बीड | वार्ताहर
कापूस लागवडीसाठी बीड जिल्ह्यात एक गाव एक वाण पध्दत वापरावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी बाबासाहेब जेजुरकर यांनी केले आहे.
देशातील एकूण कापूस क्षेत्रापैकी 33 टक्के कापूस क्षेत्र महाराष्ट्र राज्यात आहे. उत्पादनाचा विचार करता देशातील एकूण कापूस उत्पादनात राज्याचा वाटा 22 टक्के असून राज्यातील कापूस पिकाची उत्पादकता वाढण्याची नितांत आवश्यकता आहे. राज्याचा कृषि विभाग, कृषि विद्यापीठे, कृषि विज्ञान केंद्रे आदि विस्तार संस्था यासाठी प्रयत्न करीत आहे.
बीड जिल्ह्यात साधारण 99.9 टक्के कापूस क्षेत्र हे बी. टी. प्रकारातील आहे. शासकीय संशोधित व खाजगी संशोधित अशा अनेक वाणांना शासनाने मान्यता दिली आहे. वाणांमध्ये कालावधी, आकार, बोंडाचे वजन, कीड-रोग प्रतिकारक क्षमता आदिंचा विचार करता वाणांमध्ये विविधता आढळतात.
कापसाच्या एकाच वाणाची एका गावामध्ये लागवड झाली तर कीड रोगांचे चक्र भेदण्यात यश येते. सामूहिक कीडरोग नियंत्रण उपाययोजना राबविणे सुलभ होते. पर्यायी उत्पादन खर्च कमी होऊन उत्पादन देखील वाढते. एकाच प्रकारचा कापूस एका गावात उपलब्ध होत असल्यने पणन क्षेत्रात कार्यरत विविध घटकांना कच्चा माल पुरवठा वाहतूक सुलभ होते. त्यामुळे अशा गावात कापसास अधिक दर मिळू शकतो. विविध विस्तार यंत्रणांना विस्तार कार्य करण्यास कमी वेळ लागतो.अशा गावात समूह बांधणी करून मार्गदर्शन करणे सुलभ होते, असे अधीक्षक कृषी अधिकारी जेजुरकर यांनी सांगितले.
Leave a comment