जिल्हाधिकारी, सीईओ, एसपींनी घेतली जखमी डॉक्टरांची भेट
बीड | वार्ताहर
नाकाबंदी दरम्यान ओळखपत्र दाखवूनही बीड शहरातील डॉक्टर विशाल वनवे यांना अमानुष मारहाण केल्याची घटना बुधवारी सायंकाळी शहरातील चर्हाटा फाटा येथे घडली होती. उपअधीक्षक संतोष वाळके व पोलिसांनी ही मारहाण केल्याचा आरोप आरोग्य कर्मचार्यांनी केला आहे. या घटनेच्या निषेधार्थ आजपासून आष्टी तालुक्यातील सर्व डॉक्टरांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. याचा परिणाम लसीकरण मोहिमेवर झाला आहे. असे असतांनाच गुरूवारी सकाळी जिल्हाधिकारी, सीईओ आणि पोलिस अधीक्षकांनी स्थलांतरित जिल्हा रूग्णालयात उपचार घेणार्या डॉ.विशाल वनवे यांची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. या प्रकरणी आता संबंधित अधिकार्यांची तीन सदस्यीय चौकशी करणार असल्याचे पोलिस अधीक्षक आर.राजा यांनी स्पष्ट केले आहे.
डॉ.विशाल वनवे हे पोलिसांच्या मारहाणीत जखमी झाले असून त्यांच्या पाठीवर काठीचे व्रण उमटले आहेत. आष्टी तालुक्यातील टाकळसिंग प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ.वनवे कार्यरत आहेत. बुधवारी सायंकाळी ते कर्तव्य बजावून दुचाकीवरून बीडकडे निघाले होते. शहरातील चर्हाटा फाटा परिसरात नाका बंदी बंदोबस्तावर असलेले उपअधीक्षक संतोष वाळके व त्यांच्या पोलिसांनी डॉ.वनवे यांना थांबवत बाहेर फिरण्याचे कारण विचारले यावेळी वनवे यांनी त्यांना स्वतःचे ओळखपत्र दाखवत घरी जात असल्याचे सांगितले. परंतु यावर पोलिसांचे समाधान न झाल्याने त्यांना काठीने अमानुष मारहाण झाली. यात ते जखमी झाले. त्यांच्या भावासह उपचारासाठी दुचाकीवरून जिल्हा रूग्णालय गाठले. समाज माध्यमावरून हा प्रकार जिल्हा प्रशासनापर्यंत पोहोचला आणि पोलिसांच्या भुमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली गेली. दरम्यान या घटनेचा निषेध म्हणून आष्टी तालुक्यातील सर्व शासकीय व निमशासकीय डॉक्टरांनी आज गुरूवारी कामबंद आंदोलन पुकारले आहे. तसेच पोलिस अधीक्षकांना निवेदन देवून अत्यावश्यक सेवेतील डॉक्टरांना मारहाण करणार्या पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. असे असतांनाच गुरूवारी सकाळी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार व पोलिस अधीक्षक आर.राजा व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राधाकिसन पवार यांनी उपचार घेत असलेले डॉक्टर विशाल वनवे यांची रूग्णालयात जावून आस्थेवाईकपणे चौकशी केली.
समितीच्या अहवालानंतर होणार कारवाई
अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, अप्पर पोलिस अधीक्षक सुनील लांजेवार आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राधाकिशन पवार यांचा या तीन सदस्यीय समितीत समावेश असून ही समिती डॉ.वनवे यांना झालेल्या अमानुष मारहाण प्रकरणाची निपक्षःपातीपणे चौकशी करून याचा संपूर्ण अहवाल पोलिस अधीक्षकांकडे सादर करणार आहे. त्यानंतर अहवालातून निष्पन्न होणार्या बाबी लक्षात घेवून पुढील कार्यवाही केली जाईल अशी माहिती गुरूवारी जिल्हा पोलिस अधीक्षक आर.राजा यांनी दिली.
Leave a comment