बीड । वार्ताहर
श्री. सदगुरु बंजारा सेवा संघ बीड, संचलित प्राथमिक/माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा तथा दिनानाथ बालकाश्रमाच्या प्रांगणात आनंदनगरीतून विद्यार्थ्यांना बाजारपेठेतील देवाण-घेवाण, व्यवहाराची माहिती व्हावी या उद्देशाने गुरुवार दि. 8 फेब्रुवारी रोजी आठवडी बाजार शाळेच्या प्रांगणात भरवण्यात आला.
सर्व प्रथम क्रंतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करुन प्राचार्य खंदारे सर, मुख्याध्यापक शिंदे सर यांच्या शुभहस्ते या आठवडी बाजाराचे उद्घाटन करण्यात आले. आज काळ बदलत चाललेला असून स्पर्धा वाढलेली आहे. आजच्या विद्यार्थ्यांना आभ्यासाबरोबरच व्यवहारीक ज्ञान व्हावे, पाक कलेचा विकास व्हावा तसेच मनोरंजनातून त्यांना आनंद मिळावा, या उद्देशातून शाळेच्या परीसरात आनंद नगरी सजवण्यात आली होती. या वेळी विद्यार्थ्यांनी पाणीपुरी, भेळ, लिंबु-शरबत, इडली सांबर, शेतकर्यांच्या शेतातील भाजीपाला आदी स्टॉल लावण्यात आले. त्याच बरोबर फळांची स्टॉल त्यामध्ये चिकु, मोसंबी, द्राशी, सफरचंद असे विविध फळांची दुकाने विद्यार्थ्यांनी थाटली होती. खेळनीच्या वस्तू, विद्यार्थ्यांच्या कल्पकतेतून त्यांनी साकारलेले नाविन्या पुर्ण खेळ यामुळे विद्यार्थ्यांचे आणि परिसरातील नागरिकांचे मनोरंजन झाले.
यावेळी विद्यार्थ्यांनी पैशाची देवान घेवान केली. त्यामुळे बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार नफा-तोटा या संकल्पना विद्यार्थ्यांना आत्मसात करता आल्या. वस्तू खरेदी करतांना थांबावे लागते. त्यामुळे शिस्त व मनावर संयम या गुणांचा विकास झाला. एकमेकांना सहकार्य करण्याची वृत्ती यावेळी दिसून आली. या कार्यक्रमास अंथरवण पिंप्री तांडा, अंथरवण पिंप्री, उमरी, नागापूर येथील पालक वर्ग ही उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी पर्यवेक्षक जवरे सर तसेच आश्रमशाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग यांनी परीश्रम घेतले. विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास व्हावा यासाठी शाळेतील शिक्षकवृंदांनी घेतलेल्या या उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष दिनेशराव पवार, सचिव सुशील पवार यांनी कौतुक केले.
Leave a comment