इंजेक्शनची सोय करा, नाहीतर आम्हाला फासावर तरी चढवा
आ.सुरेश धस यांना संताप अनावर
जिल्हाधिकारी, एसपींसमोर हाश्मी,डोईफोडेंना झापले
बीड । वार्ताहर
‘ औषध प्रशासनाने लोकांच्या प्रचंड व्यथा करुन ठेवल्या, एक तर आम्हाला फासावर टाका, जेलमध्ये पाठवा नाहीतर रेमडेसिवीरचा सुरळीत पुरवठा करा. कोरोनामुळे जिल्ह्यात हाहाकार उडालाय, आमचे लोक मरायला लागलेत. केवळ रेमडेसिवीर इंजेक्शनअभावी माणसं जाळायची तरी किती?’ असा संतप्त सवाल करत भाजप आमदार सुरेश धस यांनी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप, पोलीस अधीक्षक आर.राजा यांच्यासमोर अन्न व औषध प्रशासनचे आयुक्त इम्रान हाश्मी व औषध निरीक्षक रामेश्वर डोईफोडे यांना गुरुवारी (दि.22) झाप-झाप-झापले.दरम्यान यावेळी सर्वपक्षीय नेत्यांनी आक्रोश अन् संताप व्यक्त करत रेमडेसिवीर इंजेक्शनचे वितरण सुरळीत करा अशी मागणी केली. आ.धस व इतरांना शांत करत स्वत: जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी समजूत काढत इंजेक्शनचा तातडीने पुरवठा होईल यासाठीचे आदेश दिले.
रेमडेसिवीर इंजेक्शनअभावी जिल्ह्यात रुग्णांना मरणयातना सहन कराव्या लागत असून वरुन सुरु असलेल्या गोंधळामुळे आमदार सुरेश धस, आमदार ैअॅड.लक्ष्मण पवार, भाजप जिल्हाध्यक्ष राजेंंद्र मस्के, वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे,नगरसेवक अमर नाईकवाडे आदींनी गुरुवारी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांची भेट घेतली. यावेळी अन्न व औषध प्रशासनचे आयुक्त इम्रान हाश्मी, औषध निरीक्षक रामेश्वर डोईफोडे यांना जिल्हाधिकार्यांसमोरच रेमडेसिवीवरवरुन चांगलीच खरडपट्टी काढली. यावेळी आ. सुरेश धस यांनी आपल्या ग्रामीण,रांगड्या शैलीत हाश्मी व डोईफोडे यांना झापले. रेमडेसिवीर का मिळत नाही, वितरण सुरळीत का केले जात नाही? नोंदणीची जागा वारंवार बदलून रुग्णांच्या नातेवाईकांची हेळसांड का केली जाते असे एक ना अनेक प्रश्न केले. यावेळी जिल्हाधिकार्यांसह अन्न व औषध प्रशासनचे अधिकारीही निरुत्तर झाले. भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, वंचित बहुजन आघाडीचे अशोक हिंगे, नगरसेवक अमर नाईकवाडे यांनीही आक्रमकपणे रुग्णांच्या नातेवाईकांच्या व्यथा मांडल्या.
आ.सुरेश धसांनी बाधितांच्या व्यथांचा पाढाच मांडला
जिल्हाधिकारी यांच्या दालनात आ.धस यांनी सुरुवातीला रेमडेसिवीरचा प्रश्न उपस्थित केला. तेव्हा आष्टी येथून रेमडेसिवीरसाठी केवळ सहा अर्ज आल्याची सावरासावर औषध निरीक्षक रामेश्वर डोईफोडे यांनी केली. त्याला आयुक्त इम्रान हाश्मींनीही दुजोरा दिला. त्यावर आ. सुरेश धस यांना संताप अनावर झाला. त्यांनी यावेळी जी काही भूमिका मांडली, ती तंतोत रुग्णांच्या नातेवाईकांचीच भावना होती.आ. धस म्हणाले, ‘अहो, आष्टीत रुग्णांना खाटा मिळेनात, रुग्णांना जमिनीवर झोपून उपचार करावे लागले. ग्रामीण रुग्णालयात दररोज दीडशे रुग्ण दाखल होत आहेत. पाच कोविड सेंटरला जिल्हाधिकार्यांनी परवानगी दिली;पण रुग्णांचे हाल थांबेनात अन् तुम्ही फक्त सहा अर्ज आले असे काहीही बोलता. अरे आम्ही लोकांना इंजेक्शन मिळवून देऊ शकत नाहीत तर जगायचं कशाला, फाशी देऊन मारुन टाका,’अशा शब्दांत तीव्र संताप व्यक्त केला. डोईफोडे, औषधी दुकानांच्या तपासणीच्या नावाखाली सातशे-आठशे रुपये घेतात माहीत नाही का, असे वर्मावर बोट ठेऊन त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. त्यानंतर जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी आमदार सुरेश धस यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. रेमडेसिवीरच्या उपलब्धतेनुसार क्रमवारीप्रमाणे वाटप करु, असे आश्वासन त्यांनी दिले.
बीड: जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांच्यासमोर गुरुवारी रेमडेसिवीरच्या वितरणातील गोंधळावरुन आ. सुरेश धस व सर्वपक्षीय नेत्यांनी अन्न व औषध प्रशासनच्या अधिकार्यांना जाब विचारला.
Leave a comment