जिल्ह्यात अनुक्रमे वीस व सोळा केंद्र
परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा यंत्रणा सज्ज
बीड । वार्ताहर
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने आज 21 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचे आयोजन केलेले आहे. सदर परीक्षेची सर्व यंत्रणा सज्ज आहे. परीक्षा सुरळीत व निकोप वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा यंत्रणा सज्ज आहे.पहिल्या पेपरसाठी 7045 व दुसर्या पेपरसाठी 5402 परीक्षार्थी प्रविष्ठ आहेत अशी माहिती श्रीकांत कुलकर्णी शिक्षणाधिकारी प्राथमिक व डॉ विक्रम सारुक शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी एका पत्रकाव्दारे दिली आहे.
या परीक्षा दोन सत्रात घेण्यात येणार असून सकाळी 20 व दुपारी 16 परीक्षा केंद्र असे एकुण 36 केंद्र निश्चित करण्यात आलेले आहेत. सदरील परीक्षेचे प्रथम सत्र 20 केंद्रावर सकाळी 10:30 ते 1 व द्वितीय सत्र 16 केंद्रावर दुपारी 2 ते 04:30 या वेळेत होणार आहे.
परीक्षेसाठी केंद्र संचालक म्हणून त्या-त्या शाळा-महाविद्यालयाचे मुख्याध्यापक-प्राचार्य यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. केंद्र संचालक यांनी त्यांच्या अधिनस्त शिक्षक कर्मचारी यांची नियुक्ती पर्यवेक्षक-समावेक्षक म्हणून केलेली आहे. केंद्र संचालक यांना सहाय्यक परिरक्षक म्हणुन जिल्हयातील शिक्षण विस्तार अधिकारी यांची नियुक्ती केली आहे. पहिल्या पेपरसाठी 7045 .व दुसर्या पेपरसाठी 5402 परीक्षार्थी प्रविष्ठ आहेत.पहिल्या पेपरसाठी 05 झोन व दुसर्या पेपरसाठी 4 झोन असून नायब तहसिलदार यांची झोनल ऑफिसर म्हणुन नियुक्ती करण्यात आलेले आहे.
सदरील परीक्षा जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा व मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांच्या नियंत्रणाखाली परीक्षेचे कामकाज पार पडत आहे. पोलिस अधिक्षक आर.राजा यांच्या नियंत्रणाखाली सर्व परीक्षा केंद्रावर कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.सर्व परीक्षा केंद्रावर व्हिडीओ शुटींगची व्यवस्था करण्यात आलेली आहे.परीक्षा सुरुळीत पार पाडण्यासाठी उपशिक्षणाधिकारी मोहन काकडे,भगवान सोनवणे, नानाभाऊ हजारे तसेच विठ्ठल राठोड, तुकाराम पवार, गौतम चोपडे ,लोखंडे मनोज व शिक्षण विभागातील इतर सर्व कर्मचारी परिश्रम घेत आहेत.
हॉलतिकिटवर परीक्षा केंद्राच्या पत्ता चूकीचा
केंद्र क्रमांक 5320 स्वा. सावरकर प्राथमिक विद्यालय हे केंद्र सराफा रोड धोंडीपुरा बीड येथे आहे.परंतु संबधित केंद्रावर परीक्षा देणार्या परीक्षार्थीच्या प्रवेश पत्रावर केंद्राचा पत्ता स्वा. सावरकर महाविद्यालय,जालना रोड बीड असा अनावधानाने छापण्यात आलेला आहे.तरी परीक्षार्थी यांनी याची नोंद घ्यावी असे आवाहनही शिक्षण विभागाने प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकातून केले आहे.
Leave a comment