बीड | वार्ताहर
विक्री केलेल्या कापसाची 10 लाख रूपयांची रक्कम चेकद्वारे बँकेतून काढून घेवून नवगण राजुरी येथे पोहचलेल्या एका व्यापार्याच्या दुचाकीच्या डिक्कीतून ती रक्कम चोरट्याने हातोहात लंपास केली. ही खळबळजनक घटना 23 फेब्रुवारी रोजी दुपारी पावणे तीन वाजेच्या सुमारास नवगण राजुरी येथील जिल्हा परिषद शाळेस पुढील किराणा दुकानासमोर घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून व्यापार्याचे 10 लाख रूपये चोरटयाने लंपास केल्याने आता पोलिसांसमोर चोरट्यांचा शोध घेण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.
हकीम शहाबुद्दीन शेख (38, रा.शिरापूर गात, ता.शिरूर) यांनी याबाबत ग्रामीण ठाण्यात फिर्याद नोंदवली की, कापसाचा व्यापार करतात. त्यांनी व त्यांच्या सहकार्यांनी विक्री केलेल्या कापसाची 10 लाखांची रक्कम बीड येथील राजीव गांधी चौकातील निगमानंद अर्बन को.ऑप.क्रेडीट सोसायटीतून चेकद्वारे काढून घेतली. नंतर ती रक्कम त्यांनी दुचाकीच्या डिक्कीमध्ये ठेवली. नंतर ते बीडहून नवगण राजुरी येथे तांबोळी ंयांच्या किराणा दुकानासमोर थांबले. यावेळी रक्कम दुचाकीच्या डिककीतच होती. चोरट्याने रेग्झीन कापडाची डिक्की कशाने तरी कापून 10 लाखांच्या रक्कमेसह ती डिक्कीच चोरून नेली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर हकीम शेख यांनी बीड ग्रामीण ठाणे गाठून घडलेला प्रकार कथन केला. त्यावरून अज्ञाताविरूद्ध चोरीचा गुन्हा दाखल झाला. सहाय्यक निरीक्षक रणखांब या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
Leave a comment