प्राणांतिक अपघात रोखण्यासाठी निर्णय डेप्यूटी आरटीओ जयंत चव्हाण यांची माहिती
जिल्ह्यात नऊ महिन्यात 178 जणांचा अपघाती मृत्यू
बीड । वार्ताहर
बीड जिल्ह्यातील वाढते प्राणांतिक अपघात रोखण्यासाठी आणि हेल्मेट परिधान करुनच दुचाकी चालवण्याची सवय प्रत्येकाला लागावी यासाठी आता आरटीओ प्रशासन अधिक कडक निर्णय घेणार आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाने गुरुवारी माहिती दिली आहे. त्यानुसार बीड जिल्ह्यात लवकरच ‘नो हेल्मेट-नो पेट्रोल’ या धोरणाची अंमलबजावणी होणार आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत चव्हाण यांनी ही माहिती दिली आहे याबाबत दि.16 डिसेंबर 2021 रोजी एक बैठक पार पडली. या बैठकीत मोटार वाहन अधिनियम 1988 च्या कलम 129 मधील तरतुदीनुसार दुचाकी वाहन चालक व त्याच्या मागे बसून प्रवास करणार्या व्यक्तीचे संरक्षण होण्यासाठी हेल्मेटवापरणे बांधकारक करण्यात आले आहे.
उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अभिलेखानुसार संपूर्ण बीड जिल्ह्यातील मोटार सायकल यांची संख्या 2 लाख 40 हजार 959 आहे. जागतिक आरोग्य संघटना यांनी वेळोवेळी प्रकाशित केलेल्या वाहनाच्या अपघाताच्या आकडेवारीनुसार भारतात जास्तीत जास्त अपघात हे मोटार सायकलने होत असतात. त्यामध्ये मोटार सायकल चालक विनाहेल्मेट असल्याने त्यांचा मृत्यू होतो व गंभिररित्या जखमी होतात. महत्वाचे म्हणजे मोटार सायकलच्या अपघातामध्ये वय 18 ते 35 या वयोगटातील तरुण मुले व मुली नाहक प्राण गमावतात.
बीड जिल्ह्यात जानेवारी ते सप्टेंबर 2021 दरम्यान दुचाकीच्या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 178 आहे. मृतांची ही संख्या लक्षात घेतला मोटार सायकलच्या अपघातांची संख्या कमी करण्यासाठी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने बीड जिल्ह्यात नो हेल्मेट ना पेट्रोलचे धोरण राबविण्यात यावे अशा सूचना केल्या आहेत. यानुसार आता मोटारसायकल चालवताना हेल्मेट परिधान केल्याशिवाय संबंधिताला पेट्रोल-डिझेल दिले जाणार नाही. याची लवकरच अंमलबजावणी होईल असे आरटीओ प्रशासनाने सांगीतले आहे. तसेच यासंबंधी बीड जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप धारकांना याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच हेल्मेट शिवाय दुचाकीस्वरांना पेट्रोलपंप परिसरात पुर्णपणे बंदी घालण्यात येईल. कुठल्याही परिस्थितील हेल्मेट नसलेले दुचाकीस्वार यांना पेट्रोल पंप परिसरात प्रवेश मिळणार नाही. प्रत्येक पेट्रोल पंप मालक चालक यांनी या संबंधात प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचे आदेश ठळकपणे बॅनर लावून घ्यावे व पेट्रोल पंप परिसरात हेल्मेट शिवाय प्रवेश दिल्यास पेट्रोेलियम नियम 2002 चे नियम 150 नाहरकत प्रमाणपत्र रद्द करण्याची कार्यवाही सुरु करण्यात येईल. शाळा, कॉलेज, महाविद्यालय, विद्यापीठ कोचिंग क्लासेस सर्व पार्किंग ठिकाणी, एमआयडीसी परिसर, शासकीय कार्यालय (राज्य शासन व केंद्र शासन) महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद व इतर सर्व निमशासकीय कार्यालय मध्ये हेल्मेट शिवाय प्रवेश बंदी घालण्यात येईल. पेट्रोल पंप मालक-चालक यांना पंप परिसरात सीसीटीव्ही बंधकारक राहील. तरी नमुद परिसरामध्ये हेल्मेट शिवाय दुचाकीस्वार सापडल्यास संबंधित मालमत्ता अधिकारी यांच्यावर महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 131 (ब)(क) अन्वये कार्यवाही करण्यात येईल, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, जयंत चव्हाण यांनी कळविले आहे.
प्राणांतिक अपघात रोखणार
बीड जिल्ह्यात जानेवारी ते सप्टेंबर 2021 दरम्यान दुचाकीच्या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 178 आहे. मृतांची ही संख्या चिंताजनक आहे. मोटार सायकलच्या अपघातांची संख्या कमी करणे आणि प्राणांतिक अपघात रोखणे यासाठी हेल्मेटसक्तीचा निर्णय पुन्हा एकदा घेतला जावू शकतो अशी चिन्हे दिसत आहेत.
आरटीओंच्या रेकॉर्डवर 2 लाख 40 हजार वाहने
बीड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अभिलेखानुसार संपूर्ण बीड जिल्ह्यातील मोटार सायकलची संख्या 2 लाख 40 हजार 959 इतकी आहे. असे असले तरी परजिल्ह्यातील नोंद असलेलीही अनेक दुचाकी जिल्ह्यात धावतात.त्यामुळे आरटीओंच्या अभिलेख्यांवरील दुचाकीची संख्या अन् प्रत्यक्ष रस्त्यावर धावणारी वाहने यांचे आकडे जुळू शकत नाहीत.
Leave a comment