यांचाही नाईलाज झाला आहे.
नारायणगडाचे दर्शन घेऊन डॉ.ज्योती मेटे जनतेत
गावोगावी झाले जोरदार स्वागत
बीड लोकसभेची निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली असताना महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर झाले आहेत. डॉ.ज्योती विनायकराव मेटे यांनी निवडणूक लढण्यासंदर्भात सकारात्मकता दर्शवलेली आहे. सोमवारी (दि.8) रोजी ग्रामीण भागात दौरा सुरू केला. यावेळी त्यांनी श्री.क्षेत्र नारायणगड येथे नगद नारायण महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेवून गडाचे मठाधिपती शिवाजी महाराज यांचा शुभ आशीर्वाद घेतला आणि ग्रामस्थांच्या गाठीभेटी सुरू केल्या.
बीडहून नारायण गडाच्या दर्शनासाठी निघालेल्या डॉ.ज्योती मेटे यांचे ग्रामस्थांच्या वतीने जागोजागी जंगी स्वागत करण्यात आले. नवगण राजुरी येथील प्रसिद्ध गणेशाचे दर्शन घेतले. काकडहिरा येथे भेट दिली असता ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात ढोल ताशाच्या गजरात स्वागत केले. मौजे तिप्पटवाडी, मुर्शदपूर-रुईलिंबा, बेलुरा, साक्षाळपिंपरी ,फुलसांगवी-मर्कडवाडी, सैदापुर तांदळा, मादळमोही अश्या विविध गावांना भेटलेल्या भेटी दिल्या यावेळी त्यांनी गावकर्यांची संवाद साधला याप्रसंगी उपस्थित ग्रामस्थ यांनी उमेदवारी न मिळाल्याबद्दल खंत व्यक्त करत आम्ही आपल्या सोबत असल्याची भावना बोलून दाखवली. ताई तुम्ही जो निर्णय घेतील आम्ही त्या सोबत असू अशी ग्वाही दिली. यावेळी ज्येष्ठ नेते प्रभाकर कोलंगडे, शिवसंग्राम जिल्हाध्यक्ष नारायणराव काशीद, अनिल घुमरे, नवनाथ प्रभाळे,पं.स.माजी सभापती ज्ञानेश्वर कोकाटे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पंडितराव माने, सचिन काळकुटे, खरेदी विक्री संघाचे संचालक गोपीनाथ घुमरे उद्योजक रसाळ, सरपंच नवनाथ गवते, उपसरपंच नारायण शिरसाट, नानासाहेब शेंबडे ,ओंकार शेंबडे, राहुल हाकाळे, श्रीराम हाकाळे, परमेश्वर हाकाळे, साधना दातखीळ, संदिपान दातखीळ, गणेश शेळके, भाऊराव शेळके गणेश दातखीळ, काकासाहेब महाराज दातखीळ आदींसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
Leave a comment