बीड शहर पोलीसांची सुभाष रोडवर कारवाई
बीड । वार्ताहर
विनापरवाना देशी-विदेशी दारुची दुचाकीवरुन अवैध वाहतूक करणार्या एका दारु विक्रेत्यास बीड शहर पोलीसांनी ताब्यात घेत अटक केली. ही कारवाई सोमवारी (दि.29) सायंकाळी साडेसातच्या सुमारास करण्यात आली. याप्रकरणी संबंधिताविरुध्द बीड शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पो.नि.शितलकुमार बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई बीड शहर पोलीसांनी केली.
गणेश शामराव शिंदे (वय 37, रा.अंतरवण पिंप्री, ता.बीड) असे त्या आरोपीचे नाव आहे. सोमवारी सायंकाळी तो त्याच्या ताब्यातील दुचाकीवरुन क्र.(एम.एच.23 व्ही 1726) एका वायरच्या पिशवीत देशी-विदेशी दारुच्या बाटल्यांची वाहतूक करत होता. गुप्त माहितीनुसार पोलीसांनी सुभाष रोडवर त्यास अडवले. दुचाकीच्या पिशवीत काय आहे, असे त्यास विचारले असता, भाजीपाला आहे, असे उत्तर त्याने दिले, मात्र संशय आल्याने पोलीसांनी पंचासमक्ष पिशवीची तपासणी केली असता त्यात 4 हजार 580 रुपये किमतीच्या दारुच्या बाटल्या आढळून आल्या. या कारवाईत आरोपीकडून 25 हजार रुपये किमतीची दुचाकी जप्त करण्यात आली. सफौ.सिरसाट, पो.कॉ.सय्यद आशपाक, पो.ना.वायकर, पोकॉ. मनोज परजने यांचा या कारवाईत समावेश होता. पो.कॉ.सय्यद आशपाक यांच्या फिर्यादीवरुन आरोपीविरुध्द बीड शहर ठाण्यता गुन्हा नोंद करण्यात आला.
Leave a comment