होत असतील तर कामे नीट करा अन्यथा घरी जा!
निष्काळजीपणा करणार्या अधिकारी-कर्मचार्यांना झापले
सीएस डॉ.साबळेंकडून स्थलांतरित जिल्हा रुग्णालयाची झाडाझडती
बीड । वार्ताहर
जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून पदभार स्वीकारताच डॉ.सुरेश साबळे यांनी शुक्रवारी (दि.11) सकाळी नाळवंडी नाक्यावरील आदित्य शिक्षण संस्थेत स्थलांतरित झालेल्या जिल्हा रुग्णालयाची झाडाझडती घेतली. यावेळी त्यांनी तेथील दुर्गंधी आणि अस्वच्छता पाहून संताप व्यक्त केला. शिवाय रेकॉर्ड व्यवस्थित नसल्याने सुनावले.रुग्णालयाचा उकंडा झाला आहे, जबाबदारी बाळगा, नाटके आता बंद करा, होत असेल तर चांगले काम करा अन्यथा घरी बसण्याची तयारी ठेवा, यापुढे कोणताही हयगईपणा खपवून घेणार नाही, खाजगी दुकाने नंतर चालवा, सरकारीत योग्य सेवा द्या अशा शब्दात नूतन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश साबळे यांनी अधिकार्यांसह डॉक्टर, कर्मचार्यांना पहिल्याच भेटीत झापले. त्यामुळे कामचुकारपणा करणार्यांची भंबेरी उडाल्याचे दिसून आले.दरम्यान यावेळी त्यांनी उपचार घेणार्या काही रुग्णांची तपासणी केली.
बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सूर्यकांत गित्ते यांची गुरुवारी लोखंडी सावरगाव येथे फिजीशियन म्हणून बदली करण्यात आली. त्यांच्या जागेवर माजलगावचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.सुरेश साबळे यांची नियुक्ती केली गेली. पदभार घेतल्यानंतर डॉ. साबळे यांनी आदित्य शिक्षण संस्थेत स्थलांतरीत केलेल्या जिल्हा रूग्णालयाला भेट देवून आढावा घेतला. यावेळी त्यांनी ओपीडीतील डॉक्टरांची तपासणी केली. ओळखपत्र, अॅप्रन नसल्याने त्यांना सुचना केल्या. तसेच कोणत्या डॉक्टरचा राऊंड झाला? फाईलवर नोट्स का नाहीत. स्टेथो कुठेय, राऊंड झाला नाहीतर फोन करा आणि विचारा अशा सूचना परिचारिकांना केल्या. आयसीयूमधील बेडशीटवरील घाण, इलेक्ट्रीक बोर्डची तोडफोड आणि सर्वत्र घाण, अस्वच्छ शौचालये पाहून डॉ. साबळेंनी उपस्थित अधिकार्यांची कानउघडणी केली. त्यानंतर औषधी भांडाराची तपासणी केली. येथे कोणत्या रूग्णालयात किती दिवसाचे आणि किती औषधी दिली याची कसलीच नोंद दिसली नाही.पुढे लसीकरण कक्षात नोंदणी व्यवस्थित नव्हती. येथील परिचारिकांना माहितीही देता आली नाही.
प्रसुती विभागात दाखल झालेल्या गर्भवती मातांना खाटा नसल्याने जमिनीवर झोपावे लागते. ही बाब निदर्शनास आणून देताच डॉ.साबळे यांनी तात्काळ माजलगावच्या डॉक्टर संघटनेला संपर्क केला.आम्हाला 50 खाटांची आवश्यकता असून त्या देण्याची विनंती केली. आठवड्यात या खाटा दिसतील, असेही डॉ.साबळे यांनी सांगितले.दरम्यान गुरूवारी रात्रीपासूनच डॉ.साबळे रूग्णालयासह कारभाराचा आढावा घेत आहेत. प्रशासनातील कारभार आणि रूग्णालय देखील अस्वच्छ असल्याचे त्यांनी बोलून दाखविले. आठवड्यात हा सर्व कारभार बदललेला दिसेल. हलगर्जीपणा आणि ढिसाळपणा करणार्यांवर थेट कारवाई केली जाईल. कोणलाही पाठिशी घातले जाणार नाही, असे डॉ.साबळे म्हणाले.
एसीएस डॉ.राठोडांना सुनावले
डॉ.साबळे यांनी यावेळी प्रसुती विभाग, मेडिसीन, बाल, महिलांच्या कक्षात पाहणी केली. पाच क्रमांकाच्या वॉर्डमध्ये एका वृध्द महिलेला डॉक्टरांनी तपासले नसल्याचे दिसले. यावर अति.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुखदेव राठोड यांना जाब विचारत डॉक्टरांना बोलावून घेण्यास सांगितले. डॉक्टरांचा मनमानी कारभार चालणार नाही. खाजगी दुकाने नंतर चालवा, अगोदर सरकारीत योग्य सेवा द्या. आता सुचना करत आहे, यानंतर असे दिसले तर अगोदर तुम्हाला नोटीस काढेल आणि मग गैरहजर डॉक्टरांना बघेल,असा सज्जड दम डॉ.राठोड यांना दिला. यावेळी डॉ.राम देशपांडे, डॉ.कुलकर्णी, डॉ.मधुकर घुबडे, कविता पाटील आदींची उपस्थिती होती.
बायोमेट्रिक हजेरीवरुनच मिळणार डॉक्टर,कर्मचार्यांचा पगार!
आढावा बैठकीत डॉ.साबळेंच्या सूचना;सिव्हीलची यंत्रणा ताळ्यावर!
जिल्हा रुग्णालयाचा ‘राम भेरोसे’ कारभार यापुढे चालणार नाही. कोणीही अधिकारी, कर्मचारी असो, त्याला स्वत:च्या मर्जीला वाटेल तसे ‘आव-जाव घर तुम्हारा’ या पध्दतीने आता काम करता येणार नाही. नुतन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी पदभार घेताच कामाला सुरुवात करत कामचुकारपणा करणार्यांना धडा दिला. शुक्रवारी दुपारी आढावा बैठक घेत डॉक्टर कर्मचार्यांच्या शिस्तीचे धडे दिले. आता यापुढे डॉक्टर असो की कर्मचारी बायोमेट्रिक हजेरी नुसारच सर्वांची पगार काढली जाईल, तशा सूचनाही त्यांनी संबंधितांना दिल्या.
गुरुवारी सायंकाळी डॉ. सूर्यंकांत गित्ते यांची बदली झाल्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक पदाची सुत्रे माजलगावचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.सुरेश साबळे यांच्याकडे सोपवण्यात आली अन् लगोलग ते रात्रीच बीडमध्ये दाखल झाले. त्यानंतर शुक्रवारी सकाळी त्यांनी आपले कामकाज सुरु केले. स्थलांतरित जिल्हा रूग्णालयाचा राऊंड घेतल्यानंतर दुपारी सर्व अधिकार्यांसह विभाग प्रमखांची बैठक घेतली.
जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचार्यांचे वेतन यापुढे बायोमेट्रिक पध्दतीनेच करा, त्यासाठी तातडीने बायोमेट्रिक मशीन कार्यान्वीत करुन या बायोमेट्रिकवरील हजेरी नुसारच सर्वांचे वेतन काढा अशा सूचनाही केल्या.फिजिशयननेही रोज दोनवेळा कोरोना वॉर्डमध्ये राऊंड घेऊन स्वा: फाईलवर नोट्स टाकाव्यात. कंत्राटी डॉक्टरांवर जबाबदारी ढकलून हात झटकू नयेत, असे निदर्शनास आल्यास कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला. तसेच जिल्हा रुग्णालयात कोठेही अस्वच्छता दिसली नाही पाहिजे, यासाठी स्वच्छता निरीक्षकांनी नियोजन करावे. सर्व विभागांनी रेकॉर्ड अद्यावत ठेवण्याबाबतही डॉ.सुरेश साबळे यांनी सुचना केल्या.
प्रतिनियुक्तीवरील अधिकारी-कर्मचार्यांना पाठवले मूळ ठिकाणी!
आढावा बैठकीत नुतन सीएस डॉ. साबळे यांनी रुग्णालय प्रशासनाची व्यापक माहिती जाणून घेतली. महत्वाचे हे की, विविध आरोग्य संस्थेतून प्रतिनियुक्तीवर आलेले अधिकारी, कर्मचारी यांना तात्काळ त्यांच्या मुळ अस्थापनेवर रूजू होण्यास सांगितले. तसेच वेगवेगळी कारणे सांगून रजेवर गेलेल्या डॉक्टरांना 24 तासांत हजर राहण्याबाबत नोटीस बजावण्यात आल्या आहेत.परिचारिकांनीही कंत्राटी लोकांवर विसंबून न राहता रूग्णसेवा करावी अशाही सूचना दिल्या.
आता स्परजिलॉसिसचा विळखा! जिल्ह्यात सापडले दोन रुग्ण
कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच जिल्ह्यात म्युकरमायकोसिसर या बुरशीच्या आजाराने तोंड वर काढले आहे. या पाठोपाठ आता ‘स्परजिलॉसिस’ हा नवा पांढर्या बुरशीजन्य आजारही बळावू लागला आहे. गत दोन दिवसात केज व माजलगाव तालुक्यात या आजाराचे दोन रुग्ण आढळून आले आहेत. त्यांच्यावर तातडीने अंबाजोगाईच्या ‘स्वाराती’मध्ये उपचार सुरु करण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
जिल्ह्यात आता ‘स्परजिलॉसिस’ हा नवा आजार बळावू लागला आहे. माजलगाव व केज तालुक्यातील दोन रुग्णांना हा आजार झाल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित दोन्ही रुग्णांवर स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. कोरोनाचा इतिहास असलेल्या दोन संशयितांना अंबाजोगाईत दाखल केले. येथे त्यांची सायनस इन्डोस्कोपी केली. तसेच म्युकरमायकोसिसची तपासणी केली. यात तज्ज्ञांना स्परजीलॉसिस आजार असल्याचे निदान झाले. यापूर्वी या आजाराचा एकही रुग्ण नव्हता हे विशेष.दरम्यान जिल्ह्यात यापूर्वी कोरोनाचा प्रकोप सुरु होता, त्यामुळे अनेकांना प्राण गमवावे लागलेले आहेत. त्यातच मागील दीड महिन्यापासून म्युकरमायकोसिस या काळ्या बुरशीजन्य आजाराने डोके वर काढले.
Leave a comment