आरोग्य मंत्र्यांचे पत्र;चर्चांना उधाण
बीड । वार्ताहर
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने सहसंचालक तसेच उपसंचालक आणि जिल्हा शल्यचिकित्सक या संवर्गातील पदस्थापनेची प्रक्रिया दि.11 नोव्हेंबर रोजी करण्यात आली होती.ही पदस्थापना देवून 24 तासांचा कालावधी लोटत नाही तोच आता नवी माहिती समोर आली आहे. ‘प्रशासकीय’ कारण पुढे करत आरोग्य मंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांनी या सर्वच बदली प्रक्रियेला ‘पुढील आदेशापर्यंत’स्थगिती दिली आहे. दरम्यान एका दिवसात ही बदली प्रक्रिया स्थगित झाल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. याबाबत डॉक्टर मंडळीतही चर्चा होत आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाकडूसह सहसंचालक, उपसंचालक आणि जिल्हा शल्यचिकित्सक या संवर्गातील वैद्यकीय अधिकार्यांना 11 नोव्हेंबर रोजी पदस्थापना देण्यात आली होती. त्यानंतर अवघ्या 24 तासात राज्याचे आरोग्य मत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांनी प्रशासकीय कारणास्तव पुढील आदेशापर्यंत ही बदली प्रक्रिया स्थगित केल्याचे पत्र जारी केले आहे. या पत्रात आरोग्यमंत्र्यांनी नमुद केले आहे की, माता सुरक्षित,घर सुरक्षित अभियान सुरु असल्याने प्रशासकीय कारणास्तव 11 नोव्हेंबर रोजीचे प्रशासकीय बदली अंमलबजावणीस पुढील आदेश होईपर्यंत तात्पुरती स्थगिती देण्यात येत आहे. महत्वाचे हे की, या बदली प्रक्रियेत बीड जिल्हा आरोग्य विभागात यशस्वीरित्या काम करणार्या डॉक्टर मंडळींना मानाच्या आणि महत्वाच्या पदावर स्थान देण्यात आलेले आहे. आता या प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती मिळाली आहे.
Leave a comment