दहा ते बारा जणांवर पाटोदा ठाण्यात खूनाचा गुन्हा
पाटोदा । वार्ताहर
चोरीच्या आरोपातून पारनेर येथील पारधी वस्तीवर गावातील काही लोकांनी हल्ला केला. या हल्ल्यामध्ये दोन वर्षाचा मुलगा ठार झाला तर आठ ते दहा जण जखमी झाले. ही घटना पाटोदा तालुक्यातील पारनेर येथे शनिवारी (दि.25) मध्यरात्रीच्या दरम्यान घडली. जखमींना उपचारार्थ बीडच्या जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी पाटोदा पोलीस ठाण्यात 10 ते 12 जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून काही आरोपींना पोलिसांनी ताब्यातही घेतले आहे. दरम्यान डीवायएसपी विजय लगारे, पोलीस निरीक्षक मनीष पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली असून पारनेर गावात तणावपूर्ण वातावरण आहे.
या प्रकरणी भिवराबाई अभिमान काळे (65 रा.पारनेर) यांनी पाटोदा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शनिवारी मध्यरात्री बाराच्या दरम्यान गावातील बबन औटे, बाळू औटे, कचरू औटे व त्यांची तीन मुले विनोद औटे, अशोक दहीवळे, विष्णू औटे, युवराज औटे व इतर 10 ते 12 जणांनी आमच्या घरात येवून तुझा पोरगा अरूण याने आमच्या माणसाला चाकू मारला असे म्हणत काठी व लाथा बुक्क्याने मारहाण केली. त्याचप्रमाणे जातीवाचक शिवीगाळ करून धमक्या दिल्या तसेच पत्र्याचे शेड जाळून टाकले. या मारहाणीत भिवराबाई यांचा दोन वर्षाचा नातू मानू उर्फ सिद्धांत अरूण काळे याच्या डोक्याला गंभीर जखम झाल्याने त्याचा मृत्यू झाला तर आठ ते दहा जण जखमी झाले.
जखमींना उपचारार्थ बीडच्या जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांना ही माहिती मिळताच मध्यरात्री पाटोदा पोलीस ठाण्याचे पो.नि.मनीष पाटील, सहाय्यक निक्षरीक्षक धरणीधर कोळेकर, उपनिरीक्षक पठाण, सहाय्यक फौजदार बी.एन.कनके ,बीट अंमलदार सुनील सोनवणे, पोलीस कर्मचारी बाळू सानप, कातखडे, क्षीरसागर, गुरसाळे आदींच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना रूग्णालयात पोहचविण्याची व्यवस्था केली तर रविवारी उपविभागीय अधिकारी विजय लगारे हे घटनास्थळी तळ ठोकून होते.
Leave a comment