जिल्ह्यात 81 रुग्ण; 10 रुग्णांचा मृत्यू; 56 जणांवर उपचार सुरु
रेमडेसिवीरनंतर अॅफोटेरिसिन-बी इंजेक्शनसाठी रुग्णांची धरपड
रुग्णांच्या सोयीसाठी प्रशासनाचे नियोजन;
पुन्हा प्रवीण धरमकरांकडे जबाबदारी
बीड । वार्ताहर
कोरोनाच्या संकटानंतर आता म्युकर मायकोसिसचे संकट घोंगावत असून जिल्ह्यात मागील तीन आठवड्यात रुग्णसंख्या तिप्पटीने वाढली आहे. गेल्या दोन महिन्यापासून कोरोनाचे सोंग सर्वांनीच अनुभवले आहे. यामध्ये अनेकांनी जीव गमावले. आता त्या कोरोनामुळेच म्युकर मायकोसिसचा भोग जिल्ह्यातील 80 पेक्षा अधिक रुग्णांना भोगावा लागत आहे. महत्वाचे हे की, आत्तापर्यंत 10 म्युकर मायकोसिसच्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर 11 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह व ऑक्सीजन बेडवर असल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रियाही होवू शकत नाहीत. अशा परिस्थितीत हे रुग्ण वाढले तर या रुग्णांना उपचारासाठी आवश्यक असणार्या औषधोपचारातील महत्वाचे असे अॅफोटेरिसिन-बी या इंजेक्शनचे नियोजन प्रशासनाकडून सुरु असून याची मागणी देखील प्रशासनाने केली आहे; मात्र मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होवू लागल्याने आलेले इंजेक्शन नेमके द्यायचे कोणाला? असा प्रश्न प्रशासनासमोर पडला असून याच्या नियोजनाची सर्व जबाबदारी रेमडेसिवीर नंतर पुन्हा एकदा उपजिल्हाधिकारी प्रवीण धरमकर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी मंगळवारी हे आदेश काढले.
उपजिल्हाधिकारी प्रवीण धरमकर यांनी रेमडेसिवीर इंजेक्शनचे नियोजन व्यवस्थित केल्याने काळाबाजार रोखण्यामध्ये प्रशासनाला काहीअंशी यश आले होते. औषधी विक्रेते, प्रशासन आणि रुग्णालय यांचा समन्वय प्रवीण धरमकरांनी व्यवस्थित लावला आणि त्यातून थोड्या उशिराने का होईना परंतु रेमडेसिवीर इंजेक्शनचे नियोजन झाले. आता केंद्र सरकारने कोरोना उपचारातून रेमडेसिवीर बाद केले असले तरी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेकडून रेमडेसिवीरचा उपयोग सुरुच आहे. न्युमोनियामध्ये रेमडेसिवीरशिवाय पर्याय नाही, असे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांचे म्हणणे आहे. ज्या रुग्णांनी कोरोनाचा भोग भोगला आणि सोंग अनुभवले त्याच रुग्णांवर आता पोस्ट कोव्हिडमध्ये म्युकर मायकोसिसचे संकट ओढवले जात आहे. अर्थात हा आजार सर्वांनाच होतो असे नाही. अपवादात्मक परिस्थितीमध्ये मधूमेहाचा इतिहास असणार्या रुग्णांना म्युकरमायकोसिसचा धोका अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे. राज्यामध्ये दीड हजारांपेक्षा जास्त रुग्ण असून बीड जिल्ह्यात अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयामध्ये यासाठी स्वतंत्र उपचार कक्ष स्थापन करण्यात आला आहे. विद्यमान परिस्थितीमध्ये 81 रुग्ण उपचार घेण्यासाठी दाखल झाले.त्यातील 56 रुग्ण सध्या उपचार घेत आहेत तर 15 रुग्णांना घरी पाठवण्यात आले आहे, म्हणजे या 15 रुग्णांची या आजारातून मुक्तता झाली आहे तर 11 रुग्णांवर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करणे शक्य नाही. कारण ते कोव्हीड पॉझिटिव्ह असून ते रुग्ण ऑक्सीजन बेडवर उपचार घेत आहेत. म्युकरमायकोसिस रुग्णांना भूल देवून शस्त्रक्रिया करावी लागते, त्यामुळे कोरोनामुक्त होईपर्यंत या रुग्णांवर शस्त्रक्रिया करता येणे शक्य नाही असे स्वाराती रुग्णालयाचे नेत्रविभागप्रमुख डॉ.भास्कर खैरे यांनी सांगीतले.
दरम्यान बीड जिल्ह्यामध्ये खासगी नेत्र रुग्णालयामध्ये या आजारावर उपचार करण्याच्या कुठल्याही सूचना शासन अथवा प्रशासनाकडून देण्यात आलेल्या नाहीत. कोरोना संसर्गामध्ये कोव्हिड हॉस्पीटलसाठी जशी स्वतंत्र परवानगी घेणे आवश्यक होते, त्याच धर्तीवर म्युकर मायकोसिससाठी परवानगी घेणे आवश्यक आहे का? हे अद्याप प्रशासनाने स्पष्ट केलेले नाही, त्यामुळे जिल्ह्यात जे नेत्रतज्ञ आहेत, त्यांच्याकडून सध्यातरी प्राथमिक पातळीवर उपचार करुन रुग्णांना थेट अंबाजोगाई येथे पाठवण्यात येत आहे.
रेमडेसिवीरनंतर आता अॅफोटेरिसिनसाठी धडपड
कोरोना रुग्णांना रेमडेसिवीर देणे आवश्यक असल्यामुळे गेल्या महिनाभरात राज्यात आणि जिल्ह्यात केवळ रेमडेसिवीरचीच चर्चा होती. या इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात काळाबाजारही झाला. आपल्या रुग्णांना इंजेक्शन मिळावे यासाठी नातेवाईकांची धडपड पहावत नव्हती. दिवसदिवस जिल्हा रुग्णालयात रांगेमध्ये उभा रहायचे, टोकन घ्यायचे आणि पुन्हा मेडिकलवर धावपळ करायची. आपल्या रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी महिनाभर नातेवाईकांची जणू स्पर्धाच सुरु होती. आता रेमडेसिवीरची बोंब थांबली आहे. म्युकरमायकोसिस आजारामध्ये परिणाम करणारे आणि बुरशीची तीव्रता रोखणारे अॅफोटेरिसिन-बी हे इंजेक्शन सध्या उपलब्ध नाही. उत्पादन कमी असल्याने राज्यभरात इंजेक्शनचा पुरवठा होत नाही. त्यामुळे या इंजेक्शनसाठीही आता धडपड सुरु झाली आहे. मुंबई-पुण्यातील रुग्णांचे नातेवाईक बीड,लातूर, उस्मानाबादमध्ये चौकशी करत आहेत.
कोव्हिडमुळे 11 रुग्णांवर शस्त्रक्रिया अशक्य
स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात काळी बुरशी अर्थात म्युकरमायकोसिस या आजाराने त्रस्त असलेले रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामधील जवळपास 11 रुग्णांवर सध्या शस्त्रक्रिया करणे शक्य नाही, कारण ते कोव्हीड पॉझिटिव्ह असून ते रुग्ण ऑक्सीजन बेडवर उपचार घेत आहेत. म्युकरमायकोसिस रुग्णांना भूल देवून शस्त्रक्रिया करावी लागते, त्यामुळे कोरोनामुक्त होईपर्यंत या रुग्णांवर शस्त्रक्रिया करता येणे शक्य नाही असे स्वारातीचे नेत्रविभागप्रमुख डॉ.भास्कर खैरे यांनी सांगीतले. दरम्यान 15 रुग्णांवर यशस्वी उपचार झाल्याने ते घरी परतले आहेत. म्हणजेच त्यांनी कोरोना नंतर म्युकरमायकोसिसवरही मात केली आहे.
10 रुग्णांचा मृत्यू
बीड जिल्ह्यात मागील साधारण 25 दिवसात म्युकर मायकोसिसचे 81 रुग्ण स्वारातीमध्ये दाखल झाले. त्यातील 15 रुग्ण यशस्वी उपचार घेवून घरी परतले. सध्या 56 रुग्ण उपचाराखाली असून 10 रुग्णांचा दुर्देवाने मृत्यू झाला अशी माहिती स्वाराती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. दरम्यान शस्त्रक्रियेदरम्यान दोन रुग्णांना म्युकर मायकोसिस आजारामुळे प्रत्येकी एक डोळा गमवावा लागला. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. महत्वाचे हे की, म्युकर मायकोसिसचे बहुसंख्य रुग्ण हे पोस्ट कोव्हिडचे असून यात सर्वाधिक रुग्ण 50 वयोगटाच्या पुढील आहेत तर 4 रुग्ण तरुण वयोगटातील आहेत. दाखल झालेल्या रुग्णांमध्ये बीड जिल्ह्यासह लातूर, नांदेड व अन्य भागातील आहेत अशी माहिती स्वाराती रुग्णालयाच्या नेत्रविभागप्रमुखांनी दिली.
Leave a comment