घातपाताचा संशय;पोलीस घटनास्थळी
आष्टी । वार्ताहर
आष्टी शहरातील महात्मा फुले चौकातील एका बँक व्यवस्थापकाचा मृतदेह शहरालगतच्या मुर्शदपूर येथील धनवडेवस्ती नजिकच्या शेतविहिरीत आढळून आला. शनिवारी (दि.10) सकाळी हा प्रकार समोर आल्यानंतर आष्टी शहरात खळबळ उडाली. आष्टी पोलीसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह विहिरीवर काढून उत्तरीय तपासणीसाठी अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात पाठवण्यात आला. दरम्यान या घटनेमागे घातपाताचा संशय व्यक्त केला जात असून पोलीस सखोल तपास करत आहेत.
बाळासाहेब शिरसाट (44)असे मयताचे नाव आहे. शिरसाट हे शहरातील सुखकर्ता अर्बन बँकेचे व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. शनिवारी सकाळी त्यांचा मृतदेह धनवडे वस्तीजवळील भैरू चव्हाण यांच्या शेतविहिरीत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. सकाळी साडेअकराच्या सुमारास हा मृतदेह दिसून आल्यानंतर शेतकर्याच्या खबरीवरून आष्टी पोलीसांना माहिती देण्यास आली. त्यानंतर सहायक निरीक्षक भारत मोरे, पोहेकॉ रियाज पठाण यांनी घटनास्थळी धाव घेतली. क्रेनच्या साह्याने मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आला.
विहिरीमध्ये फार काही पाणी नसल्याचे दिसून आले. दरम्यान नंतर उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह आष्टी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला; पंरतु गळ्याला कंबर पट्टा आवळला होता.चेहर्याजवळ थोड्याबहुत जखमा होत्या. त्यामुळे डॉ.पाटील डॉ. राहुल टेकाळे, उपाधीक्षक विजय लगारे, पोलीस निरीक्षख सलिम चाऊस यांनी हे प्रकरण संशयास्पद असल्याचे नमूद केल्यानंतर मृतदेह अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात पाठवण्यात आला. बाळासाहेब शिरसाठ यांच्या दोन दिवस घरातून बाहेर जाण्याचे व त्यानंतर त्यांचा थेट मृतदेह आढळून आल्याने तर्क-वितर्क व्यक्त केले जात आहेत. उत्तरीय तपासणीनंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल असे आष्टी पोलीसांनी सांगीतले.
Leave a comment