बीड स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
बीड । वार्ताहर
शहरासह जिल्ह्यातील दुचाकी चोरणार्या अट्टल गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखेने मोठ्या शिताफीने मुसक्या आवळल्या. शहरातील इमामपूर रोड, ढोलेवस्ती येथे आरोपीच्या घरात शुक्रवारी (दि.9) ही कारवाई करण्यात आली. दरम्यान या चोरट्याने त्याच्या अन्य दोन साथीकारांकडे ठेवल्याचे तपासात समोर आले. पोलीसांनी नंतर या तिघांकडून सहा लाख 95 हजार रुपये किमंतीच्या 15 दुचाकी जप्त केल्या असून या चोरट्यांकडून अन्य दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस येतील असा अंदाज गुन्हे शाखेने व्यक्त केला आहे.
लक्ष्मण बाबूराव पवार (38, रा.ढोले वस्ती,इमामपूर रोड, बीड) असे ताब्यात घेतलेल्या दुचाकी चोरट्याचे नाव आहे. पोलीसांच्या माहितीनुसार, लक्ष्मण हा अट्टल गुन्हेगार असून त्याने गेल्या काही दिवसांपूर्वी शिवाजीनगर, बीड शहर पोलीस ठाण्यायाच्या हद्दीसह जिल्ह्यातून दुचाकी चोरल्या होत्या. पोलीस अधीक्षक आर.राजा यांच्या सूचनेनुसार दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी गुन्हे शाखा निरीक्षक भारत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पथक चोरट्यांचा शोध घेत होते. त्यानुसार शुक्रवारी ढोलेवस्ती परिसरात राहणार्या लक्ष्मण पवारच्या घरात छापा मारण्यात आला. तिथे चोरीच्या 7 दुचाकी आढळून आल्या. दरम्यान त्याला ताब्यात घेतल्यानंतर पोलीसांनी त्याची कसून चौकशी केली असता चोरीच्या अन्य 5 दुचाकी त्याचा मित्र भीमा बबन जाधव (रा.काठोडातांडा, गेवराई) याच्याकडे तर 3 दुचाकी मित्र संदीप सोळंके (रा. निपाणी टाकळी, ता. माजलगाव) याच्याकडे गहाण ठेवल्या असल्याचे सांगीतले. या माहितीवरुन पोलीसांनी नंतर त्या सर्व 15 दुचाकी जप्त केल्या.
पुढील तपासकामी आरोपी भिमा जाधव यास बीड शहर पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले. तसेच तलवाडा हद्दीतील एका मोबाइल चोरी प्रकरणी शुक्रवारी गुन्हे शाखेच्या पोलीसांनी सुमित नवनाथ राठोड (रा.मठजळगाव,ता.अंबड,जि.जालना) यास ताब्यात घेवून तलवाडा पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आल्याची माहिती निरीक्षक भारत राऊत यांनी सांगीतले.
Leave a comment