जिल्हधिकारी राधाबिनोद शर्मा यांचे नागरिकांना आवाहन
बीड । वार्ताहर
केंद्र शासनाच्या वतीने देशभर नागरिकांच्या आधार कार्ड नोंदणीची मोहीम मोठ्या प्रमाणावर राबविण्यात आली. आज रोजी बहुतांश नागरिकांचे आधार कार्ड काढण्यात आले आहे. शासनाने जारी केलेल्या नियमावलीनुसार दहा वर्षांनी आधार कार्ड अपडेट करणे आवश्यक आहे, त्यामुळे जिल्ह्यातील ज्या नागरिकांचा आधार नोंदणी करून दहा वर्षे इतका कालावधी पूर्ण झाला आहे. त्यांनी आपले आधार कार्ड अपडेट करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी केले आहे.
आधार कार्ड काढल्यानंतर कालांतराने अनेक बदल होतात. जसे पत्ता, बोटाचे ठसे, नावातील चुका, मोबाईल क्रमांक, आधार कार्ड ला संबंधितांची माहिती नोंद असल्याने या सर्व नोंदणीचे अध्यावतीकरण होणे आवश्यक असते. त्यासाठी दहा वर्षांनी आधार केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे ज्या नागरिकांना आधार कार्ड काढून दहा वर्षापेक्षा अधिक कालावधी झाला आहे. त्यांनी आपल्या नजीकच्या आधार केंद्रावर जाऊन केवायसी करून घेणे आवश्यक आहे. यासाठी शासनाने 50 रुपये इतके शुल्क निर्धारित केले आहे.
केंद्र शासनाच्या आधार अधिनियमन 2016 मधील नियमांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हा आधार नियंत्रण समितीची स्थापना करण्यात आली आहे. शासनाच्या 9 नोव्हेंबर 2022 रोजीच्या राजपत्रान्वये 18 वर्षावरील नागरिकांनी आपले आधार कार्ड काढले नसल्यास व 18 वर्षानंतर पहिल्यांदाच आधार नोंदणी करीत असल्यास अशा नागरिकांच्या कागदपत्राची यापुढे जिल्हास्तरीय आधार समितीमार्फत तपासणी करण्यात येणार आहे.आधार अपडेट न केल्यास भविष्यात आधार नोंदणी स्थगित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्यांनी आधार कार्ड काढून दहा वर्षापेक्षा अधिक कालावधी झाला आहे अशा नागरिकांनी आपले आधार कार्ड ई-केवायसी अपडेट करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी कळविले आहे.
Leave a comment