बीड । वार्ताहर
बीड जिल्ह्याच्या भूमिकन्या आणि परळी येथील राहिवासी सौ.मंजुषा कुलकर्णी यांना आज गुरुवारी (दि.30) साहित्य अकादमीचे अध्यक्ष डॉ.चंद्रशेखर कंबार यांच्या हस्ते संस्कृत भाषेसाठी ‘साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. बीडच्या कन्येला हा पुरस्कार मिळणे हा जिल्ह्यासाठीच नव्हे तर मराठवाडा आणि महाराष्ट्रासाठीही सन्मानजनक असल्याच्या प्रतिक्रिया साहित्यीक क्षेत्रातून व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र शासनात राजपत्रित अधिकारी म्हणून काम करणार्या उच्च विद्या विभूषित परळीतील डॉ.मंजुषा कुलकर्णी यांना त्यांच्या साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल मानाचा साहित्य अकादमी पुरस्कार गुरुवारी प्रदान करण्यात आला. त्यांची आतापर्यंत 25 पुस्तके प्रकाशित असून, 23 पुस्तके प्रकाशनासाठी तयार आहेत. नुकतेच त्यांनी डॉ प्रकाश बाबा आमटे यांच्या प्रकाशवाटा या जीवन चरित्राचा संस्कृत अनुवाद लिहिला आहे. सौ.मंजुषा कुलकर्णी ह्या परळीच्या कन्या असून त्यांचे शालेय शिक्षण वैद्यनाथ विद्यालयात तर महाविद्यालयीन शिक्षण लिटल फ्लावर स्कूल मध्ये झालेले होते.आंबेवेस भागात राहणारे पंढरीनाथ कुलकर्णी यांच्या त्या कन्या आहेत.
समकालीन मराठी साहित्य कृती किंवा अन्य कोणत्याही भाषेतील साहित्यकृती या संस्कृतात सहजपणे नेता येऊ शकतात आणि भारताची अभिजात संस्कृत भाषा ही सर्व भाषांची जननी मानली जाते या भाषेत अनुवादित झालेल्या पुस्तकांना साहित्य अकादमीचे पुरस्कार दिले जातात त्यात मराठी भाषेतील कलाकृतीला पहिल्यांदाच हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. त्यामुळे मराठी भाषेत आणि संस्कृत या दोघांमध्ये देखील अतिशय आनंदाचे वातावरण आहे प्रकाशवाटा हे डॉक्टर प्रकाश बाबा आमटे यांचे आत्मचरित्र 2017 साली संस्कृतमध्ये डॉक्टर मंजुषा कुलकर्णी यांनी अनुवादित करून प्रकाशित झाले होते. या पुस्तकाचे साहित्य अकादमीच्या पुरस्कारासाठी डॉक्टर मंजुषा कुलकर्णी यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे .मराठी पुस्तकाला संस्कृत अनुवादासाठी मिळालेला हा गौरव समग्र महाराष्ट्र आणि भारतीयांसाठी अभिमानाची बाब ठरते आहे.
डॉ.मंजूषा कुलकर्णी यांचे एम ए संस्कृत, एम एड, पी एच डी(संस्कृत) अनुक्रमे पुणे विद्यापीठ व टिळक महाराष्ट्र विद्यापीठातुन सर्वप्रथम क्रमांकाने पूर्ण झालेले आहे. त्या एमपीएससी परीक्षेत सर्वप्रथम आलेल्या असून प्रथम वर्ग राजपत्रित अधिकारी म्हणून सेवेत आहेत.पहिली महिला भाषासंचालक महाराष्ट्र राज्य म्हणून काम करण्याचा मान देखील सौ. मंजुषा यांना मिळालेला आहे. त्यांनी 21 वर्षे अध्यापनाचे देखील काम केलेले आहे. विविध राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त ख्यातनाम व्याख्याता, कवयित्री, लेखिका, निवेदिका, सूत्रसंचालिका, नाट्यप्रयोग, एकपात्री प्रयोग यांसह भाषेचं-साहित्याचं कार्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचवन्याचे काम केलेल्या उत्कृष्ट साहित्यिक म्हणून डॉ.सौ.मंजुषा कुलकर्णी सुपरिचित आहेत.
Leave a comment