लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत रवींद्र भोसले यांचे यश
आष्टी । वार्ताहर
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्यसेवा परीक्षा 2019 चा अंतिम सुधारित निकाल मंगळवारी जाहीर केला असुन त्यामध्ये आष्टी तालुक्यातील कडा येथील साखर कारखाना कामगाराचा मुलगा रवींद्र दिनकर भोसले याने उपविभागीय पोलीस अधिकारी (डीवायएसपी) पदाला गवसणी घातली आहे. सदरील भरतीचा गेल्यावर्षी निकाल लागला होता. यामध्येही रवींद्र भोसले याने यश संपादन केले होते मात्र सुप्रीम कोर्टामध्ये मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर एसइबीसी कोट्यातून ही निवड रद्द झाली होती त्यानंतर खुल्या गटातून काल जाहीर झालेल्या निकालांमध्ये पुन्हा रवींद्र भोसले यांनी बाजी मारली आहे.
कडा सहकारी साखर कारखान्यातील कामगार दिनकर भोसले यांचे चिरंजीव रवींद्र यांचे दहावी पर्यंतचे शिक्षण कडा येथील मोतीलाल कोठारी विद्यालयात झाले. दहावीला 95 टक्के गुण घेऊन प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्याने लातूर येथील शाहू महाविद्यालयात अकरावी बारावीपर्यंत शिक्षण घेतले बारावी मध्ये हि रवींद्रने टॉपर राहून पुणे येथे अभियांत्रिकीची पदवी घेतली त्यानंतर बडोदा येथे नोकरीही केली परंतु उच्चपदस्थ अधिकारी होण्याचे त्यांचे स्वप्न होते त्यासाठी दोन वर्षातच त्या नोकरीचा राजीनामा देऊन दिल्ली येथे यूपीएससीची तयारी केली त्या ठिकाणी अपयश आल्याने पुन्हा महाराष्ट्रात येऊन पुणे येथे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचा अभ्यास सुरू केला. दोन प्रयत्न असफल झाल्यानंतर तिसर्या प्रयत्नात त्यांची पोलिस उपअधीक्षक म्हणून निवड झाली आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र होत आहे.
स्वप्न साकार झाले-रवींद्र भोसले
घरची परिस्थिती बेताची होती वडील साखर कारखाना कर्मचारी तुटपुंज्या वेतनावर खर्च व शिक्षणाचा खर्च भागवताना कसरत व्हायची.सहा वर्षे रात्रंदिवस एक करून मेहनत घेतली मात्र जिद्द सोडली नाही गतवर्षी एमपीएससी मधून पोलीस उपअधीक्षक म्हणून निवड झालेली. स्वप्न साकार झाले परंतु मराठा आरक्षणाचे न्यायालयीन प्रक्रिया व सरकारचे वेळ काढू भूमिका यामुळे वर्ष झाले तरी नियुक्ती मिळाली नाही.आता पुन्हा नव्याने खुल्या प्रवर्गातून मला यश मिळाले आहे अशी प्रतिक्रिया रवींद्र भोसले यांनी व्यक्त केली.
Leave a comment