बीड । वार्ताहर
जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या दुहेरी होवू लागली आहे. त्यामुळे नागरिकांनो काळजी घ्या, कारोना वाढतोय असे म्हणण्याची वेळ आरोग्य विभागावर आली आहे. बीड जिल्ह्यात आज 16 जुलै रोजी कोरोनाचे नवे 13 रुग्ण निष्पन्न झाले आहेत.बाधितांमध्ये 2 वृध्द वगळता इतर 11 रुग्ण तरुण आहेत हे विशेष.
जिल्ह्यात मागील पाच महिन्यांपासून कोरोना संख्या खूपच नगण्य झाली होती. त्यामुळे कोरोनाच्या बाबतीत नागरिकही बेफिकिर राहू लागल्याचे दिसत आहे. मात्र मागील पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाच्या बाधितांच्या संख्येत अचानक वाढ तसेच घट होताना दिसत आहे. जिल्ह्यात 15 जुलै रोजी कोरोनाच्या 565 संशयितांची आरोग्य विभागाकडून चाचणी करण्यात आली, त्याचे अहवाल 16 जुलै रोजी दुपारी 4 वाजता प्राप्त झाले. त्यात 13 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले.
बीड तालुक्यात 2, धारुर 1, गेवराई 4 आणि परळी व शिरुरकासार तालुक्यातील प्रत्येकी 3 रुग्णांचा समावेश आहे. महत्वाचे हे की, या 13 रुग्णांपैकी 12 रुग्ण नवे आहेत तर खडकी (ता.गेवराई) येथील 1 रुग्ण पूर्वीच्या रुग्णाचा सहवासित आहे, जिल्हा आरोग्य विभागातील अधिकार्यांनी ‘लोकप्रश्न’शी बोलताना ही माहिती दिली.
Leave a comment