जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांचा इशारा
बीड । वार्ताहर
जिल्ह्यातील सर्व व्यापारी, विक्रेते तसेच व्यावसायिकांना 15 मार्चपर्यंत कोरोना चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले होते, मात्र त्यानंतरही अनेकांनी चाचणी न करताच आपली दुकाने आणि व्यवसाय सुरु ठेवले आहेत. त्यामुळे चाचणी न केलेल्या सर्व विक्रेते, व्यापार्यांनी येत्या 20 मार्चपर्यंत कोरोना चाचणी करुन घ्यावी व त्यानंतरच आपले व्यवसाय सुरु करावेत अन्यथा प्रशासनाला पुर्ण लॉकडाऊन करण्याचा कठोर निर्णय घ्यावा लागेल असा इशारा जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी दिला आहे.
याबाबत शुक्रवारी जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व व्यापारी, विक्रेते, व्यावसायिक तसेच रेस्टाँरट, बियरबार, हॉटेल व्यावसायिकांना कोरोना चाचणी करुन घेण्याचे आवाहन केले आहे. यापूर्वी 1 मार्चच्या बैठकीमध्ये सर्व व्यापारी,विक्रेत्यांनी कोरोना चाचणी केली जाईल अशी हमी प्रशासनाला दिली होती, मात्र अनेकांनी चाचणीकडे दुर्लक्ष करत आपले व्यवसाय सुरु ठेवले आहेत. तसेच रेस्टारंट,बार, भाजीपाला, फळविक्रेते यांनी नियमांचे व निर्बंधाचे पालन केलेले नाही. त्यामुळे सर्व संबंधितांनी येत्या 20 मार्चपर्यंत कोरोना चाचणी करुन घ्यावी अन्यथा प्रशासनाला पुर्ण लॉकडाऊन करण्यासारखा कठोर निर्णय घ्यावा लागेल असेही जिल्हाधिकारी यांनी नमूद केले आहे.
व्यापार्यांनी कोरोचा चाचणी करावी-सोहनी,पिंगळे
बीड शहरात व जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. अशा वेळी सर्व व्यापार्यांनी प्रशासनाच्या आदेशाचे पालन करावे. तसेच अॅन्टीजन टेस्ट करुन प्रशासनास सहकार्य करण्याबरोबरच आपल्या परिवाराची देखील या संसर्गापासून काळजी घ्यावी. त्याकरिता ज्या व्यापारी बांधवांनी कोरोना चाचणी केली नसेल त्या सर्व व्यापारी बांधवांनी ही तपासणी करुन घ्यावी असे आवाहन बीड जिल्हा व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष संतोष सोहनी, शहराध्यक्ष विनोद पिंगळे, गणेश बलदवा, दिपक कर्नावट व हनुमानदास मंत्री यांनी केले आहे.
Leave a comment