जिल्ह्यात पाच महिन्यात 10 हजार वाहनांवर दंडात्मक कारवाया
बीड । वार्ताहर
वाहतूक नियमांचे पालन सातत्याने करा अशा सूचना वाहतूक पोलिस देतच राहतात परंतू महामार्गावर याबाबतची सुचना फलकही लावलेले असतात. प्राणांतिक अपघात टळावेत तसेच गंभीर जखमींचे प्रमाण रोखले जावे यासाठी दुचाकीवर हेल्मेट आणि चार चाकीत सीट बेल्ट लावणे आवश्यक असते मात्र अनेक वाहनचालक या साध्या वाटणार्या नियमांची बिनधास्त उल्लंघन करताना दिसतात याबरोबरच महामार्गावर निर्धारित केलेल्या वेगापेक्षा अधिक वेगाने वाहने चालवतात. अशा वाहनचालकांवर दंडात्मक कारवाईबरोबरच खटलेही दिले जातात. जिल्ह्यात चालू वर्षी 1 जानेवारी ते 27 मे 2022 या पाच महिन्याच्या काळात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्या तब्बल 10 हजार 199 वाहनचालकांकडून 91 लाख 32 हजार 66 रूपयांचा दंड वसुल केला गेला आहे.
जिल्ह्यात वाहतूक शाखेबरोबरच महामार्ग पोलिस कार्यरत आहेत. मांजरसुंबा आणि पाडळसिंगी येथे महामार्ग पोलिसांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्या वाहनांवर कारवाया केल्या जातात. दुसरीकडे जिल्हा आणि शहर वाहतूक शाखेकडूनही या कारवाया केल्या जातात. वाहन चालकांनी वेग मर्यादेचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर ऑनलाईन दंड आकारण्यात येतो यासाठी महामार्ग पोलिसकडे दोन इंटरसिप्टर वाहने कार्यान्वीत आहेत. तर जिल्हा वाहतूक शाखेकडेही असे एक वाहन कार्यान्वीत आहे. महामार्गाच्या बाजूला हे वाहन उभे असले तरी त्या परिसरातून जाणार्या वाहनांची वेग मर्यादा मोजून ती जास्त असल्यास संबंधीत वाहनाच्या क्रमांकावरून वाहन मालकांवर दंडात्मक कारवाई केली जाते. याबरोबरच सीटबेल्ट नसणे, वाहन चालवताना कागदपत्रे सोबत न बाळगणे, महामार्गावर प्रवास करताना दुचाकीचालकाकडे हेल्मेट नसणे तसेच ट्रीपल सीट दुचाकी चालवणे आणि नो पार्किंगमध्ये वाहने उभे करणे या त्रुटी आढळून आल्यास दंडात्मक कारवाया तसेच खटले दाखल केले जातात.
1 एप्रिल ते 27 मे या कालावधीत जिल्हा वाहतूक शाखेकडून ओव्हरस्पिड वाहन चालवणार्या 3441 जणांकडून तब्बल 69 लाख 9 हजाराचा दंड आकारण्यात आला. यापाठोपाठ सीटबेल्ट नसणार्या 4057 वाजनचालकांकडून 8 लाख 10 हजारचा दंड आकारण्यात आला. वाहनाचे कागदपत्रे सोबत न बाळगल्याप्रकरणी 1124 वाहलचालकांकडून 5 लाख 60 हजाराचा दंड वसूल करण्यात आला. दुचाकीवर विनाहेल्मेट फिरणार्या 741 जणांकडून 3 लाख 65 हजार 500 रूपयाचा दंड वसुल केला गेला आहे. ट्रिपल सीट दुचाकी चालवणार्या 125 जणांना 1 लाख 21 हजाराचा दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच नो पार्किंगमध्ये वाहने उभे करणार्या 711 चालकांकडून 3 लाख 66 हजार 500 रूपयांचा दंड वसुल करण्यात आल्याची माहिती जिल्हा वाहतूक शाखेचे सहाय्यक निरीक्षक कैलास भारती यांनी दिली. दरम्यान गत तीन वर्षापासून दंडात्मक कारवाया करण्यासाठी ई चालान मशिनचा वापर केला जात आहे. अनेकदा हा दंड आकारल्याने वाहन चालक आणि वाहतूक पोलीसांमध्ये वादाचे प्रसंग उद्भवताना दिसतात.
लोकांनाही नियम नको; पोलीसांवर अडवणूकीचा आरोप
नियमांचे पालन करणे मात्र वाहन चालकांना सोयीचे वाटत नाही तर पोलीस सतत कोणत्या न कोणत्या कारणाने अडवणूक करण्यातच धन्यता मानतात असा आरोप वाहनचालकांतून केला जातो. मात्र एकदा का चालान फाडले की, कधी न कधी दंड भरावाच लागतो.
Leave a comment