प्रशासनाला रुग्णाला मारायचे की वाचवायचे?
ऑक्सीजन संपल्यावर नळ्या काढून फेकणार का?
बीड प्रशासनाच्या आत्मघातकी निर्णयाने संताप
बीड । वार्ताहर
एकीकडे जिल्ह्यात रेमडेसिवीरचा फुल्ल काळाबाजार सुरु असताना, काही रुग्णालयात एकाचवेळी चार-चार रेमडेसिवीर दिले जात असताना प्रशासनाने मात्र मर्यादीत साठा असल्याचे कारण पुढे करत एका रुग्णाला यापुढे एकच रेमडेसिवीर इंजेक्शन मिळेल असा शब्दप्रयोग करत काल शनिवारी अप्रत्यक्षपणे रुग्णांवर अन्याय करणारा निर्णय घेतला. वास्तविक पाहता साठा वाढवण्यासाठी प्रयत्न करायले हवेत, ते न करता साठा कमी म्हणून इंजेक्शनही कमी, उद्या ऑक्सीजन संपला तर रुग्णांचे ऑक्सीजनही काढणार का? असा सवाल उपस्थित केला जात असून उद्या ऑक्सीजन संपल्यावर प्रशासन रुग्णांच्या नाकातील नळ्या काढण्याचे आदेश देणार का? असा सवालही केला जात असून जिल्हा प्रशासनाच्या या आत्मघातकी निर्णयामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
जिल्हा प्रशासनाने गेल्या महिनाभरात वारंवार भूमिका बदलली आहे. अन्न व औषध प्रशासनाचे औषध निरीक्षक रामेश्वर डोईफोडे यांच्या विरोधात जिल्हाभरात संताप व्यक्त झाल्यानंतर आणि त्यांच्यासंदर्भात मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्यानंतर रेमडेसिवीर इंजेक्शन वाटपाचे नियोजन उपजिल्हाधिकारी प्रवीण धरमकर यांच्याकडे दिले गेले. सुरुवातीला रुग्णांना इंजेक्शन दिले जात होते. त्यासाठी रुग्णालयातून पत्र आणि रुग्णाचे आधारकार्ड मागवून नोंदणी केली जात होती, त्यानंतर दोन दिवसाला एकदा एका रुग्णाला आवश्यकत तेवढे रेमडेसिवीरचे डोस दिले जात होते. त्यानंतर आयटीआयमध्ये गर्दी होवू लागल्याने ही पध्दतही बदलली आणि रुग्णालयानांच रुग्णांची नावे ई-मेलवर पाठवण्याच्या सूचना दिल्या गेल्या. आठवडाभरात या नियमातही बदल केला गेला. आता रुग्णालयांनी केवळ किती रुग्ण आहेत? एवढे कळवायचे आणि प्रशासनाने तेवढे इंजेक्शन द्यायचे. त्यात खासगी रुग्णालयवाले आता रुग्णांच्या नातेवाईकांची आर्थिक पिळवणूक करु लागले आहेत. ‘तुमचे इंजेक्शन आलेच नाही, आम्ही मॅनेज करतो, त्यासाठी जास्त पैसे मोजावे लागतील’ असे सांगून खासगी रुग्णालयातील डॉक्टर रुग्णांची आर्थिक पिळवणूक करत आहेत. त्यातच जिल्हाधिकार्यांनी शनिवारी रेमडेसिवीर वाटपाचा जो आदेश जारी केला, त्यात रुग्णांना यापुढे रेमडेसिवीर इंजेक्शन देताना केवळ एक इंजेक्शन दिले जाणार आहे, रुग्णालयांनीदेखील मागणी पाठवताना एखाद्या रुग्णाला इंजेक्शन दिले असेल तर त्याचे नाव पुन्हा यादीत समाविष्ठ करु नये असेही म्हटले आहे. त्यामुळे रुग्णाला वाचवायचे की मारायचे,प्रशासनाला नेमके करायचे काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
वास्तविक पाहता आठपेक्षा अधिक स्कोअर असणार्या एकाचवेळी दोन रेमडेसिवीरचा डोस सर्वप्रथम दिला जातो, आणि त्यानंतर प्रत्येक दिवशी एक असे तीन दिवस रेमडेसिवीरचे डोस दिले जातात. मात्र प्रशासनाने अकलेचे तारे तोडून केवळ एका इंजेक्शनवरच रुग्णाची बोळवण करण्याचा आत्मघातकी निर्णय घेतला आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सूर्यकांत गित्ते आणि रामेश्वर डोईफोडे यांनी हा सल्ला प्रशासनाला दिला की काय? असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
जिल्ह्यासाठी 462 रेमडेसिवीर उपलब्ध
कोरोना रुग्णांसाठी डॉक्टरांकडून शिफारस झालेल्या 458 रेमडेसिवीरपैकी शनिवारी (दि.8) 462 इंजेक्शन अन्न व औषध प्रशासनाकडून उपलब्ध करुन देण्यात आले. डॉक्टरांच्या शिफारशीनंतर आता हे इंजेक्शन संबंधित कोव्हिड रुग्णांसाठी वापरले जाणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी प्रवीण धरमकर यांनी दिली. प्राप्त झालेल्या इंजेक्शनचे पुढीलप्रमाणे वितरण झाले आहे. बीड तालुक्यासाठी 242, आष्टी, परळी 125, माजलगाव 25, अंबाजोगाई 20, तसेच केज, पाटोदा, शिरुरकासार, धारुर व वडवणी तालुक्यासाठी प्रत्येकी 5 इंजेक्शन उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.
पालकमंत्र्यांचे 10000 रेमडेसिवीर गेले कुठे?
गत महिन्यामध्ये पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी ज्यावेळी बीडमध्ये आढावा बैठक घेतली, त्यावेळी रेमडेसिवीरचा विषय ऐरणीवर होता. जिल्ह्याला 10 हजार रेमडेसिवीर इंजेक्शन मिळवून देवू अशी घोषणा त्यांनी त्यावेळी केली होती. मात्र त्यांची ही घोषणा हवेतच विरली. दहा हजारांपैकी एकही इंजेक्शन आले असते तर त्यांच्या यंत्रणेनेने गावभर गवगवा केला असता.त्यानंतरही 250 इंजेक्शन आल्याची बातमीही त्यांनी दिली होती, त्यातील केवळ 50 रेमडेसिवीरच मिळाल्याचे प्रशासनाने सांगीतले होते. म्हणजे जवळपास 10 हजार 200 इंजेक्शन जिल्ह्याला मिळणार होते. ते सर्व गेले कुठे? असा सवालही नागरिक उपस्थित करत आहेत.
Leave a comment