एसपींच्या विशेष पथकाचा छापा
कारवाईत केवळ दोन वाहन चालक ताब्यात
बीड | वार्ताहर
बीडमध्ये केवळ छुप्या पद्धतीने गुटखा विक्री केला जातो असे नाही तर चक्क गुटख्याचे गोदामच सुरू असल्याचे आता समोर आले आहे. या छुप्या गोदामाची गुप्त माहिती मिळताच आज बुधवारी (दि.१५) सकाळी नऊच्या सुमारास पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास हजारे व त्यांच्या कर्मचारी छापा मारला.
या कारवाईत एक-दोन लाख नव्हे तर तब्बल ६० लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. कारवाईत केवळ दोन वाहनचालक पोलिसांच्या हाती लागले असून गोदाम चालवणारे आणि काळ्या बाजारातून गुटखा बीडपर्यंत पोहोचवणारे मात्र अद्यापही पोलिसांना सापडू शकलेले नाहीत. आता पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.या कारवाईने गुटखा माफियामध्ये एकच खळबळ उडाली आहे.
बीड तालुक्यातील घोडका राजुरी येथे एका गोदामात गुटख्याचा मोठा साठा असल्याची माहिती पोलीस अधीक्षक आर. राजा यांच्या पथकाला मिळाली होती. त्यावरून आज बुधवारी सकाळी पथकप्रमुख सहायक निरीक्षक विलास हजारे व सहकाऱ्यांनी तेथे छापा टाकला. एका ट्रक व एका टेम्पोतून गुटखा भरून नेत असतानाच पथक तेथे धडकले.
यावेळी दोन्ही वाहनांच्या चालकांना ताब्यात घेण्यात आले. गुटख्याचा अंदाजे ६० लाख रुपयांचा साठा हस्तगत करण्यात आला. गुटखा, दोन वाहने, दोन आरोपी असा सर्व मुद्देमाल घेऊन पथक पिंपळनेर ठाण्यात पोहोचले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सहायक निरीक्षक विलास हजारे यांनी दिली.
Leave a comment