बीड । वार्ताहर
एसटीचे शासनात विलिनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी राज्यभरातील कर्मचार्यांनी 28 ऑक्टोबर 2021 पासून संप सुरू केला होता, दरम्यान आता सर्व कर्मचार्यांनी 22 एप्रिलपर्यंत कामावर रुजू व्हावे, असा आदेश न्यायालयाने दिला आहे. शिवाय, कर्मचार्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक झाली. त्यानंतर आता कर्मचारी कामावर परतू लागले आहेत. बीड जिल्ह्यात 8 ते 19 एप्रिल या बारा दिवसांत 980 कर्मचारी कामावर आले आहेत. 19 एप्रिल रोजी बीड विभाग नियंत्रक कार्यालयात कर्मचार्यांनी गणवेशात विभाग नियंत्रक अजयकुमार मोरे यांच्यासमोर हजेरी लावत कामावर रुजू होणे पसंत केले.यामुळे लालपरी पुन्हा एकदा पूर्वपदावर येवू लागली आहे.
बीड जिल्ह्यात एसटीचे एकूण 8 आगार आहेत. यात बीड, परळी, धारुर, माजलगाव, गेवराई, पाटोदा, आष्टी, अंबाजोगाई आगाराचा समावेश आहे. या सर्व आगारात प्रशासकीय कर्मचारी, कार्यशाळा कर्मचारी यांच्यासह चालक आणि वाहक असे एकूण 2552 कर्मचारी कार्यरत आहेत. यातील काही कर्मचार्यांवर संपादरम्यान कारवाई झाल्याने तूर्तास जिल्ह्यात 1765 कर्मचारी हजरेरी पटावर प्रत्यक्ष कार्यरत आहेत.सध्या जिल्ह्यात सर्व विभागातील मिळून 8 कर्मचारी गैरहजर आहेत तर 523 कर्मचारी साप्ताहिक सुट्टी, दौरा आणि अधिकृत रजेवर आहेत. याशिवाय 256 कर्मचारी अजुनही संपात सहभागी आहेत. यात 123 चालक, तर 122 वाहकांसह कार्यशाळेतील 7 तर 4 प्रशासकीय कर्मचार्यांचा समावेश आहे अशी माहिती विभाग नियंत्रक अजयकुमार मोरे यांनी 'लोकप्रश्न'शी बोलताना दिली.
दि. 8 ते 19 एप्रिलदरम्यान जिल्ह्यात एकूण 890 कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. यात 420 चालक, 430 वाहक, यांत्रिक विभागातील 125 कर्मचारी व 5 प्रशासकीय कर्मचार्यांचा समावेश आहे. तसेच 19 एप्रिल दिवसअखेर एकूण 76 कर्मचारी कामावर प्रत्यक्ष रुजू झाले. यामध्ये 36 चालक, 31 वाहकांसह यांत्रिक विभागातील 9 कर्मचार्यांचा समावेश असल्याची माहिती विभाग नियंत्रक अजयकुमार मोरे यांनी दिली. कर्मचारी मोठ्या संख्येने कामावर परतू लागल्याने जिल्ह्यात ‘लालपरी’ पुन्हा एकदा पूर्वपदावर येवू लागली असून दिवसासह रात्र बससेवाही सुरु झाल्या आहेत.
दिवसभरात 1023 बसफेर्या
65 हजार 346 प्रवाशांनी केला प्रवास
कर्मचारी कामावर परतू लागल्याने साहजिकच बीड विभागातंर्गतच्या आठही आगारातील बसफेर्या पूर्ववत सुरु होवू लागल्या आहेत. 19 एप्रिल रोजी सायं 6 वाजेपर्यंत जिल्ह्यात शिवशाही 2, हिरकणी 14 व साध्या बसच्या 1010 अशा एकूण 1023 फेर्या विविध मार्गावर झाल्या. यादरम्या 65 हजार 346 प्रवाशांनी प्रवास केला असल्याची माहिती विभाग नियंत्रक मोरे यांनी दिली.
Leave a comment