स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
चोरुन नेलेल्या 51 लाखांपैकी 41 लाखांची रक्कम हस्तगत
बीड । वार्ताहर
वडवणी येथे कापूस व्यापार्याला रस्त्यात अडवून बेदम मारहाण करत त्याच्याकडील 51 लाखांची रोख रक्कम लंपास करणारी चोरट्यांची टोळी पकडण्यात बीड स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांना यश आले. या प्रकरणात सात आरोपी निष्पन्न झाले असून त्यातील सहा जणांना अटक करण्यात आले. त्यांच्याकडून 41 लाख रुपयांची रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली कार जप्त करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी शनिवारी (दि.17) आयोजित पत्रकार परिषदेत लोकप्रश्न दिली.
शांतीलाल उर्फ गणेश दामोधर मुंडे (वय 21 रा.गोपाळपुरा, ता.धारुर), बालाजी महादेव पुरी (21. रा.भवानी माळ ता.केज), गोविंद उर्फ भाऊ नवनाथ नेहरकर (वय 33, रा.बाराभाई गल्ली, केज) सुर्यकांत लक्ष्मण जाधव (रा.केज), करण विलास हजारे ( वय 20 रा.केज), बालाजी रामेश्वर मैंद (वय 20 रा.गोपाळपुरा) संदिप वायबसे अशी आरोपींची नावे असून यातील संदीप वायभसे वगळता इतर 6 आरोपींना पोलीसांनी गजाआड केले आहे. त्यांच्याकडून कापूस व्यापार्याचे चोरलेले 51 लाखांपैकी 41 लाख रुपयांची रक्कम तसेच गुन्ह्यात वापरलेली कार हस्तगत करण्यात आली आहे. फरार आरोपीकडे उर्वरित दहा लाखांची रक्कम असल्याचा संशय असल्याची माहिती पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली.
या गुन्ह्याची अधिक माहिती देताना एसपी ठाकूर म्हणाले, शामसुंदर आण्णासाहेब लांडे (रा. घाटसावळी ता.जि.बीड) हे कापूस व्यापारी आहेत. 7 फेबु्रवारी रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास ते केज येथील माऊली जिनींगमध्ये 760 क्विंटल कापूस विक्री करुन त्याची 51 लाखांची रक्कम घेवून चिंचवण मार्गे दुचाकीवरुन वडवणी येथे आले होते. याचवेळी पाठीमागून आलेल्या विनाक्रमांकाया दुचाकीवरील दोन अज्ञातांनी रस्त्यात अडवले. त्यांच्या मागोमाग एक स्विप्ट कार जवळ आली. त्यातून तोंड बांधलेले आणखी तीन इसम व्यापारी शामसुंदर लांडे यांच्याजवळ आले. त्यांनी लाकडी काठी व लाथाबुक्क्याने मारहाण करत त्यांच्याकडील पैशानी भरलेली सॅग व दुचाकीच्या पेट्रोल टँकवर ठेवलेल्या गोणीमधील पैसे बळजबरीने हिसकावून चोरुन नेले होते.
या प्रकरणी लांडे यांच्या तक्रारीवरुन वडवणी ठाण्यात 8 फेबु्रवारी रोजी दरोड्याचा गुन्हा दाखल झाला होता. गुन्ह्याच्या अनुषंगाने स्थागुशा पथक केज, धारुर, तेलगाव, दिंद्रुड, सिरसाळा,आडस परिसरातील गुन्हेगारांचा शोध घेत होते.हा गुन्हा हा मैंद (ता.केज) गावातील टोळीप्रमुख बालाजी महादेव पुरी (21. रा.भवानी माळ ता.केज) याने त्याच्या इतर साथीदारांनी मिळून केला असून त्यापैकी तीन जण हे आडस रोड परिसरात थांबल्याची माहिती मिळाली. त्यावरन पथकाने जुना आडस रोड परिसरात सापळा लावून शांतीलाल उर्फ गणेश दामोधर मुंडे, बालाजी महादेव पुरी व गोविंद उर्फ भाऊ नवनाथ नेहरकर यांना ताब्यात घेवून विचारपुस केली असता त्यांनी हा गुन्हा माऊली जिनींगमधील मार्केट कमिटीचा कामगार सुर्यकांत लक्ष्मण जाधव याच्या मदतीने करण विलास हजारे, बालाजी रामेश्वर मैंद, संदिप वायबसे यांनी मिळून केल्याची कबुली दिली. ही कामगिरी पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकुर, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, सहा.पोलीस अधीक्षक धिरजकुमार बच्चु यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष साबळे, उपनिरीक्षक संजय तुपे, उपनिरीक्षक सुशांत सुतळे, पोह. कैलास ठोंबरे, नसिर शेख, अशोक दुबाले, भागवत शेलार, पोह. रामदास तांदळे, मारुती कांबळे, बाळकृष्ण जायभाये, राजु पठाण, पोशि. बप्पा घोडके, अर्जुन यादव, अश्विनकुमार सुरवसे, पोह. रविंद्र गोले, देविदास जमदाडे, गणेश हांगे, चालक अतुल हराळे, गणेश मराडे यांनी केली.
आरोपींनी केला होता प्लॅन पण पोलीसांनी केला पर्दाफाश
आरोपी बालाजी पुरी हा टोळी प्रमुख असून त्याने जिनींगमध्ये काम करीत असलेल्या कामगाराच्या मदतीने जिनींगमधून दुचाकीवरुन पैसे घेवून निघलेले व्यापारी शामसुंदर लांडे यांना निर्जनस्थळी सोन्नाखोटा फाट्याच्या पुढे खडी क्रेशरसमोर रोडवर दुचाकीला कारने अडवून मारहाण करून दरोडा टाकायचा प्लॅन रचला होता. नंतर दरोड्यातील रक्कम आपआपसात वाटून घेण्यासाठी प्रकरण शांत होईपर्यंत ती रक्कम शांतीलाल मुंडे, गोविंद नेहरकर, संदिप वायबसे यांच्याकडे ठेवली होती. मात्र पोलीसांनी तांत्रिक विश्लेषण करत तसेच घटनास्थळ ते आरोपींना व्यापारी लांडे यांचा केलेला पाठलाग या मार्गावरचे सीसीटिव्ही फुटेज तपासले. त्यातून या आरोपींचा पर्दाफाश करण्यात आला. गुन्हयात वापरलेली दुचाकी ही टोळी प्रमुख बालाजी पुरी याने चोरी केल्याचे निष्पन्न झालेले असून यासंदर्भात ठाण्यात चोरीच्या गुन्हयाची नोंद आहे.
एसपींकडून 10 हजारांचा रिवार्ड जाहीर
स्थानिक गुन्हे शाखेच्या या कामगिरीबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी पो.नि.संतोष साबळे यांच्यासह सर्व टीमचे अभिनंदन केले. तसेच 10 हजारांचे रिवार्ड जाहीर केले.
Leave a comment